गेल्या काही वर्षांत झपाट्याने शहरीकरणात वाढ झाल्याने, अनेक नागरिकांनी रोजगारासाठी शहराची वाट धरली. त्यातून जसा लाभ झाला, तसे काही तोटेही झाले. वाहतुकीची समस्या ही त्यापैकीच एक! पुण्यासारख्या शहरात ही समस्या आता उग्र होऊ लागली आहे. पुण्यातील वाहतूक समस्यांवर अधिकाधिक झोत टाकून, येथील सर्वच प्रकारच्या माध्यमांनी प्रशासनाला जेरीस आणले आहे. ‘पीएमपी’ची अवस्था अतिशय वाईट आणि प्रवाशांना त्रास होईल, अशी असल्याचे गेल्या वर्षभरापासून दिसत आहे. असा एकही दिवस जात नाही, या सेवेची बस रस्त्यात कोठे ना कोठे बंद पडली नाही. काही बसचे दरवाजेच नाहीत, काही बसचे बीआरटी मार्गाचे दरवाजे तर इतके धोकादायक आहेत की, लहानमूल जर गर्दीत तेथे गेले, तर एखादी दुर्घटना बसमध्येच घडेल की काय? अशी अवस्था असते. बसमधील फलोरिंगचीदेखील अवस्था वाईटाहून वाईट आहे. याचे लोखंडी पत्रे कधी एखाद्या महिला, पुरुष प्रवाशांच्या पायात घुसतील, याचा नेम नाही. गर्दी तर इतकी असते की, शाळकरी लहान मुलींसाठीही या बस काही सेकंददेखील थांब्यांवर थांबायला तयार नसतात.
अनेकदा या मुली कितीतरी काळ दरवाजात धोकादायक परिस्थितीत लटकून प्रवास करीत असल्याचे चित्र, नित्याचे झाले आहे. एखाद्या प्रवाशाला किंवा वाहकाला त्यांची जाणीव होते, तेव्हा या शाळकरी मुलींना वर घेतले जाते. सध्या ‘पीएमपीएमएल’कडे केवळ १ हजार, ६५० बसेस आहेत. सरासरी १२ लाख प्रवासी हे या बसमधून प्रवास करीत आहेत. पुण्यात एकूण ४७२ मार्ग आहेत आणि एकूण ४ हजार, ३०० थांबे आहेत. त्यामुळे रस्त्यांवरून या बस धावताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांची सुरक्षा वार्यावर आहे. अनेक दुर्घटना होता होता टळल्या आहेत. अशीच कायम अवस्था राहिली, तर भविष्यात दुर्घटनांचे प्रमाण वाढेल, ही भीती व्यक्त करायला या कारणांमुळे खूपच वाव आहे. खुद्द वाहक-चालकांनादेखील याची जाण आहे. स्वारगेट थांब्यावर तर संध्याकाळपासून रात्री ८.३० ते ९ वाजेपर्यंत, बससाठी जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागते. त्यात मध्येच बससमोर येणारे रिक्षावाले अधिकारी, कर्मचार्यांवर मुजोरी करून, प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत. मात्र, पोलीस आणि बस प्रशासनाला याचे काही देणे घेणे नाही, असेच चित्र आहे.
पुणे मेट्रो सुसाट..
पुण्यात दुसरीकडे मात्र पहिल्या चित्राशी अतिशय विसंगत असे चित्र आहे. मार्च २०२२ साली सुरू झालेल्या मेट्रोने, पुण्यातील प्रवासी अनुभवाचे विश्वच बदलवून टाकले आहे. उत्तम व्यवस्थापनानंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर किती सुखद अनुभूती देऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुणे मेट्रो होय! एकीकडे रस्त्याने बसमधून जाताना ‘आहा आहा’ करणारे प्रवासी, पुण्यात आकाश आणि पृथ्वीच्या मध्यातून, तसेच पृथ्वीच्या चक्क गाभार्यातून धावणार्या मेट्रोतून प्रवास करताना, सुखद ‘आहा आहा’चा अनुभव घेत आहेत. यामुळे सुरक्षित प्रवासाची भावना प्रबळ तर झालीच, मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञान मानवी जीवनातील गतिविधींना किती उपयुक्त ठरू शकते, याचे आदर्श उदाहरण समोर ठेवणार्या पुणे मेट्रोने, अवघ्या तीनच वर्षांत प्रवाशांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले आहे. सुरुवातीला सात किमी धावणारी ही पुण्यातील मेट्रो, आता चक्क अख्ख्या पुणे शहराला कुशीत घेऊन, ३३.२८ किमी धावत आहे . प्रवासी अगदी आनंदाने या प्रवासाचा अनुभव घेत आहेत.
तसेच आपली कामे विना तक्रारीने करीत, वेळेची बचत करीत, पर्यावरणपूरक प्रवासाची सुखद अनुभूतीही घेत आहेत. त्यामुळे दिवसाला सरासरी एक लाख साठ हजारांहून अधिक प्रवाशांना ने-आण करणारी ही मेट्रो, पुणेकरांची आणि पुण्यात येणार्या पाहुण्याची लाडकी होऊन बसली आहे. वारकरी, धारकरी, नोकरदार, विद्यार्थी, महिला, वृद्ध असे सगळेच, यातून सुखद प्रवास करीत आहेत. यामुळे मेट्रोच्या महसुलात अवघ्या तीन वर्षांत, जवळपास ९३ कोटींची भर पडली आहे. आता पुणेकरांची ही लाडकी मेट्रो, आपल्या कक्षा विस्तारित आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेटनंतर, वनाज ते रामवाडी मार्गावरील मार्गिका सुरू झाली. भविष्यात पीसीएमसी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज हे मार्ग सुरू होणार आहे. याशिवाय वनाज ते चांदणी चौक १.१२ किलोमीटर, नळ स्टॉप ते वारजे, माणिकबाग : ६.१२ किलोमीटर, हडपसर ते लोणी काळभोर : १६.९२ किलोमीटर, रामवाडी ते वाघोली : ११.३३ किलोमीटर, खडकवासला, स्वारगेट, हडपसर, खराडी : ३१.६४ किलोमीटर आणि हडपसर ते सासवड : ५.५७ किलोमीटर हे मार्गही लवकरच सुरू होणार असल्याने,स्वप्नवत वाटणारे सुखकर प्रवासाचे दिवस पुणेकरांसाठी दूर नाहीत हे नक्की.