नवी दिल्ली: (rekha gupta) आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना २५०० रुपये देण्यासाठी दिल्ली सरकारने 'महिला समृद्धी योजने'स मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून लवकरच नोंदणी सुरू होईल, अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली आहे.
दिल्ली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस महिला समृद्धी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पत्रकारपरिषदेस संबोधित केले. त्या म्हणाल्या, महिला दिनाचे औचित्य साधून दिल्ली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळाने महिला समृद्धी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि हे आश्वासन भाजप सरकार पूर्ण करत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने दिल्लीच्या अर्थसंकल्पात ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. योजनेच्या कार्यान्वयासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून त्याचे अध्यक्षपद मुख्यमंत्री म्हणून आपल्याकडे असणार आहे. त्याचप्रमाणे या योजनेसाठी एक पोर्टल सुरू करण्यात येणार असून त्याची नोंदणीदेखील लवकरच सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी भाषण केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारसोबत डबल इंजिन सरकार म्हणून, दिल्लीला अधिक सुरक्षित आणि समृद्ध बनवू शकेल असे प्रत्येक काम करण्याचे नियोजन केले आहे. गेल्या १५ दिवसांत, दिल्लीच्या भाजप सरकारने दिल्लीतील बहिणींच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या अनेक योजनांवर चर्चा केली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यापासून ते पीसीआरला महिलांशी जोडण्यापर्यंत आणि त्यात महिला कॉन्स्टेबलची उपस्थिती समाविष्ट करण्यापर्यंत, दिल्लीत पिंक पीसीआरद्वारे पिंक पोलिस स्टेशनची संख्या वाढवण्याचे काम केले जाईल, असेही मुख्यमंत्री गुप्ता यांनी आपल्या भाषणात सांगितले.