भारतीय महिलांमध्ये आरोग्य विषयक जागृतीचे प्रमाण वाढते
पॉलिसीबझार कंपनीकडून प्रकाशित झाली माहिती
08-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारतातील महिलांमध्ये आरोग्यविषयक जागृतीचे प्रमाण वाढत असल्याचे नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका माहितीमधून स्पष्ट झाले आहे. खासगी विमा कंपनी असलेल्या पॉलिसीबझार कंपनीकडून त्यांच्या विम्यासाठी झालेल्या नोंदणींची माहिती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या महानगरांमधील पगारदार महिलांकडून ही नोंदणी होत आहे. यातून महिलांचा वाटा हा फक्त बचतीपुरताच मर्यादित न राहता आता महिला गुंतवणुकदारही बनत आहेत हे स्पष्ट होते.
महिलांकडून आता मुदत विमा, आरोग्य विमा, युनिक लिंक्ड इंश्युरन्स यांसारख्या महत्वाच्या आर्थिक साधनांमध्ये महिला आता गुंतवणुक करत आहेत. यातील मुदत विमा घेणाऱ्यांमध्ये पगारदार महिला अधिक आहेत, मोठ्या महानगरांमधील महिला या युनिक लिंक्ड इंश्युरन्स यामध्ये गुंतवणुक करत आहेत. यातून महिलांचा आपल्या स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचा प्रयत्न दिसतो असे कंपनीकडून या माहितीवरच्या प्रकाशित झालेल्या अभ्यासात नमुद करण्यात आले आहे.
पॉलिसीबझार कंपनीकडून प्रकाशित झालेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात १८ टक्के महिलांनी मुदत विमा खरेदी केला, या नोंदणी करणाऱ्या महिलांमध्ये पगारदार महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यापुढे ४९ टक्के महिलांनी मुदत जीवन विमा घेतला आहे. मुदत विमा घेणाऱ्यांमध्ये ३९ टक्के महिला या गृहिणी आहेत, तसेच व्यावसायिक, स्वयंरोजगारित महिलांमध्ये मुदत विमा घेणाऱ्या महिलांचा टक्का हा फक्त १२ टक्के इतकाच आहे.
मोठ्या महानगरांतील महिलांबरोबरच छोट्या शहरांतील महिला देखील विम्यासाठी नोंदणी करण्यामध्ये पुढे आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये या महिलांची संख्या १५ टक्के इतकी होती. दोनच वर्षात म्हणजे २०२५ पर्यंत ही संख्या २२ टक्क्यांपर्यंत पोहोचली. आतापर्यत ७०-७५ टक्के महिलांनी १० लाखांपेक्षा अधिकच विमा उतरवला आहे. यामुळे आता महिलांमध्येही आर्थिक साक्षरते बरोबरच आरोग्यविषयक साक्षरतेचीही भर पडली आहे. महिला सक्षमीकरणातील ही मोठी गोष्ट मानली जात आहे.