लाडक्या बहिणींना मिळणार शिवरायांची छबी असलेले ‘रूपे कार्ड’
08-Mar-2025
Total Views |
मुंबई : ( Rupee Card with Shivaji maharaj image for CM ladki bahin ) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या लाभार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले ‘रूपे कार्ड’ देण्यात येणार आहे. मल्टि मोडल ट्रान्सपोर्ट एक्सेस त्यात उपलब्ध आहे. याद्वारे डिजिटल सुरक्षितता आणि इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे. तसेच पेमेंट करण्यासाठी क्युआर कोडही देण्यात आला आहे. या कार्डचे यावेळी अनावरण करण्यात आले. देशात ‘रूपे कार्ड’ देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास विभागामार्फत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय समारोप व कन्यारत्न यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन राजभवन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, विभागाचे आयुक्त नयना गुंडे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला स्वंसहाय्यता गटाच्या सदस्य उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले की, कुटुंबासह देशाच्या विकासासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. आज सन्मानित करण्यात आलेल्या महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहेत. प्रधानमंत्री यांच्या निर्णयानुसार संरक्षण विभागाच्या तिन्ही दलांमध्ये महिलांना काम करण्याची संधी दिली आहे आणि तिथेही त्यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
विकसित भारतासाठी महिलांचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांच्या योगदानाशिवाय देशाचा विकास होणे शक्य नाही. २०२९ पर्यंत राजकीय क्षेत्रात मिळणाऱ्या आरक्षणामुळे महाराष्ट्र हे ‘महिला राज्य’ होणार आहे. २०४७ मध्ये विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करताना महिलांचा सहभाग हा महत्त्वाचा ठरणार. लोकसंख्येत ५० टक्के महिला असून, महिलांना केंद्रस्थानी ठेऊन मानव संसाधन विकसित केल्यास देश विकसित होईल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखले आणि म्हणूनच ‘लेक लाडकी’ ते ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘लखपती दीदी पर्यंत योजना सुरू करून त्या प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील बालविवाह बंद झाले आहेत आणि लिंगभेदाचे, भ्रूणहत्येचे प्रमाण कमी झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवांचा सन्मान
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरविण्यात आले. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती केया हाटकर यांना कला व साहित्यसाठी, विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारतीय महिला संघाचे नेतृत्व केलेली प्रियंका इंगळे, राज्यातील पहिल्या महिला फायटर पायलट अंतरा मेहता, पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला अपूर्वा अलाटकर, डिझेल इंजिन चालवणारी पहिली महिला मुमताज काझी, महिला क्रिकेट संघाच्या पहिल्या कर्णधार डायना एडल्जी , पत्रकारिता क्षेत्रासाठी रूपाली बडवे, ७० वर्षीय सोशल मीडिया स्टार सुमन धामणे, नागपूरमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लभार्थ्यांनी एकत्र येऊन महिला सन्मान क्रेडिट सोसायटी स्थापन केली. सोसायटीच्या अध्यक्ष संगीता चव्हाण, उपाध्यक्ष सचीता सोनी या महिला रत्नांचा यावेळी सत्कार करण्यात आला.