स्वार्थ बाजूला ठेवून दीनदुबळे, गोरगरिबांना मदतीचा हात देणारे अनेक थोर समाजसेवक आपण आतापर्यंत पाहिले. याच समाजसेवेच्या संस्कारांडे बाळकडू आज लोकप्रतिनिधी म्हणून नावारूपाला आलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मा. नगरसेविका खुशबू पद्माकर चौधरी यांना लहानपणापासूनच त्यांच्या वडिलांकडून मिळाले. समाजकार्यात आघाडीवर असलेल्या चौधरींना माजी मंत्री आणि भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आजच्या ‘जागतिक महिला दिना’निमित्त राजकारणात असूनही, समाजकार्यातून आपल्या कर्तृत्वाची छाप उमटविणार्या खुशबू चौधरी यांच्या आजवरच्या प्रवासाविषयी...
राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू. या दोन्ही बाजू व्यवस्थित हाताळणे आणि सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. हीच कसरत खुशबू यांनादेखील नगरसेविकापदावर निवडून आल्यानंतर करावी लागली. दि. ११ नोव्हेंबर २०१५ ते दि. ११ नोव्हेंबर २०२० या कालवधीत त्यांनी डोंबिवली पूर्वेतील सारस्वत कॉलनी या प्रभागातून भाजपकडून नगरसेविकापद भूषविले नगरसेविकेची जबाबदारी पार पाडताना, त्यांनी ‘एम.बी.ए.’चे शिक्षणही पूर्ण केले. सध्या त्या मुंबई विद्यापीठातून ‘एल.एल.बी.’चे शिक्षण घेत आहेत. नगरसेविकापदाचा कार्यकाळ संपला असला, तरी त्यांनी या भूमिकेचे काम आजही सातत्याने सुरू ठेवले आहे.
‘कोविड’ काळात त्यांनी आपल्या कार्यालयाचे दरवाजे गरजूंसाठी कायम खुले ठेवले आणि गरजूंना आवश्यक तेवढी मदत केली. सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणार्या कचराच्या समस्येकडे लक्ष देऊन तो सोडविण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे भरविली. त्याला स्थानिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला. ‘कडोंमपा’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नागरिकांनी वर्गीकरण केलेला कचरा गोळा करण्यासाठी सरकारी गृहनिर्माण संस्थांना डबेवाटप खुशबू यांनी केले. लहान मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी त्यांनी मुलांच्या वयोगटानुसार चित्रकला स्पर्धा आयोजित केली. नागरिकांसाठी मतदारनोंदणी शिबीर, तहसील कार्यालयातून दाखले मिळविण्यासाठी अनेकदा खेपा घालाव्या लागतात, त्यासाठी तहसील कार्यालयाच्या मदतीने दाखले तयार करून देण्यासाठी शिबिरे आयोजित केली. ‘लाडकी बहीण योजने’चे अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली. अनेक निराधारांना आधार देण्याचे कामही त्यांनी केले आहे. त्यांपैकी काहींची सोय कर्जत येथील आश्रमात, तर कुणाची टिटवाळा येथील आश्रमात सोय केली. प्रभागातील दोन मुलींची सोय त्यांनी टिटवाळा आश्रमात केली. त्या मुलीकडे खुशबू लक्ष ठेवून असतात. त्यामुळे निराधारांचा त्या आधारवड ठरल्या आहेत.
कोपर हा पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने, जोशी हायस्कूलजवळील पुलावर वाहतुकीचा ताण येत होता. या ठिकाणी होणारी वाहतुककोंडी रोखण्यासाठी वाहतूक विभागाशी चर्चा करून जोशी हायस्कूल ते कानविंदे चौक हा रस्ता ‘एक दिशा मार्ग’करून दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस उपलब्ध करून वाहतुककोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय, रस्ते डांबरीकरण, फूटपाथ, विद्युत व्यवस्था यांसारखी विविध कामे नागरिकांच्या समस्या ओळखून त्यांनी केली. खुशबू यांना समाजकारणाचे बाळकडू हे त्यांचे वडील पद्माकर यांच्याकडून मिळाले. त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी पितृछत्र हरपले. वडिलांकडून मिळालेला वारसा आणि आई सुनंदा यांच्याकडून मिळालेले संस्कार यांमुळेच आतापर्यंतचे यश संपादन करता आले असल्याचे त्या सांगतात.
खुशबू शाळेत असताना त्यांच्या वर्गातील एका विद्यार्थ्याला शुल्क न भरल्यामुळे वर्गाच्या बाहेर उभे राहावे लागत होते. ही बाब खुशबू यांना खुपली. त्यांनी आईला आपण त्याचे शुल्क भरूया का, असे विचारले. आईनेही त्याला लगेचच होकार दिला. तो विद्यार्थी आणि त्याचे कुटुंबीय आजही त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या वडिलांकडेही इतरांना मदत करण्याचे गुण होते. तेच गुण खुशबू यांच्यातदेखील आले आहेत. वडिलांविषयी लोक सांगतात, तेव्हा त्यांचा खूप अभिमान वाटतो, असेही खुशबू यांनी सांगितले.
नगरसेविका म्हणून काम करताना महापालिकेतील अधिकार्यांशी चांगले संबंध त्यांनी प्रस्थापित केले. त्यांचा फायदा काम करताना झाला. नागरिकांच्या समस्या सोडवायला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. आजही प्रभागातील लोक त्यांना ‘खुशबू’ अशी हाक अगदी हक्काने मारतात आणि त्याही त्यांच्यात तेवढ्याच आपुलकीने मिसळतात. काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण, अंगीभूत गुण आणि स्त्रीशक्तीची ताकद वेळेप्रसंगी दाखविल्यामुळे त्या गोष्टी कधी अडचणी वाटल्याचा नाहीत, असे खुशबू सांगतात.
राजकारण आणि समाजकारणात उत्तुंग भरारी घेणार्या खुशबू या एक यशस्वी उद्योजिकादेखील आहेत. सुपारीच्या पानापासून त्या प्लेट बनविण्याचे कामदेखील करतात. दिसायला आकर्षक आणि ‘इकोफ्रेंडली’ अशा त्यांच्या या प्लेट्सना खूप मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे या प्लेट्स तयार केल्या जातात. खुशबू यांना पाककलेची देखील आवड आहे. त्यामुळे व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून त्या आपली आवडही जोपासतात. संघ परिवाराशी संबंधित अनेक संस्थांशी खुशबू या जोडलेल्या आहेत. त्या संस्थांच्या विविध पदांवर कार्यरत आहेत. “सुशिक्षित तरुणींनी राजकारणात यावे, पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, याचे त्यांनी भान ठेवून काम केले पाहिजे. नगरसेविकापदानंतर इतर कोणते पद मिळाले, तर त्याला न्याय द्याायला नक्की आवडेल,” असा मानसही त्यांनी व्यक्त केला.
“भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी राजकारणात काम करण्याची संधी दिली. निवडणुकीच्या रिंगणात अनेक मातब्बर असताना चव्हाण यांनी खुशबू यांच्या नवीन चेहर्याला प्राधान्य देत महापालिका निवडणुकीत तिकीट दिले. रविंद्र चव्हाण यांची काम करण्याची पद्धत आणि बोलण्याची पद्धत मला जास्त भावते,” असेही खुशबू आवर्जून नमूद करतात.