मुंबई : शास्त्रीय संगीताच्या संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या पंचम निषाद या संस्थेने आपल्या प्रतिष्ठित प्रातःस्वर संगीत मालिकेच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे. या मालिकेचे १३१ वे पुष्प रविवार दिनांक ९ मार्च रोजी पहाटे ६:३० वाजता गुंफले जाणार आहे. या विशेष प्रसंगी शास्त्रीय संगीताचे दोन नामवंत कलाकार जयतीर्थ मेवुंडी (गायन) आणि प्रविण गोडखिंडी (बासरी) अनोखे युगल सादरीकरण करणार आहेत. प्रभादेवी इथल्या नूतनीकृत रवींद्र नाट्यमंदिराच्या संकुलात हा कार्यक्रम सादर होणार आहे.
'प्रातःस्वर' ही केवळ एक संगीत मालिका नसून ती एक दुर्मिळ अनुभूती आहे. ‘प्रातःस्वर’ हा कार्यक्रम संगीताच्या माध्यमातून श्रोत्यांना पावित्र्य आणि ध्यानधारणा यांच्याशी जोडतो. पहाटेचे राग त्यांच्या खास शैलीत गुंफलेले असल्याने त्यांचे सौंदर्य अधिक खुलते आणि मनात खोलवर रूजते. अशा वातावरणात ऐकलेले संगीत प्रेक्षकांना विलक्षण शांततेचा अनुभव देते आणि अंतर्मनात चिंतनाची प्रक्रिया सुरू होते. या वेळी साधलेली सुरावट आणि भावभावनांची गुंफण दिवसाच्या इतर कोणत्याही प्रहरात पुनरुज्जीवित करता येत नाही, हेच या संगीताचा खरा गूढ व अप्रतिम आनंद आहे. सदर कार्यक्रमात प्रसाद पाध्ये, सुर्यकांत सुरवे तबलावादन करणार असून, निरंजन लेले हार्मोनियम आणि सुखद मुंडे पखवाजावर साथ करणार आहेत.