‘मल्टिटास्किंग’ ही महिलांमधील उपजत कला : आ. डॉ. मनीषा कायंदे

    08-Mar-2025   
Total Views |

Manisha Kayande
 
१) सर्वप्रथम राजकीय क्षेत्राकडे तुम्ही कशा वळलात आणि या क्षेत्रात पदार्पणाची प्रेरणा कुणाकडून मिळाली?
 
- खरं तर मी लहानपणापासूनच माझ्या वडिलांसोबत वंदनीय बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणे सतत ऐकायचे. त्यांच्याबरोबर मुंबईत कुठेही भाषण होत असल्यास मी जात असे. त्यामुळे राजकीय क्षेत्राची एक गोडी होतीच. या क्षेत्रात यावे, ही लहानपणापासूनची एक सुप्त इच्छा होती. माझे वडील डॉक्टर होते. ते सामाजिक कार्यकर्ते होते. सामाजिक कामानिमित्त मी त्यांच्यासोबत पालघर, विक्रमगड, वस्तीपाडे, गावखेडे या सगळ्या ठिकाणी प्रवास करीत होते. घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे वातावरण होते. त्या माध्यमातून मी हळूहळू शिवसेनेत आले आणि नंतर शिवसेनेत मला विधान परिषदेवर संधी उपलब्ध झाली. जवळजवळ 1990-92 पासून माझा राजकीय प्रवास सुरु आहे.
 
२) राजकारणात आज मोठ्या संख्येने महिला दिसत असल्या तरी, महिलांची वाट वाटते तितके सुकर नाही. तेव्हा, एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्या अडचणींना तुम्हाला सामोरे जावे लागले का?
 
- राजकारण म्हटले की, अडचणी तर येतच राहतात. परंतु, आपण त्या अडचणींवर मात करायची असते आणि ती मी सातत्याने करीत आलेले आहे. त्यामुळे अडचणी या आव्हानपर असतात आणि आपल्याला काहीतरी शिकवून जातात.
 
३) सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेव्हा, एक महिला आमदार म्हणून या प्रश्नांना कशी वाचा फोडणार आहात?
 
- जिथे कुठे महिलांवर अन्याय, अत्याचार होतो, तिथे जाऊन आम्ही त्याची अतिशय गांभीर्याने दखल घेतो. घटनेला योग्य दिशा मिळावी, आरोपी कदापि सुटता कामा नये, यासाठी प्रयत्न करतो. मी शिवसेना महिला आघाडीचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. राज्यात जवळजवळ ‘एसटी महामंडळा’चे 250 बस आगार आहेत. आमच्या महिलांनी जवळपास 100 बस आगारांना भेट दिल्या आणि तिथे नेमक्या काय त्रुटी आहेत, याबद्दल माहिती घेतली. या सगळ्या त्रुटी आम्ही मंत्रिमहोदयांना कळवणार आहोत. ‘हिरकणी कक्ष’, स्वच्छतागृह, पाणी, महिला अधिकार्‍यांसाठी विश्रामगृहे या सगळ्याचा एक सर्वेक्षण अहवाल तयार करून आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांना देणार आहोत.
 
४) राज्यात सध्या ‘शक्ती’ कायद्याचीदेखील मागणी होत आहे. तेव्हा, या कायद्याची गरज आणि त्याचे स्वरुप याविषयी काय सांगाल?
 
- ‘शक्ती’ कायद्याचा विषय पुन्हा आता राज्याकडे येत आहे. ‘भारतीय न्याय संहिते’अंतर्गत जे नवीन कायदे आलेले आहेत, त्यांचे कुठेही ‘ओव्हरलॅपिंग’ होता कामा नये. सध्या अस्तित्वात असलेले कायदेदेखील बरेच सक्षम आहेत. योग्य पद्धतीने तपास करून योग्य कलमे लावली, तर कुठलाही आरोपी सुटणार नाही. स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर आधीच चार-पाच गुन्हे दाखल होते. काही लोक पे-रोलवर असतात. तरीसुद्धा ते नवीन गुन्हे करतात. त्यामुळे अशी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर कडक नजर ठेवली पाहिजे.
 
५) लोकप्रतिनिधी असण्याबरोबरच आपण एक गृहिणीदेखील आहात. तेव्हा या दुहेरी जबाबदार्‍या कशा सांभाळता? स्वत:च्या आवडीनिवडी, छंद जोपासण्यासाठी वेळ मिळतो का?
 
- महिला या बहुगुणी असतात. ‘मल्टिटास्किंग’ हे आम्हाला उपजत ज्ञात असते. त्यामुळे आम्ही काम करत राहतो. मला वन्यजीवांची आवड आहे. अभयारण्य फिरण्याची आवड आहे; समुद्रकिनारी फिरणे, व्यायाम, योगासने हे सगळे मी वेळ काढून करण्याचा प्रयत्न करते.
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....