पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जागतिक महिलादिनी त्यांच्या अभिवादनाचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडण्यात आला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी, यानिमित्ताने अहिल्यादेवींच्या आठवणी जाग्या केल्या. अहिल्यादेवींच्या माहेरचे ते नववे वंशज आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषणाला, आत्मीयतेची जोड होती. त्या भाषणाचा सार पुढीलप्रमाणे...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे योगदान केवळ महाराष्ट्र पातळीवर नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे असे आहे. आक्रमकांनी तोडफोड केलेली मंदिरे, पवित्र तीर्थस्थाने यांचा जीर्णोद्धार त्यांनी केला. घाट, धर्मशाळा उभारल्या. एक न्यायप्रिय आणि कर्तबगार महिला शासक म्हणून, त्यांचे सदैव आदराचे स्थान आपल्या मनामध्ये आहे आणि यापुढेही राहील. अठराव्या शतकात, मराठेशाहीतील इतिहासाच्या पानापानांमध्ये त्यांच्या ‘लोककल्याणकारी राज्य’ संकल्पनेचे कार्यपैलू आपल्याला झळकलेले दिसतात. त्या ’मालवा की महारानी’ तर होत्याच परंतु, त्याहीपेक्षा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्या ‘लोककल्याणकारी राज्य’ या संकल्पनेच्या, त्या आश्वासक आणि विस्तारकदेखील होत्या. त्या राणी होत्या, तरी पण आपण त्यांना माता आणि देवी असे का मानतो, यामध्येच त्यांच्या कार्याचे मोठेपण सामावलेले आहे.
जागतिक स्तरावरदेखील इतिहासकरांनी आणि लेखकांनी, त्यांच्या कार्याची नोंद घेतलेली दिसून येते. लेखक जॉन की लॉर्ड थॉमस लॉरेन्स यांनी, त्यांचे प्रशासन कौशल्य आणि न्यायप्रियतेचे कौतुक करीत, त्यांना 'Philosofer Queen of India, just as Elezabeth (I) was in England’ असे संबोधत, त्यांचा गौरव केला आहे.
लॉरेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना, भारताच्या कॅथरिन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट असे म्हटले आहे. “ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल,” असेही लॉरेन्स म्हणतात.
सुशासनाची त्यांची संकल्पना आणि भिलकवडीचा प्रयोग, मोठा विलक्षण आहे. त्याकाळी दळणवळणाची अथवा वाहतुकीची साधने मर्यादित होती. यात्रेकरू, वाटसरू यांना जंगलातून मार्गक्रमण करत असताना, भिल्लांकडून लुटले जायचे. याबाबतच्या तक्रारी त्यांना प्राप्त झाल्यानंतर, त्यांनी या समस्येच्या मूळाशी जाऊन असे समाधान शोधले की, यात्रेकरू आणि वाटसरूंना सुरक्षित प्रवासाची हमीही मिळाली आणि भिल्लांना रोजगार, उपजीविकेचे साधनही मिळाले. भिल्लांना दरबारात उभे करून, त्यांना विश्वासात घेत यात्रेकरू आणि वाटसरूंना सुरक्षा पुरवून, पुढे नेण्याची जबाबदारी त्यांच्यावरच टाकण्यात आली. यासाठी यात्रेकरू, वाटसरूंकडून, नाममात्र एक कवडी शुल्क आकारण्यास त्यांनी अनुमती दिली. इतिहासात भिलकवडी म्हणून त्याची नोंद झाली असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या संवेदनशील प्रशासन नैपुण्याचे, आधुनिक काळात आपण ज्याला ॠेेव र्ॠेींशीपरपलश म्हणतो, त्याचे ते महत्त्वाचे उदाहरण आहे.
सैन्यामध्ये महिलांच्या तुकडीची निर्मिती, शेतकर्यांना करमाफी आणि तलाव, विहिरींच्या माध्यमातून सिंचन सुविधा, जमीन मोजणी, गोपालनाचा पुरस्कार, दुर्मीळ ग्रंथांची हस्तलिखिते तयार करून त्यांचे जतन, विद्याप्रसार आणि ज्ञानदान याचा पुरस्कार, संस्कृत पाठशाळा, गोरगरिबांसाठी अन्नछत्र उभारणी, सतीप्रथेला विरोध आणि संपत्तीमध्ये स्त्रियांना अधिकार, पतीचे निधन झालेल्या महिलांना, दत्तक पुत्र घेण्याबाबत पुरस्कार या उल्लेखनीय योगदानाबरोबरच, पर्यावरण रक्षण आणि पर्यावरण संतुलन यादृष्टीनेदेखील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. पशूपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी राखीव कुरणे, शेतजमीन यांची व्यवस्था केली. पीकांसह शेतजमीन ताब्यात घेऊन, त्याचा उचित मोबदला शेतकर्यांना दिला जाई आणि याठिकाणी पशूपक्षी, गुरे यांच्या चरण्याची व्यवस्था होत असे. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, या दृष्टीनेदेखील त्यांनी नियोजन केलेले दिसून येते. मुख्य प्रवाहापासून नागरी वापरासाठी पाणी मिळावे, यासाठी पाण्याचा वेगळा प्रवाह काढण्यात आला. शेतकर्यांनी 20 झाडे लावणे बंधनकारक केले. तसेच, विनापरवानगी झाड तोडल्यास,मोठी शिक्षा केली जात होती.
त्यांनी बांधलेले घाट, बारव, विहिरी, कुंड आणि मंदिरे हे आजही, 300 वर्षांनंतर सुस्थितीत आहेत. एवढी मोठी आणि सुबक कामे करताना, नैसर्गिक साधन संपत्तीचा समतोल राखून वापर करण्यात यावा, अशा त्यांच्या कारागिरांना स्पष्ट सूचना असायच्या. स्थापत्यकामासाठी स्थानिक खनिजे आणि दगड वापरण्यावर भर देण्यात आला. वनसंरक्षण आणि वनसंवर्धन यादृष्टीने अतिशय पूरक असे धोरण, त्यांनी राबविले. रस्त्याच्या दुतर्फा, ओसाड जमिनी, डोंगर याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन दिले.
सतत मोहिमेवर असलेले मल्हारराव होळकर यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेले मार्गदर्शन, पत्रव्यवहार याआधारे माळवा राज्यात, अद्ययावत तोफखाना आणि दारूगोळा निर्मितीसाठी त्यांनी स्वत: भेटी देऊन जागा निश्चित केली. कुशल कारागिरांची नेमणूक केली. इतकेच नव्हे, तर कारागिरांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला मिळेल, यादृष्टीने जातीने लक्ष पुरविले. शस्त्र आणि शास्त्र अशा दोन्ही विषयात त्या पारंगत होत्या.
शेतकरी आणि रयत म्हणजे, आपल्या राज्याचा आत्मा होय! त्याला जपले पाहिजे, जगविले पाहिजे या संवेदनशीलतेने त्यांनी राज्यकारभार केला. दुष्काळ सदृष्य परिस्थिती असेल, काही कारणाने पीक निघाले नसेल, तर शेतसारा माफ करण्याचा निर्णय त्या घेत.
महेश्वर या छोट्या गावाचे रूपांतर त्यांनी अर्थ, उद्योग, व्यापार यादृष्टीने महत्त्वाचे ठरेल, अशा राजधानी स्वरूप नगरात करून दाखविले. धातूचे काम, कारागिरी, वस्त्रनिर्मिती, विणकरांच्या कौशल्याला प्रोत्साहन दिले. महेश्वरी साड्यांची निर्मिती, महेश्वरी रेशीम आजही प्रसिद्ध आहे. सर्वच क्षेत्रातील निष्णात कारागिरांना त्यांनी, महेश्वरमध्ये येऊन उद्योग, उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले.
अहिल्यादेवींची न्यायप्रियता आणि न्यायदान पद्धती, अनेक इतिहासकारांनी गौरवली आहे. माळवा राज्यातील धातूउद्योग आणि होळकरांची टांकसाळ, याचा त्यावेळी खूप बोलबाला होता. महेश्वरच्या टांकसाळीतून इतर राज्यांचीदेखील चांदी घेऊन नाणी पाडली जायची. ‘चालू द्या होळकरी टाकी’ हा वाक्यप्रचार, आजही प्रचलित आहे. व्यापारी, उद्यमींना अल्प व्याजाने कर्ज दिले जायचे, ज्यायोगे महेश्वरमध्ये व्यापार आणि त्यायोगे आलेली समृद्धी, चिरकाळ टिकून होती.
‘आमचा पुत्र आणि अहिल्याबाईने इतका उत्कृष्ट राज्यकारभार चालविला आहे,’ असे गौरव उद्गार त्यांचे सासरे मल्हारराव होळकर आणि पत्नी गौतमाबाई यांनी काढले आहेत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव यांना वीरमरण आले. त्यांना सासू सासरे यांनी सती जाण्यापासून रोखले. त्यांनी राजवस्त्र आणि अलंकार यांचा त्याग करून, आजन्म पांढरीशुभ्र वस्त्रे वापरली. न्यायदानासाठीदेखील त्या पांढर्या शुभ्र गादीवर त्याच रंगाच्या घोंगडीचे आसन करून, बसत असत. ’तुझा जन्म या प्रजेसाठी आहे, तू या प्रजेची माता हो. या रयतेचे, गोरगरिबांचे प्रपंच सुखाचे कर’, ही पितृतुल्य सासरे मल्हारराव होळकर यांची आज्ञा, त्यांनी आजन्म पाळली. ब्रिटिश इतिहासकार जॉन की त्यांच्या कार्याचा गौरव करताना म्हणतात, Ahilyabai's reign stands as a golden age of benevolence and wisdom. She was a rare combination of strength and humility, and her legacy has shaped Indian governance for centuries to come.
त्यांची वैयक्तिक ग्रंथ संपदा खूप मोठी होती. त्यात वेद, उपनिषदे, भगवद्गीता, तत्त्वज्ञान, पुराणे, रामायण, महाभारत यांचा समावेश होता. त्यांनी साहित्य टिकले तर संस्कृती टिकते, या जाणीवेने दुर्मीळ ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती तयार करून घेतल्या. अनंत फंदी, मोरोपंत यांना लेखन कार्यासाठी प्रोत्साहन दिले.
महेश्वर येथील त्यांच्या राजवाड्यावर, त्यांनी केलेली प्रतिज्ञा लिहिलेली आहे. ही प्रतिज्ञा म्हणजे,एका महाराणीने लोककल्याणकारी राज्याचा जनतेच्या पुढ्यात मांडलेला अठराव्या शतकातील वचननामाच आहे. ज्याची पूर्तता त्यांनी आपल्या पुढील कारकिर्दीत कसोशीने केली. ती प्रतिज्ञा आपण सर्व लोकप्रतिनिधींनीदेखील वाचली पाहिजे, आत्मसात केली पाहिजे. कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वत: जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे काही काम करीत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या ज्या जबाबदार्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या मला पार पाडायच्या आहेत. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, अतुलनीय कार्य करूनही आपला नामोल्लेख न करता, पूर्णत्वास गेलेल्या प्रत्येक वास्तुवर, कामावर श्री शंकर आज्ञेवरून अशी मोहोर उमटविण्यात येत असे.
स्त्रीला संपत्तीमध्ये अधिकार देणे, पतीचा मृत्यू झाला असेल आणि अपत्य नसेल, तर स्त्रीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार अहिल्याबाईंनी प्राप्त करून दिला. सतीप्रथेला विरोध केला. समाजातील स्त्री ही अबला नसून सबला आहे, यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या राणी होत्या, तरी पण आपण त्यांना माता किंवा देवी असे का मानतो? यामध्येच त्यांच्या कार्याचा मोठेपणा सामावला आहे. मातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व अशा चारही कसोट्यांवर माता अहिल्यादेवींचे कार्य असामान्य असून, पुढील अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहील.
आपल्या राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे, दि. 31 मे 1725 रोजी त्यांचा जन्म झाला. आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब. ईश्वराबद्दलची निष्ठा आणि सामाजिक समतेचा संस्कार, बालपणी त्यांच्यावर आईवडिलांनी म्हणजे चौंडीगावचे पाटील शिवभक्त माणकोजी आणि सुशीलाबाई यांनी बिंबवला. प्रज्ञावंत आणि मूलत:च धैर्यवान असलेल्या अहिल्याबाई शिंदे, आठव्या वर्षी सौभाग्यवती आहिल्यादेवी खंडेराव होळकर बनल्या. पराक्रमी सासरे मल्हारराव होळकर यांनी, त्यांच्यातील गुणांना प्रोत्साहन दिले. पती खंडेराव होळकर यांना वीरमरण आले. मल्हाररावांनी त्यांना सती जाण्यापासून परावृत्त केले. त्यानंतरचे त्यांचे जीवनकार्य म्हणजे प्रजाहित, महाराणी असूनही वैराग्यभाव, इंग्रजांचा धोका वेळीच ओळखणार्या दूरदृष्टीच्या मुत्सद्दी राज्यकर्त्या, महिलांची सैन्य तुकडी निर्माण करणारी महान योद्धा, न्यायप्रिय शासक अशा अनेक गुणवैशिष्ट्यांचा प्रेरक इतिहास आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा शासनकाळ म्हणजे शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता यांचे युग होते. शेतकरी हा राज्याचा आधारस्तंभ असतो, हे त्यांच्या विचारांचे सूत्र होते. त्यामुळे त्यांनी शेतकर्यांना आधारभूत होतील, असे कायदे केले. शेतकर्यांना आपल्या शेतीतील उत्पादन, त्यांच्या सोईप्रमाणे कुठेही विकण्याची मुभा होती.
जानेवारी 1761 साली अहमदशहा अब्दालीबरोबर झालेला पानिपतचा भीषण रणसंग्राम, मराठ्यांच्या इतिहासाला वेगळे वळण देऊन गेला. पानिपतावरून येणार्या प्रतिकूल बातम्या, अहिल्यादेवींवर विजेसारख्या कोसळत असतानाही त्या डगमगल्या नाहीत. पानिपत युद्धाच्या कठीण काळात, वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी मदतकार्य सुरूच ठेवले. सैनिकांसाठी अखंड अन्नछत्र आणि आरोग्यसेवा त्यांनी पुरविली.
गुजरातमध्ये ज्या पद्धतीने ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ उभारण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे ‘स्टॅच्यु ऑफ वुमेन इम्पॉवरमेन्ट’ उभारण्यात यावा आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची माहिती येणार्या पिढ्यांना व्हावी, यादृष्टीने संग्रहालय बनविण्यात यावे, यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली, बैठक घेण्यात येणार आहे. चौंडी येथील त्यांचे जन्मस्थान, याला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि यासर्व ठिकाणाचा विकास व्हावा यादृष्टीनेदेखील आपण प्रयत्न करीत आहोत.
भारत हे राष्ट्र म्हणून 1947 साली अस्तित्वात आले, असे मानणार्या आणि लिहिणार्या मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 18व्या शतकात जागवलेला राष्ट्रधर्म आणि आसेतु हिमाचल मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार, याचा पुन्हा एकदा अभ्यास करावा. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ संकल्पनेची बीजे, त्यांच्या या असामान्य कार्यात आपल्याला दिसून येतील. अत्यंत धर्मपरायण आणि शिवभक्त असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी, श्रावण महिन्यात शिवस्तोत्र, भजन-कीर्तनाचे स्वर कानी पडत असताना दि. 13 ऑगस्ट, 1795 रोजी देह ठेवला. सर्वांच्या गंगाजळ निर्मळ मातोश्री साहेब परलोकीच्या प्रवासी निघून गेल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशताब्दी वर्ष आपण साजरे करीत आहोत. त्यांचे कार्य आपल्याला दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत राहील. त्यांच्या माहेरच्या वंशातील, मी एक घटक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्य कर्तृत्वाने इतिहासाच्या पानांवर ‘लोककल्याणकारी राज्य’ संकल्पना म्हणजे काय, ते सुवर्ण अक्षरांनी नोंदविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन.
राम शिंदे
(लेखक महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आहेत.)