महाराजांविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात उदयनराजे आक्रमक

    07-Mar-2025
Total Views |
 
udayanraje bhosale press conference
 
सातारा : (Udayanraje Bhosale) छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात विशेष कायदा मंजूर करण्यात आला पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा येथे पत्रकार केली आहे. तसेच या कायद्यात नेमकं काय-काय तरतुदी असल्या पाहिजेत, याबाबतही उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती सांगितली आहे.
 
उदयनराजे भोसले काय म्हणाले?
 
“आता सध्या अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या काळात माझे प्रामाणिक मत आहे की एक विशेष कायदा पास केला पाहिजे. कायदा असा पाहिजे की परत कोणी काही बोलण्याचं धाडस केलं नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबाबत बोलण्याचं कोणी धाडस करता कामा नये. याबाबत अजामीनपात्र गुन्ह्याचा कायदा मंजूर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये कमीत कमी १० वर्षांची शिक्षा आणि जास्तीत जास्त रुपयांचा दंड झाला पाहिजे, अशी तरतूद करण्याची गरज आहे. अशा घटनांची चौकशी डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे, अशीही तरतूद असली पाहिजे. तसेच अशा प्रकरणातील दोषारोपपत्र किमान ३० दिवसांत दाखल झालं पाहिजे आणि या गुन्ह्याचा निकाल सहा महिन्यांत लागला पाहिजे, असा कायदा केला पाहिजे”, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
 
“अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्यांना जातीचे किंवा पक्षाचे नसतात, त्यांच्यात फक्त विकृती असते. कोरटकर असो वा अबू आझमी ही फक्त नावे आहेत. भविष्यात अजून कोणी सोम्या गोम्या येतील, पण अशांना शिक्षा झाली तर पुन्हा कोणी हिंमत करणार नाही’, अश्या शब्दांत उदयनराजे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.