जागतिक महिला दिन विशेष : एसबीआयकडून महिलांसाठी नवी कर्ज योजना

महिला नेतृत्वाला बळ देण्याचा बँकेचा उद्देश

    08-Mar-2025
Total Views |
bi
 
 
नवी दिल्ली : जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र महिलांसाठी विशेष योजनांची घोषणा होत आहे. अशातच भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय कडून महिला नेतृत्वाला बळ देण्यासाठी नवी कर्ज योजना जाहीर केली आहे. ही नवी योजना एसबीआय अस्मिता नावाने ओळखली जाणार आहे. ही एसएमई लोन योजना आहे. महिला क्षेत्रातील नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी , त्यांच्यातील उद्यमशीलतेला बळ देण्यासाठी ही योजना आणण्यात आल्याचे बँकेकडून जाहीर करण्यात आले आहे. योजनेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची छाननी करणे अत्यंत सुलभ पध्दतीने करण्यात येणार आहे. त्यामुळे या साठी लागणारा वेळही कमी होणार आहे.
 
काय आहे ही योजना ?
 
ही एक कोलॅटरल फ्री योजना म्हणजे या योजनेतून कर्ज घेण्यासाठी कुठलेही मालमत्ता तारण ठेवावे लागणार नाही. यातून उद्योजिकांना प्रशिक्षण देण्याची सुविधा देखील देण्यात येणार आहे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम म्हणजे एमएसएमई क्षेत्रासाठी ही योजना खूप महत्वाची ठरणार आहे. यात महिला उद्योजकांना प्रशिक्षणाबरोरच मार्गदर्शन सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.
 
एसबीआयकडून खास या योजनेसाठी नारीशक्ती प्लॅटिनम रुपे डेबिट कार्ड लाँच केले जाणार आहे. हे १०० टक्के पुनर्वापर करता येण्याजोगे कार्ड आहे. या कार्डाबरोबरच महिलांना मनोरंजन, खरेदी, सहली यांसारख्या सुविधा पुरवणे शक्य होणार आहे.
 
भारतीय स्टेट बँक म्हणजे एसबीआयचे अध्यक्ष चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की “एसबीआय अस्मिता याची रचना अतिशय सुलभ असून कुठल्याही महिलांना त्याचा वापर करता येईल. महिलांनी उद्योजक व्हावे, त्यांच्यामध्ये यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा विकास व्हावा यासाठी ही योजना अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे.”