सध्या ‘एआय’ची सर्वत्र चर्चा आहे. अर्थात त्याचा इतिहास जुना असला, तरी गेली अनेक दशके सामान्य माणूस या ना त्या रुपाने ‘एआय’ वापरत आहेच. सामान्यांच्या जीवनात आधी एआय कसे आले, याचा घेतलेला हा आढावा...
एआय’ला जवळपास 50-60 वर्षांचा इतिहास आहे, हे आपण बघितलेच. पण, केवळ मोठा इतिहास आहे, म्हणून ‘एआय’ जग बदलू शकेल असे नाही. त्यासाठी आपण ‘एआय’ने आतापर्यंत मानवतेला कशी मदत केली आहे, हे पाहिले पाहिजे. आदित्यने आजोबांना आणि त्यांच्या मित्रांना, सांगायला सुरुवात केली. मागच्या रविवारी त्याने, सगळ्यांना ‘एआय’चा इतिहास सांगितला होता.
1950 ते 1970 सालच्या दशकांदरम्यान ‘एआय’मधील संशोधन, हे प्रामुख्याने गणिततज्ज्ञ, विद्यापीठांमधले संशोधक यांच्यापुरते मर्यादित होते. आर्थर सॅम्युएल या संशोधकाने, 1949 साली ‘चेकर’ हा खेळ खेळणारे एक ‘एआय’ सॉफ्टवेअर बनवले. या सॉफ्टवेअरमध्ये हा खेळ कसा खेळायचा, याच्या सूचना नव्हत्या. पण, हे सॉफ्टवेअर स्वतः बोर्डवरील सोंगट्या पाहून शिकत होते. अशा प्रयोगांमधून पुढे मशीन लर्निंग या संकल्पनेचा जन्म झाला. आता तुम्ही म्हणाल की, एक साधा सोंगट्यांचा खेळ खेळायला संगणकाला शिकवणे, यात काय एवढे. पण, हे लक्षात ठेवा की, त्याकाळी संगणक म्हणजे, खोलीभर पसारा असे आणि त्याची ताकद ही आजकालच्या छोट्या घड्याळ्याएवढी असे. म्हणजे आजकालच्या संगणकाच्या तुलनेत, अगदी फुसके संगणक होते त्याकाळी, जयंतराव म्हणाले.
अगदी बरोबर. पण, तरी अशा छोट्या प्रयोगांमधूनच ‘एआय’चे क्षेत्र विकसित होत गेले. पण, तरीसुद्धा सामान्य माणसापर्यंत, त्याचा काही फायदा पोहोचला नव्हता. पण, 1980 आणि 1990 सालच्या दशकात हे चित्र बदलले. ‘एआय’ घराघरात पोहोचायला सज्ज झाले.
गूगल आणि सर्च इंजिन
आपण सगळे गूगल सर्च वापरतो. बरोबर ना? सगळ्यांनी एकसाथ माना डोलावल्या. साथीत असलेले जयंतराव आणि त्यांचे मित्र, गेली कित्येक वर्षे बातम्या वाचणे, ई-मेल किंवा काही वस्तू ऑर्डर करणे अशा कामांसाठी इंटरनेट वापरत होते आणि गूगल त्यांचा मित्रच झाला होता. गूगल हे ‘एआय’चे एक उत्तम उदाहरण आहे. जगभरात इंटरनेटवर कोट्यवधी पेजेस किंवा वेबसाईट आहेत. गूगलकडे ‘क्रॉलर प्रोग्रॅम’ म्हणजे, इंटरनेटवरील माहिती सतत वाचणारे प्रोग्रॅम आहेत. हे प्रोग्रॅम नेहमी इंटरनेटवरील सगळी पेजेस वाचतात आणि त्यातील माहिती, एका मोठ्या माहितीच्या साठ्यात जमा करून ठेवतात. आपण जेव्हा काही सर्च करतो, तेव्हा या माहितीच्या साठ्यातून, गूगल ‘एआय’ वापरून सगळ्यात समर्पक वेबसाईट काढून देतो. तुम्ही एखादी गोष्ट गूगलमध्ये वारंवार शोधत असाल, तर गूगलमधील ‘एआय’ हे लक्षात ठेवतो. म्हणजे आमचे आजोबासारखे आळींरलह लरलहलहरप र्ोींळशी शोधतात. त्यामुळे त्यांच्या गूगल आयडीमध्ये अक्षर टाईप केले की, गूगल पुढे आळींरलह लरलहलहरप र्ोींळशी स्वतःच देतो. आपण याला अगदी साध्या सोई समजतो. पण, याच्या मागे एक अत्यंत मोठा आणि किचकट ‘एआय’ प्रोग्रॅम आहे. एवढेच कशाला, गूगलला हळूहळू तुमच्या आवडी समजतात आणि तो तुम्हाला हव्या असलेल्या वेबसाईट दाखवतो, हे सगळे ‘एआय’ मुळेच. आपण रोज वापरात असलेले गूगल म्हणजे ‘एआय’चे मोठे उदाहरण आहे, हे ऐकून सगळ्यांना ‘एआय’बद्दल आता थोडी जवळीक वाटू लागली.
अॅमेझॉनसारख्या ईकॉमर्स वेबसाईट
आपण सगळे अॅमेझॉनवर खरेदी करतो. आपण जेव्हा एखादी वस्तू घेतो, तेव्हा अॅमेझॉन आपल्याला तुम्ही या दुसर्या वस्तू पण विकत घेऊ शकता, अशा प्रकारचे इशारे किंवा माहिती देतो. कधी तुम्ही विचार केलाय का की हे कसे होते? अॅमेझॉन वापरणार्या लक्षावधी लोकांनी, काय विकत घेतले आहे याची माहिती अॅमेझॉनकडे असते. त्याचे विवरण किंवा अभ्यास ‘एआय’च्या साहाय्याने करून, काही क्षणात आपल्याला दुसरे काय विकत घेऊ शकतो, ते अॅमेझॉन सुचवतो. फक्त अॅमेझॉन कशाला, यूट्यूब, नेटफ्लिक्स ही सुद्धा ‘एआय’ची उत्तम उदाहरणे आहेत. या सगळ्या वेबसाईटवर, आपल्याला आपल्यासारख्या लोकांनी पूर्वी केलेल्या वापराचा अभ्यास करून, आपल्या आवडीचे कार्यक्रम बघण्यासाठी सुचवले जातात. म्हणजे उदाहरणार्थ, राहुल देशपांडे यांची गाणी यूट्यूबवर ऐकून नंतर बहुसंख्य लोक जर वसंतरावांची गाणी ऐकत असतील, तर तुम्हाला पण राहुल देशपांडे यांचे एक गाणे ऐकल्यावर, पुढचे गाणे वसंतरावांचे दिसते. यूट्यूब तुम्हाला पुढे काय बघायच, याचा विचार करायला वाव देत नाही. आपण रोजच ‘एआय’ वापरतो हे जयंतरावांना आणि त्यांच्या मित्रांना आता पटायला लागले होते.
गूगल मॅप, जीपीएस
केवळ संगणक वापरतानाच नाही, तर घराबाहेरसुद्धा आपण ‘एआय’ रोज वापरतो. आपण आजकाल गाडीने कुठेही जाताना, गूगल मॅप वापरतो. काही वर्षांपासून जगभरात जीपीएस वापरले जाते. आपल्याला जायच्या असलेल्या ठिकाणाचा रस्ता त्याच्यात दिसतो. सध्या रस्त्यात असलेली गर्दी, वेगवेगळ्या मार्गांनी जाण्यासाठी लागणार वेळ, याचा विचार करून जीपीएस सर्वात सोपा मार्ग सुचवतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात माहितीचे संश्लेषण आणि आकडेमोड केली जाते आणि ‘एआय’च्या साहाय्याने सर्वात सोपा रस्ता ठरवला जातो.
हवामानाचा अंदाज
आजोबा, तुम्ही मला नेहमी तुमच्या वेधशाळेत काम करणार्या एका मित्राची गोष्ट सांगायचा. जयंतरावांनी आठवले, अरे हो आम्ही नेहमी त्याची चेष्टा करायचो. त्याने हवामान कोरडे राहील म्हणले की, आम्ही छत्र्या घेऊन बाहेर पडायचो! पण, आता तसे नाही हो! आता जगभरातल्या हवामानाचा अंदाज खूपच अचूकपणे मिळायला लागला आहे. का रे पण? आता याच्यात तुमचे ‘एआय’ कुठे मध्ये आले? आजोबा हवामानाचा अंदाज करणे, हे खूप किचकट काम आहे. वार्याचा वेग, हवेतील आर्द्रता, बदलणारे तापमान असे अक्षरशः हजारो घटक त्यात असतात. पूर्वीच्या काळी यातल्या काहीच घटकांचा अंदाज करून, हवामानाचा अंदाज वर्तवला जायचा. पण, आता ‘एआय’च्या साहाय्याने हजारो घटक, वातावरणातील बदल, वातावरणाच्या पूर्वीच्या नोंदी याचा अभ्यास केला जातो. गुंतागुंतीची आकडेमोड करून, दीर्घ पल्ल्याच्या वातावरणाचा अंदाज वर्तवला जातो. याचा उपयोग शेती, अर्थव्यवस्था, पर्यटन सगळ्यांनाच होतो. ‘एआय’मुळे शेतकर्यांच्या आयुष्यात पडलेला, हा कदाचित पहिला फरक आहे. वेळ मिळाला, तर आपण पुढे शेतीमध्ये ‘एआय’मुळे कशी मदत होते आहे ते आपण पाहूच.
तर आजोबा आपण ‘एआय’ची गेली कित्येक वर्षे वापरात असलेली उदाहरणे बघितली. या उदाहरणांमधले काही ठळक घटक म्हणजे :
1. माहितीच्या प्रचंड मोठ्या साठ्याचे अत्यंत शक्तिशाली संगणकाच्या मदतीने विश्लेषण करणे.
2. वेबसाईट किंवा इतर साधने वापरणार्या लोकांच्या हालचाली किंवा वर्तनाचे विश्लेषण करून, ‘एआय’ला अधिकाधिक अचूक आणि शक्तिशाली करणे.
3. मानवाची मदत न घेता स्वायत्तपणे निर्णय घेणे. (जसे मॅपवर कोणाला न विचारता सर्वात सोपा मार्ग सुचवणे)
4. अत्यंत जलद वेगाने निर्णय घेणे.
5. अत्यंत गुंतागुंतीच्या घटकांचा अभ्यास करून निर्णय घेणे.
6. वापरकर्त्यांसाठी निर्णय घेणे किंवा त्यांना निर्णय घेण्याला मदत करणे.
आज आपल्याला दिसणारी ‘एआय’ची अत्यंत शक्तिशाली उदाहरणे, ही याच मूलभूत वैशिष्ट्यांवर आधारित आहेत. म्हणजे, आपण बघितल्याप्रमाणे 1950 ते 1980 सालापर्यंत केवळ संशोधन, विद्यापीठे आणि मोठ्या कंपन्यांच्या प्रयोगशाळांमध्ये मर्यादित असणारे ‘एआय’ 1990 सालापासून, प्रत्यक्ष वापरात मोठ्या प्रमाणात येऊ लागले. 2000 सालानंतर इंटरनेट आणि ईकॉमर्सच्या वापरामुळे, ‘एआय’ घराघरात पोहोचले. 2010 सालच्या दशकात यातूनच, आज सगळीकडे बोलबाला असणार्या क्रांतिकारी ‘जनरेटिव्ह एआय’चा जन्म झाला. पुढच्या चर्चेत आपण ‘जनरेटिव्ह एआय’ बद्दल बोलू.
डॉ. कुलदीप देशपांडे
(डॉ. कुलदीप देशपांडे हे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्यांना ‘अनॅलिटिक्स’, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या क्षेत्रातील 25 वर्षांचा अनुभव आहे. ते ‘एलिशियम सोल्युशन्स’ या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मध्ये काम करणार्या जागतिक स्तरावरील कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
9923402001