प्रतिकूलतेने घडवलेले दूरदर्शी नेतृत्व

    08-Mar-2025
Total Views |
neelam patil
 
 
 
‘कोरोना’ काळात सगळे जगच कोलमडून पडल्यासारखे झाले होते. याच काळात जिद्दीने उभे राहून आपल्या पतीच्या साथीने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवून, आज कोट्यवधींच्या उलाढालीपर्यंतचा टप्पा गाठण्याचे शिवधनुष्य पेलले आहे, निलम पाटील यांनी. आपल्या ‘सपेक्ट प्रा. लि.’च्या माध्यमातून त्यांनी आज ही एवढी मोठी भरारी घेतली आहे. आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा हा लेख..
 
कुठल्याही मध्यमवर्गीय तरुणीसारखेच निलम यांनीही आधी शिक्षण पूर्ण करण्याला अधिक प्राधान्य दिले. इंग्रजीसारख्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. लग्नानंतर त्यांनी त्यांच्या पतीच्या कामात हातभार लावायला सुरुवात केली. त्यांचे पती संदीप पाटील हे सहकार क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान मार्गदर्शक म्हणून एका संस्थेत कार्यरत होते. अशातच 2020 साल उजाडले आणि अवघ्या जगाला ग्रासणार्‍या ‘कोरोना’ महामारीची साथ सुरू झाली. संपूर्ण जग एक झटका बसल्यासारखे स्तब्ध झाले होते. यातच निलम यांच्या पतींनाही काही कारणास्तव आहे त्या कामातून बाहेर पडावे लागले. आता पुढे काय, हा प्रश्न आ वासून उभा राहिला. परंतु, अशा काळातच खर्‍या जिद्दी माणसाचा कस लागतो. निलम या त्यांच्या पतीच्या बरोबरीने खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी ठरवले की, आता करायचा तो व्यवसायच, त्यातूनही तो सहकार क्षेत्रातच. पुन्हा नोकरी नाही!
 
यातूनच त्यांनी दि. २१ जुलै २०२० रोजी मुहूर्तमेढ रोवली गेली ती, ‘सपॅक्ट प्रा. लि.’ची. व्यवसायही तोच होता सहकार क्षेत्रातील संस्थांना कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रदान करण्याचा. ‘कोरोना’ काळातच या व्यवसायाला त्यांनी प्रारंभ केला. आधीच ‘कोरोना’चा महाभयंकर काळ आणि त्यातून सगळ्या जगावर आर्थिक कुर्‍हाड कोसळलेली. त्यामुळे त्यातून मार्ग काढत कंपनी टिकवणे, ग्राहक मिळवणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, हे सर्वच खूप आव्हानात्मक होते. परंतु, या सुरुवातीच्या काळात निलम यांना साथ लाभली ती त्यांच्या पतींची आणि सुरुवातीच्या सहकार्‍यांची. त्यांच्यामार्फत सातत्याने महाराष्ट्र धुंडाळून काढत त्यांनी व्यवसाय टिकवण्याचे काम केले.
 
संस्थेतर्फे राबविण्यात येणारे सर्व उपक्रम, त्यांची आखणी, त्यांची अंमलबजावणी, राबविण्यात येणारे सर्व प्रशिक्षणवर्ग, त्यांची आखणी हे सर्वच काम निलम बघतात. त्यांच्या सर्व कर्मचार्‍यांची हाताळणी, त्यांचे प्रशिक्षण हेदेखील निलमच हाताळतात. ‘सपॅक्ट’तर्फे सहकार क्षेत्रात कार्यरत सर्व संस्थांना सल्लागार सेवा पुरवली जाते. त्यामार्फत कर्मचार्‍यांचे प्रशिक्षणवर्ग, त्यांना ऑनलाईन-ऑफलाईन प्रशिक्षण, संस्थांची कार्यपद्धती, त्यात त्यांचा ताळेबंद कसा असावा, इथंपासून ते नवीन तंत्रज्ञान आत्मसात कसे करावे, या सर्वच विषयांवर मार्गदर्शन केले आहे. हे सुरू असताना निलम आणि त्यांचे पती संदीप यांच्या लक्षात आले की, आपण असे काही सॉफ्टवेअर तयार करू शकलो, तर ज्यातून या सर्वच संस्थांना एकाच माध्यमातून सर्व सेवा देता येतील. यातूनच त्यांनी तयार केले, ‘गुरुकुल’ नावाचे सॉफ्टवेअर, ज्या माध्यमातून या सर्व सहकारी संस्थांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देणे सोयीचे झाले आहे.
 
आपण जर आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहून प्रयत्न केले, तर यश नक्कीच पदरात पडते. आज ‘सपॅक्ट’ कंपनीचा प्रवास एका छोट्या व्यवसायातून आज पाच ते सहा कोटींच्या उलाढालीपर्यंत येऊन पोहोचला आहे. निलम अभिमानाने सांगतात की, “ते आमच्याबरोबर खंबीर उभे राहिले म्हणून आज हे साध्य झाले.” याचबरोबर ते त्यांच्या या यशासाठी सासरच्या मंडळींकडून मिळणार्‍या सहकार्यालाही आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे आराध्य दैवत तुळजाभवानी, या सर्वांनाच त्याचे श्रेय देतात.
 
“मुलगी म्हणून जन्माला येणे, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. मॅनेजमेंट तर प्रत्येक मुलीकडे असतेच आणि एकाचवेळी घरची आणि बाहेरची जबाबदारी सांभाळत ती कायम सिद्धदेखील करून दाखवते. अशा या प्रत्येक स्त्रीमधील कर्तृत्ववान ‘ती’ला माझ्या जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा!”