निव्वळ मतांच्या राजकारणासाठी स्वदेश आणि स्वधर्माचा अपमान करण्यापर्यंत आता काँग्रेस आणि अन्य विरोधकांची मजल गेली आहे. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सनातन धर्माचा अपमान करणार्या या प्रवृत्तींचा तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही स्वागतार्ह बाब म्हटली पाहिजे. योगी आदित्यनाथांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी या लांगूलचालनवादी ‘नॅरेटिव्ह’ला तितक्याच आक्रमकपणे छेद दिला आहे.
समाजवादी पार्टीचा आमदार अबू असीम आझमीने औरंगजेबाच्या केलेल्या प्रशंसेमुळे राज्यात निर्माण झालेल्या नव्या वादंगात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुद्रावतारापुढे मुघलांची भलामण करणारे नेते निष्प्रभ झाले आहेत. ताज्या वादात मुख्यमंत्री फडणवीस यांनी “नेहरूंचा निषेध करणार का?” असा खडा प्रश्न उर्वरित राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेत विचारताच, विरोधकांची तोंडे बंद झाली. कारण, तमाम राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववादी थोर पुरुषांचा अवमान करणे, हे देशातील डाव्या, उदारमतवादी पुरोगामी बुद्धिजीवींचे आणि मुस्लिमांचे पूर्वीपासूनच धोरण होते. त्याचे एक नामवंत उदाहरण म्हणजे, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू. त्यांनी आपल्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढले आहेत. या पुस्तकात “शिवाजी हा एक वाट चुकलेला राष्ट्रभक्त होता,” असे मत नेहरूंनी नोंदवले. राणा प्रताप यांच्याबद्दलही नेहरूंचे मत फारसे चांगले नव्हते. त्यामुळेच अबू आझमीच्या विधानांमुळे निर्माण झालेल्या वादात फडणवीस यांनी या नकली पुरोगामी टोळीच्या म्होरक्याच्या दुटप्पीपणालाच आव्हान दिले.
आव्हाड हे मुद्दाम कुरापती काढणारे आणि सनातनद्वेषी नेते म्हणून ओळखले जातात. ते ज्या मुंब्रा मतदारसंघातून निवडून येतात, तेथे मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने त्यांना नेहमीच हिंदुत्वविरोधी भूमिका घ्यावी लागते. ते करताना आपण तमाम मराठी माणसांच्या दैवताचा, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचाच अपमान करीत आहोत, याचे साधे भानही त्यांना राहात नाही. आताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेब आणि मुघल शासकांशी केलेली तुलना संतापजनक ठरली. त्यामुळेच मुख्यमंत्री फडणवीस यांना सभागृहात आक्रमक पवित्रा घ्यावा लागला. “औरंगजेब होता म्हणून शिवाजी थोर ठरले,” हे आव्हाड यांचे विधान केवळ अज्ञानमूलकच आहे, असे नव्हे, तर संतापजनकही आहे. म्हणजे, रावण होता, म्हणून राम श्रेष्ठ ठरला, असे म्हणण्यासारखे झाले! आव्हाडांचा हा डावपेच फडणवीसांच्या प्रतिहल्ल्याने त्यांच्यावरच उलटला.
पण, आव्हाड यांनी पूर्वीही अफझलखानाची भलामण केली होती. “अफझलखान हा धर्मांध नव्हता आणि तो केवळ राज्यविस्तारासाठी महाराष्ट्रात आला होता,” असे बाष्कळ विधान त्यांनी केले होते. केवळ राज्यविस्तारच करायचा होता, तर त्याला पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि सोलापूरचे तुळजा भवानीचे मंदिर तोडण्याची काय गरज होती? पण, कसलाही अभ्यास न करता, केवळ मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यासाठी असली भंपक आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी वक्तव्ये करणे, हा आव्हाडांचा आवडता उद्योग. मात्र, फडणवीसांच्या भेदक आणि अनपेक्षित सवालाने या नकली पुरोगाम्यांची वाचाच बसली. फडणवीसांनी थेट नेहरूंवरच टीका केली, त्यामागेही तितकेच सशक्त कारण आहे.
नेहरू हे मुळात राष्ट्रवादी विचारांचे कट्टर विरोधक होते. त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात त्यांचा उल्लेख ‘युद्ध गुन्हेगार’ असा केला आहे. बोस यांच्यासारख्या कट्टर देशप्रेमी आणि आपल्या देशबांधवाबद्दल असा उल्लेख करताना नेहरूंची लेखणी कचरली नव्हती. नेहरूंच्या या भूमिकेमुळेच स्वातंत्र्यानंतरची पहिली ३० वर्षे देशाचे शिक्षणखाते हे डाव्या विचारसरणीच्या मुस्लीम नेत्यांकडे सोपविले गेले होते. पहिले शिक्षणमंत्री अबुल कलाम आझाद यांच्यापासून हुमायून कबीर, एम. सी. छागला, फक्रुद्दिन अली अहमद ते नुरुल हसन अशी ही परंपरा. परिणामी, जिहादी मानसिकता असलेल्या या नेत्यांनी पाठ्यपुस्तकांमध्ये मुघल शासनकर्त्यांचे गुणगान आणि त्यांच्या कार्याचे तपशीलवार विवेचन केले. त्या तुलनेत स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, त्या क्रांतिकारकांच्या कार्याची ओझरती माहिती देण्यात आली आहे.
इतकेच नव्हे, तर सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या अतुल्य नेत्याचे भरीव योगदान हे एका पानात आटोपते घेण्यात आले आहे. याउलट, काँग्रेसच्या चळवळी आणि आंदोलनांची माहिती पाने भरभरून देण्यात येत असे. देशाला स्वातंत्र्य हे फक्त काँग्रेसमुळेच मिळाले, हे गेल्या अनेक पिढ्यांच्या मनावर ठसविण्यात आले. भारताला स्वातंत्र्य प्रदान करणारे ब्रिटिश पंतप्रधान क्लेमंट अटली यांनी आपल्या आठवणींमध्ये ही गोष्ट नमूद केली आहे की, “सुभाषचंद्र बोस यांच्या ‘आझाद हिंद सेने’मुळे भारतीय नौसैनिक प्रभावित झाले होते आणि त्यांनी ब्रिटिश सरकारविरोधात मुंबईत बंड केले. तेव्हा आपल्याला या देशावर आता राज्य करता येणार नाही, याची जाणीव आम्हाला झाली.
काँग्रेसने १८४२ मध्ये सुरू केलेल्या ‘चले जाव आंदोलना’चा मात्र काहीच परिणाम सरकारवर झाला नव्हता,” असे मतही अटली यांनी नोंदले आहे. यावरून काँग्रेसच्या एकांगी आणि पक्षपाती इतिहासलेखनाची कल्पना येऊ शकते.गेल्या दहा वर्षांत सोशल मीडियाच्या प्रचंड वापरामुळे आजवर दडपून टाकलेला इतिहास पुराव्यानिशी सामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागला आहे. मोदी सरकारच्या विकासाभिमुख आणि स्वच्छ कारभाराप्रमाणेच या नव्या अस्सल इतिहासाच्या माहितीचा भाजपला मिळत असलेल्या देशव्यापी पाठिंब्यात निश्चितच महत्त्वाचा वाटा आहे. कारण, भारतीय संस्कृती, परंपरा, धर्म आणि राष्ट्रवादाला गौरविणारा पक्ष ही भाजपची प्रतिमा सामान्य माणसात सोशल मीडियामुळे ठसली आहे. याउलट, ‘या सर्वांचा तिरस्कार करणारा’ आणि ‘परक्या आक्रमकांचे उदात्तीकरण करणारा पक्ष’ अशी काँग्रेसची प्रतिमा बनली आहे.
नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी न चुकता अफगाणिस्तानातील बाबरच्या कबरीला आवर्जून भेट दिली होती. तेथे या नेत्यांनी जाण्याचे कारण काय? पण, यांपैकी एकाही नेत्याने हिंदूंच्या एकाही आराध्य देवतेच्या मंदिराला कधीही भेट दिली नव्हती. किंबहुना, सोमनाथच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास नेहरूंनी तर कडाडून विरोध केला होता. तसेच, नंतर या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यास जाण्यास त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनाही मनाई करण्याचे उद्धट धाडस केले होते. पण, सरदार पटेल यांच्या ठाम आणि खमक्या भूमिकेमुळेच त्या मंदिराचा जीर्णोद्धार शक्य झाला. राजेंद्र प्रसाद हेही नेहरूंचा विरोध न जुमानता, या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहिले. भारताच्या खर्या आणि गौरवशाली इतिहासाला दडवून आणि दडपून परक्या आक्रमकांचे उदात्तीकरण करणे, ही काँग्रेसची पूर्वापार परंपरा राहिली आहे. तिचा आता तितक्याच आक्रमकपणे प्रतिवाद केला जात आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.