जागतिक महिला दिन विशेष : महिलांसाठीच चालवल्या जाणाऱ्या या योजना माहित आहेत का ?

महिला व्यावसायिकांना बळ देण्याचा मूळ उद्देश

    08-Mar-2025
Total Views |

women
 
 
नवी दिल्ली : जागतिक महिला दिन फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर साजरा होतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून महिला सक्षमीकरण हेच ध्येय ठेवून चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना आहेत. यासर्व योजना या महिलांमध्ये उद्योजकता वाढवून त्यातून महिलांचे आर्थिक सबलीकरण घडवून आणणे या उद्देशाने चालवल्या जातात. यांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य, उद्योजकता प्रशिक्षण, उद्योगांसाठी सुलभ कर्ज, यांसारखे सुविधा महिलांना दिल्या जातात. यातील मुख्य पाच योजनांची माहिती आपण करुन घेऊ.
 
१) प्रधानमंत्री मुद्रा योजना –
 
या योजनेचा मुख्य उद्देश हा महिला तसेच छोटे व्यावसायिक यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्यात उद्योजकतेची वाढ करणे हा आहे. यात या उद्योगांचे तीन गटांत वर्गीकरण केले जाते. शिशु उद्योग गटात ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या प्रकारात गृहोद्योग, छोटे व्यावसायिक यांचा समावेश होतो. दुसऱ्या उद्योग गटाला किशोर प्रकाराला म्हणतात, या उद्योग गटात ५० हजार ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज दिले जाते. शेवटचा येतो तो तरुण गट त्यात ५ लाख ते १० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. गेल्याच वर्षी सरकारकडून याची मर्यादा वाढवून १० ते २० लाखांपर्यंत करण्यात आली आहे. यांतून सर्व छोटे व्यावसायिक आणि महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे ध्येय ठेवले जाते.
 
२) उद्योगिनी योजना –
 
१८ ते ५५ वर्षे वयोगटातील महिलांना ज्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांमधील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरु केली गेली आहे. यातून ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. यामध्ये दिव्यांग तसेच विधवा महिलांना व्याजदरांत अधिकची सुट मिळते.
 
३) स्टँडअप इंडिया योजना –
 
ही योजनाच मुळात महिला आणि मागासवर्गातील उद्योजकांना प्रोत्साहन देणे हाच आहे. यात १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. यात निर्मिती उद्योगांना प्रोत्साहन दिले जाते. यासाठी सरकारकडून डिजीटल पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील मिळणारे कर्ज हे ७ वर्षांत टप्प्या टप्प्याने फेडता येते. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली.
 
४) अन्नपूर्णा योजना –
 
केंद्र सरकारकडून प्रामुख्याने खाद्यपदार्थ निर्मिती क्षेत्रात काम करु इच्छिणाऱ्या महिलांसाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. यात महिलांना ५० हजारांपर्यंत कर्ज मिळवता येते. या योजनेचा लाभ घेत महिलांना हे घेतलेले कर्ज ३ वर्षांत टप्प्या – टप्प्याने फेडता येते.
 
५) महिला उद्यमनिधी योजना-
 
ही योजना मुळात सीडबी म्हणजेच लघु उद्योग विकास बँककडून चालवली जाते. यामार्फत महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज दिले जाते. १० लाखांपर्यंतचे कर्ज मिळण्याची सुविधा यात आहे. त्यातून महिलांना दहा वर्षापर्यंतच्या कालावधीत हे कर्ज फेडता येते. याही योजनेची संपूर्ण माहिती या योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या योजनांचा लाभ घेताना महिलांनी संपूर्ण माहिती घेऊन आणि आवश्यक ती कागदपत्रांची पूर्तता करुनच मग या योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक कागपत्रांची यादी संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. त्याची माहिती जास्तीत जास्त महिला उद्योदजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.