पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी मोहिम राबवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सूचना
08-Mar-2025
Total Views |
पुणे : पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी मोहिम राबवा, अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या आहेत. पुण्यातील मुख्य चौकात एका तरुणाने उद्दामपणा करत भर रस्त्यात अश्लील हावभाव करत लघुशंका केल्याच्या घटनेची त्यांनी गंभीर दखल घेतली.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "या घटनेतील तरुणाचा तपशील पोलिसांना मिळाला असून लवकरच त्याच्यावर कारवाई होणार आहे. पुणे शहरातील रस्त्यांवरील सर्व सीसीटीव्ही मार्च महिन्यात कार्यान्वित होतील. पोलिसांना या घटनेचे फुटेज मिळाले असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच शहरातील अशा वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवावी. राजकीय श्रेयवाद न खेळता सर्वांनी मिळून समाजात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. सरकारने पोलिसांना अधिक स्वायत्तता द्यावी आणि नागरिकांनीही जबाबदारीने वागावे," असे त्यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की, "ही घटना केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्यात अशा प्रकारच्या बेशिस्त आणि मुजोर वर्तनाची समस्या वाढत आहे. पैशाची गुर्मी आणि नशेच्या आहारी गेलेले काही तरुण समाजकंटकासारखे वागत आहेत. पोलिसांनी आणि प्रशासनाने यावर कठोर कारवाई करायला हवी. काही पालक आपल्या मुलांच्या चुकीच्या वागण्यावर पांघरूण घालत असल्यामुळे अशा घटना घडतात. हे प्रकार थांबवण्यासाठी समाज, कुटुंब, पोलीस आणि सरकारने एकत्रितपणे कठोर भूमिका घेतली पाहिजे," असे त्या म्हणाल्या.
नेमके प्रकरण काय?
एका तरुणाने एका गाडीतून उतरून मुख्य चौकात लघुशंका केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी विरोध केला असता त्याने उद्दामपणा केला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.