पाच लाख रुग्णांवर उपचार, एक लाखांहून अधिक शस्त्रक्रिया आणि दहा हजारांहून अधिक लॅसिक उपचार... २५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत लाखो रुग्णांना दृष्टी देण्याचे काम करणार्या डोंबिवलीच्या डॉ. अनघा अनिल हेरूर या खर्या अर्थाने नेत्रचिकित्सा क्षेत्रातील कर्मयोगिनी ठरल्या आहेत. त्यांचा नेत्रदीपक प्रवास जाणून घेऊया....
डॉ. अनघा यांचे वडील डॉ. गिडधुबली हे ‘सेंटर ऑफ सोव्हिएत स्टडीज’ येथे संचालक, तर आई डॉ. फाल्गुमनी गिडधुबली यादेखील उच्चपदस्थ होत्या. १९८६ साली विद्याविहारच्या फातिमा हायस्कूलमध्ये दहावीमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. बारावीचे शिक्षण मुंबईच्या रुपारेल, तर वैद्यकीय शिक्षण सायन हॉस्पिटलमधून पूर्ण केले. १९९३ साली ‘एमबीबीएस’मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान डॉ. अनघा यांनी मिळवला. ‘एमबीबीएस’ झाल्यानंतर डॉ. अनघा यांनी ‘डिप्लोमा इन ऑप्थलमिक मेडिसीन अॅण्ड सर्जरी’ हा नेत्रतज्ज्ञ क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ‘एमएस’ आणि ‘एफसीपीएस’ आणि लागोपाठ ‘डिप्लोमा इन नॅशनल बोर्ड’ हा अभ्यास पूर्ण केला. १९९३ साली कर्करोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरुर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. ‘एमबीबीएस’ करताना प्रा. शांता मोटवानी आणि डॉ. निकोल्सन यांनी करिअरला एक नवीन दिशा दिल्याचे त्या आवर्जून सांगतात. त्यांच्या सासूबाई डॉ. उमा हेरुर यांनी १९७२ साली डोंबिवलीत सुरू केलेल्या ‘अनिल आय क्लिनिक’मध्ये त्यांनी सराव सुरू केला.
पुढे ‘अनिल आय क्लिनिक’ची जबाबदारी लीलया पेलताना गेल्या २५ वर्षांत लाखो रुग्णांवर उपचार करत १३ हजार स्क्वेअर फुटच्या प्रशस्त जागेत विस्तार केला. आज डोंबिवली पूर्वेच्या गणपती मंदिर रोड, पलावा सिटी येथील लोढा शॉपिंग सेंटर, कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज समोर, ठाणे येथील घोडबंदर रोड आणि नव्याने कात्रप बदलापूर येथे सुरू झालेल्या अशा पाच ठिकाणी डॉ. अनघा यांनी ‘अनिल आय हॉस्पिटल’चा विस्तार केला आहे. डॉ. अनघा यांना अभ्यासक्रमात भरीव कामगिरी केल्याबद्दल १८ सुवर्ण पदके आणि गेल्या २५ वर्षांत वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या त्या ‘ऑल इंडिया ऑप्थलमोलॉजिकल सोसायटी’च्या पश्चिम विभागीय ‘शैक्षणिक संशोधन समिती’च्या सदस्य असून, ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांची ‘महाराष्ट्र ऑप्थलमोलॉजिकल सोसायटी’च्या अध्यक्षपदी नियुक्ती होणार आहे.
नेत्रदान चळवळीत सध्या महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागतो. नेत्रदानाची चळवळ वाढवून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर आणायचा डॉ. अनघा यांचा निर्धार आहे.डॉ. अनिल हेरुर यांच्या ‘गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून खेडोपाडी ‘मॅमोग्राफी’ आणि नेत्रतपासणीसाठी व्हॅन फिरते, ज्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर मोफत कॅन्सर डिटेक्शन आणि डोळ्यांची तपासणी करतात. याचा लाभ ग्रामीण विभागातील रुग्णांना होतो. सामाजिक बांधिलकी म्हणून त्या दरवर्षी काही शाळांना भेट देऊन दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करतात. आपले यश हे एकट्याचे नसून, आपले सहकारी डॉक्टर्स, नर्स, टेक्निशियन, सपोर्ट स्टाफ अशा पूर्ण टीमचे यश आहे, असे डॉ अनघा आवर्जून सांगतात. “महिलांनी आता प्रत्येक क्षेत्रात पुरुषाची बरोबरी केली आहे, याचा अभिमान आहे. प्रत्येक स्त्रीने आपल्या आवडत्या क्षेत्रात पुढे गेले पाहिजे. त्यासाठी कठोर परिश्रम करावे,” असे डॉ. अनघा अनिल हेरूर सांगतात.