'स्थळ' चित्रपटाने जिंकली प्रेक्षकांचे मन; मराठी चित्रपट पाहून जया बच्चन म्हणाल्या,"असे चित्रपट तयार होणे.."

    08-Mar-2025
Total Views |
 

sthal a critically acclaimed marathi film wins hearts  praised by jaya bachchan industry veterans
 
 
 
मुंबई : महिला दिनाचं औचित्य साधत, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला आणि अनेक पुरस्कार विजेता ‘स्थळ’ चित्रपट ७ मार्चला प्रदर्शित झाला. जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित या चित्रपटात नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी आणि मानसी पवार या नवोदित कलाकारांनी दमदार अभिनय सादर केला आहे.
 
 
मराठी सिनेसृष्टीतील महागुरू सचिन पिळगांवकर यांनी ‘स्थळ’ चित्रपटाची प्रस्तुती केली असून, चित्रपटाचे विशेष कौतुक मराठी आणि बॉलिवूडमधील दिग्गजांकडून होत आहे. अभिनेत्री जया बच्चन यांनी देखील या चित्रपटाची प्रशंसा केली असून, त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘स्थळ’ चित्रपटाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जया बच्चन म्हणतात. 
 
 
"सचिन, तुम्ही मला बोलावलंत यासाठी मी तुमचे आभार मानते. काही कलात्मक कामं असतात, ज्याबाबत जास्त बोललं जात नाही, पण असे चित्रपट तयार होणे समाजासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा खरा चित्रपट आहे, मला खूप आवडला. या चित्रपटासाठी ईश्वर चरणी प्रार्थना आणि खूप शुभेच्छा."
 
 
यापूर्वी श्रिया पिळगांवकरने हा चित्रपट मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहून सचिन आणि सुप्रिया पिळगांवकरांना नाफा फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाहण्यास सुचवलं होतं. हा चित्रपट पाहिल्यानंतर ते दोघेही भारावून गेले. विशेषतः अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद दिला. त्यानंतर सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना सांगितलं "चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा." त्यावेळी सोमलकर यांनी त्यांच्याकडे प्रस्तुती करण्याची विनंती केली आणि सचिन पिळगांवकरांनी लगेचच होकार दिला.
 
 
सध्या ‘स्थळ’ चित्रपट आणि त्याच्या कथानकाची सर्वत्र चर्चा आहे. सोनाली कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, जयंत वाडकर, स्वप्नील जोशी, मधुर भांडारकर, प्रथमेश परब, अशोक सराफ आणि अवधूत गुप्ते यांसारख्या मराठी कलाकारांनीही चित्रपटाच्या टीमचं कौतुक करत प्रेक्षकांना हा चित्रपट बघण्याचं आवाहन केलं आहे.