आजची पिढी ही मोबाईलच्या युगात वावरणारी. तेव्हा, हिंदू धर्मातील सण, संस्कृती आणि परंपरा यांची नवीन पिढीला माहिती व्हावी आणि एक सशक्त समाज निर्माण व्हावा, यासाठी बालसंस्कार वर्गाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या हेमा नरेंद्र पवार कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी...
हेमा यांचे बालपण जळगावमध्ये गेले. त्यांचे शालेय शिक्षण आर.आर. विद्यालय येथून झाले. त्यानंतर त्यांनी एम.जे महाविद्यालयातून मानसशास्त्रात पदवी संपादन केली. पत्रकारिता अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले. त्यांनी जळगावमध्ये असताना ‘तरूण भारत’सह अन्य काही वृत्तपत्रांत कामही केले. शालेय जीवनात त्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभागही घेतला होता. तसेच त्यांना खेळाची आवड असल्याने बॉस्केट बॉल आणि कबड्डी हे खेळही त्या खेळत होत्या. हेमा यांच्या कुटुंबात आई विजया, वडील मधुकर आणि दोन भाऊ असे पाच जण. हेमा यांचा विवाह विद्यार्थी परिषदेत कार्यरत असलेल्या नरेंद्र पवार यांच्याशी झाला. प्रत्येक पुरुषांच्या यशामागे एक स्त्री असते, त्याप्रमाणे नरेंद्र यांनी भाजपचे नगरसेवक, उपमहापौर, आमदार अशी पदे भूषविताना सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला होता. पवार कुटुंबात आलेल्या हेमा यांनीही त्यांचे सामाजिक काम पाहून त्यातून प्रेरणा घेतली. त्यामुळे एखादी सामाजिक संस्था असावी, असे त्यांना वाटू लागले. त्यातूनच ‘कल्याण विकास फाऊंडेशन’ची २०१५-१६ मध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली. महिला आणि विद्यार्थी यांना केंद्रस्थानी ठेवून ‘कल्याण विकास फाऊंडेशन’ कार्यरत आहेत आहेत.
‘कल्याण विकास फाऊंडेशन’ने १५० मुलींना दत्तक घेतले आहे. त्यांचा शालेय फीचा खर्च संस्थेतर्फे केला जातो. कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील ५४ शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले जाते. आतापर्यंत दीड लाखांहून अधिक वह्यांचे वाटप केले आहे. सिद्धेश्वर आळी प्रभागातील महिलांसाठी ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचा शो ठेवला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती व्हावी, याकरिता महिलांसाठी आयोजन केले होते. संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी हळदीकुंकू समारंभदेखील आयोजित केला जातो. ‘सुकन्या योजने’मार्फत शंभर मुलींचे पोस्टात निशुल्क अकाऊंट उघडून दिले असून, त्याचा संपूर्ण हफ्ता संस्थेतर्फे भरला जातो. तहसीलदारांमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखले वाटप शिबीर आयोजित करून दाखले उपलब्ध करून दिले जातात. कल्याणमधील नामवंत १२ कुटुंबीयांचा सत्कार व त्यांच्या नावाने दिनदर्शिका वाटप संस्थेने केले आहे, जेणेकरून नामवंत व्यक्तींची माहिती आणि महती नवीन पिढीला मिळावी, हा हेतू दिनदर्शिका वाटपामागे होता. विविध शासकीय योजनेचे शिबीर प्रभागात लावले आहेत. महिलांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पतपेढीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ‘जागतिक महिला दिना’निमित्त संस्थेतर्फे ७० गरजू मुलींचे निशुल्क सुकन्या योजनेमार्फत खाते उघडून देण्यात येणार आहे व त्यांचा पहिला हफ्ता संस्थेतर्फे भरला जाणार आहे.
हेमा या भारतीय जनता पार्टीत महिला मोर्चाच्या कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सक्रिय काम करीत आहेत. हेमा या ‘विश्व मांगल्य सभा’ संस्थेच्या कल्याण जिल्ह्याच्या अध्यक्षा आहेत. समाजात जिजाऊंसारखी आई घडवणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी काम करतात. सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. आपला इतिहास, धर्म, सण, संस्कृती याविषयीची माहिती बरेचदा पालकांनाही नसते. म्हणूनच ‘विश्व मांगल्य संस्थे’चा उद्देश समाजात चांगली आई घडविणे हा आहे. सापर्डे, उंबर्डे अशी कल्याणच्या आजूबाजूची गावे आणि कल्याणमधील शाळेत संस्कारवर्ग घेतले जातात. शालेय मुलांना रामाच्या गोष्टी, स्तोत्र, सणवारांची माहिती, त्यांचा उद्देश शिकविला जातो. मुले इंग्रजी माध्यमात शिकतात. या शाळांमध्ये मुलांना हिंदू सणउत्सवांविषयी माहिती दिली जात नाही. ही बाब लक्षात घेता, मुलांना सणाविषयी आत्मीयता निर्माण करण्याचे काम संस्था करते. समाजाची जडणघडण चांगल्या पद्धतीने व्हावी, हाच यामागचा उद्देश आहे. तसेच साहित्य वाचनाची गोडी मुलांमध्ये निर्माण व्हावी, असाही त्यामागील उद्दात हेतू.
हेमा पवार यांच्यात सामाजिक कार्याचे बीज पती नरेंद्र यांच्यामुळे रोवले गेले. सामाजिक कार्य करताना हेमा यांना अनेक अडचणींचा सामना आजही करावा लागतो. पण, पती नरेंद्र पवार यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे अनेक कामे सोपी होत असल्याचे त्या सांगतात. त्यामुळे त्या अडचणी फार काही मोठ्या वाटत नाही. “महिलांमध्ये अडचणींवर मात करण्याची एक उपजत कला असते, त्यामुळे कामे सहज होतात. आतापर्यंत जे यश मिळाले आहे, त्यात माझ्या टीमचा मोठा वाटा आहे. टीमवर्कशिवाय हे काम होऊ शकत नाही. तसेच कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही. आमच्या प्रभागात ज्येष्ठ नागरिकांचा प्रश्न मोठा आहे. मुले परदेशात स्थायिक झाली आहेत आणि आईवडील येथे राहतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा हा मोठा प्रश्न या भागात आहे. त्यांच्यासाठी एखादी संस्था उभी करण्याचा माझा प्रयत्न असेल. वृद्धाश्रम नसेल, पण ज्येष्ठांचे तिथे एक तास का होईना मनोरंजन होईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अशी संस्था उभी करण्याचा मानस आहे. बचतगटांना काम मिळवून देणे आणि स्वयंरोजगार मिळवून देण्याचाही प्रयत्न आहे. तसेच सिद्धेश्वर आळी प्रभागातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे,” असे हेमा पवार सांगतात.
त्या पुढे म्हणतात की, ”आता कुठे माझ्या कामाला सुरूवात झाली आहे. अजून खूप काम करायचे बाकी आहे. एक टक्के मुलांमध्ये परिवर्तन घडले तरी खूप काही मिळविले असे वाटेल. विद्यार्थ्यांना आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची माहिती व्हावी, म्हणून कार्यक्रम घेतला होता. संस्कृतीदर्शन कार्यक्रमातून नागपंचमीपासून दिवाळीपर्यंतच्या सर्व सणांचे महत्त्व पटवून दिले होते. महिलांनी स्वत:ला कधीही कमी समजू नये. तिला जे आवडते, ते स्वत:मधील क्षमता ओळखून काम करत राहावे,” असा संदेशही हेमा महिलांना देतात.