उद्यमी 'सरीता'

    08-Mar-2025
Total Views |

Ashalata Kulkarni International Womens Day
 
Ashalata Kulkarni, International Women Day ) सृष्टीतील आदिम आणि निरंतर प्रवाही घटक म्हणजे नदी, जी शांतपणे वाहत... काठावरचे प्रदेश सुजलाम् सुफलाम् करीत मार्गक्रमण करते. त्याच धर्तीवर उद्योगजगतातील ‘उद्यमी सरिता’ गणल्या गेलेल्या ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेड’च्या सर्वेसर्वा आशालता मनोहर कुलकर्णी यांचा प्रवास आजच्या पिढीसाठी विशेषतः महिलावर्गासाठी प्रेरणादायी आहे.
 
अशिदा इलेक्ट्रॉनिक्स’ या स्वदेशी सुवर्ण कमळाचा ’कशिदा’ 54 वर्षांपूर्वी स्व. मनोहर उर्फ भाऊ कुलकर्णी यांनी उभारला, त्यावर यशस्वितेचा कळस आशालता उर्फ आशाताई कुलकर्णी यांनी चढवला. कला शाखेत संस्कृत विषयात ‘बी.ए.’ पर्यंत शिक्षण घेतलेल्या आशाताई आज वयाच्या 82व्या वर्षात आहेत. आजही त्या उद्योगजगतात आशावादीपणे कार्यरत आहेत. वयोपरत्वे त्यांनी घरात निवृत्ती घेतली असली तरी, मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहून त्या नवीन पिढीशी सोबत सहजगत्या जुळवून घेतात. सुजय व सुयश हे दोन्ही सुपुत्र ‘आशिदा’ची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. आशाताईंचे बंधु एस. डी. नाईक, त्यांच्या पत्नी वृषाली, नाईक यांची दोन्ही मुले तसेच भाऊंचे धाकटे बंधु सुनिल कुलकर्णी, पत्नी सीमा कुलकर्णी मुलगा व सुनेसह कंपनीत कार्यरत आहेत.
 
भाऊ, दीर, मुले, सुना, जाऊबाई या सर्वांच्या सोबतीने गृह, गृहस्थीसह कंपनीचा सर्व कारभार कुटुंब हाकत आहे. वार्धक्यातही तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने कंपनीच्या कार्यालयात दररोज चार तास काम करीत राहण्याचा शिरस्ता त्यांनी कायम जपला आहे. उद्योगप्रिय असलेल्या आशाताई ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील ‘आशिदा इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लिमिटेड’ या कंपनीत मुख्य व्यवस्थापकीय संचालिका म्हणून कार्यरत असून ‘आशिदा भाऊ कुलकर्णी ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी अखंडितपणे सेवारत आहेत. कंपनीच्या उत्कर्षासोबतच कंपनीत काम करणार्‍या शेकडो कामगारांना आणि अगणित गरजूंना उपजीविकेसह मदतीचा यथार्थ हात देण्याचे सत्कर्म त्यांनी अविरत सुरूच ठेवले आहे.
 
‘अत्रे कट्टा’, ‘व्यास क्रिएशन’, ‘ब्राह्मण सेवा संघ’ या संस्थांशी निगडित असलेल्या आशाताई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम आदी संस्थांच्या समाजोपयोगी कार्यात नियमित सहयोग देतात. याशिवाय विविध सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांनाही त्या आवर्जून उपस्थिती दर्शवितात.
 
“केवळ आपले घर आणि कुटुंब या चाकोरीत न राहता, प्रत्येकीने स्वतःला कोणत्या ना कोणत्या कार्यात गुंतवून ठेवावे. समाजाने आपल्याला घडवले आहे, तेव्हा त्या समाजाचे देणे आपण देत राहणे गरजेचे आहे. माझी आर्थिक स्थिती नाही, मला कसं जमेल? असे म्हणून कुढत राहण्यापेक्षा जमेल तसा समाजाला वेळ द्यावा. आपल्या अनुभवाचा इतरांना लाभ व्हावा, किंबहुना दुसर्‍यांना आधार वाटला पाहिजे,” असे जीवन सर्वांनी जगले पाहिजे,” असा प्रबोधनात्मक संदेश आशाताई समस्त महिलावर्गाला देतात.
 
(अधिक माहितीसाठी संपर्क : 9820282542)