मराठी भाषेवर प्रेम करीत तिला सौंदर्य बहाल करणार्या आणि संदर्भसूचीच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमीट ठसा उमटविणार्या तपस्विनी शिल्पा सबनीस यांच्याविषयी...
उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्वानंदी, पुणे’तर्फे कर्तृत्ववान महिलांना ‘तपस्या पुरस्कार’ दि. ८ मार्च रोजी पुण्यात बहाल करण्यात येणार आहेत. त्यातील एक नाव म्हणजे, शिल्पा सबनीस. अत्यंत किचकट, पण आगामी कित्येक पिढ्यांसाठी कुतूहलजन्य आणि सूचीबद्ध कार्य त्या करीत आहेत.
शिल्पा सबनीस या मूळच्या नाशिकच्या. ‘वंदे मातरम्’चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर त्यांनी पुण्यातून संदर्भसूचीच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. नाशिकमधील सारडा कन्या विद्या मंदिरातून १९८८ साली त्या दहावी उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर पुणे विद्यापीठातून ‘एम.ए.मराठी’, ‘बी.लिब’ तर टिळक विद्यापीठातून ‘एम.लिब.’ केले आहे. नोकरीसाठी आणखी शिक्षण घ्यावे, असा काही त्यांचा विचार नव्हता. मात्र, वाचनाची गोडी असल्याने ग्रंथालयशास्त्राचे शिक्षण त्यांनी पुण्यात घेतले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जवळपास ४० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या ‘दाते ग्रंथसूची’ नावाच्या प्रकल्पाचे कार्य पुढे नेण्याची संधी चालून आली. येथूनच शिल्पा सबनीस यांचा साहित्यविश्वातील एका ज्ञानवर्धक वाटचालीच्या रम्य प्रवासाचा प्रारंभ झाला. या प्रवासातील त्यांच्या कार्याचे टप्पे अक्षरश: कुतूहल निर्माण करणारे आणि ज्ञानात भर टाकणारे आहेत. त्यामुळे अशा एका अनोख्या प्रवासाचा, शिल्पा सबनीस यांच्या कार्याचा माहितीपूर्ण कोश समजून घेणे आवश्यक ठरते.
आपल्या भारतीय संस्कृतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील ज्ञानसंपादन हा तर मैलाचा दगड. त्यात नेमक्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एका अशा गुणी आणि ज्ञानी महिलेचा परिचय करून देण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून देता येत आहे, हे आणखी एक विशेष.
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या ‘दाते ग्रंथसूची’ या मोठ्या प्रकल्पात बेलसरेंसोबत त्यांनी सहसंपादक म्हणून पुण्यातूनच १२ वर्षे काम केले. त्यांना पहिल्या सूचीचे जे काम मिळाले, ते त्यांचे पती मिलिंद सबनीस यांचे गुरू साहित्यिक आनंद हर्डीकर यांच्या ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे. त्यावेळी ते ‘राजहंस प्रकाशना’चे संपादक होते. या कामासाठी त्यांना केवळ चार दिवसांचाच अवधी असल्याचे सांगितले गेले. कारण, या पुस्तकाच्या प्रकाशनाची तारीख जाहीर झाली होती. खरे तर शिल्पा सबनीस यांच्यासाठी हे आव्हानच होते. मात्र, त्यांनी अहोरात्र काम केले आणि या पुस्तकाची सूची तयार केली. यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. केवळ सूची करणे म्हणजे नामावली नाही, तर अधिक वैविध्यपूर्ण अशी सूची करण्याचे काम करीत असतात आणि हे खरोखरीच खूप अवघड. अच्युत गोडबोले यांच्या ‘किमयागार’ पुस्तकासाठी वैज्ञानिक संज्ञांची सूची, मकरंद साठ्ये यांच्या तीन खंडांचे आहे त्यातच नाट्यविषयक सूची, बहूळकर-रझांवरील पुस्तकांसाठी चित्रकला विषयक सूची करण्याचे धाडस त्यांनी लीलया पेलले. केवळ व्यक्तिनाम सूचीत त्या गुंतून राहिल्या नाहीत. सगळ्यात अवघड म्हणजे, हे काम करण्यासाठी हातात वेळ खूप कमी होता, तरीही त्यांनी अतिशय कल्पकतेने, कौशल्याने हे काम पूर्णत्वास नेले.
सूचीकार म्हणून ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘चंद्रलोक’, ‘किमयागार’, ‘अर्थात’, ‘टिळकपर्व’, ‘फर्ग्युसनची वाटचाल’, ‘निसर्गयात्री इंदिरा गांधी’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘अंधारयुग’, ‘मराठी साहित्य परिषदेचे खंड’, ‘मराठी रंगभूमीच्या तीस रात्री’ यासह ४०हून अधिक वैचारिक पुस्तकांचे काम त्यांनी बघितले आहे. शिल्पा यांनी ‘टोपणनावांचा कोश’ या ग्रंथांचे संपादन केले असून, ‘जन्मदा’ विशेषांकासाठी १४० वर्षांतील मराठी संगीत नाटकांची सूचीदेखील तयार केली आहे. ‘समग्र वंदे मातरम्’ या ग्रंथाच्या द्वितीय खंडाचे सहलेखनही त्यांनी केले. शिल्पा यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘पुणे नगरवाचन मंदिर’ यांचा ‘ज्ञानकोशकार केतकर पुरस्कार’, संवाद पुणेचा ‘ग्रंथ संदर्भ सेवा पुरस्कार’, ‘सूची’ या दुर्लक्षित विषयातील विशेषज्ञ म्हणून गौरव, ‘नाशिक एज्युकेशन सोसायटी’तर्फे ‘लिलाताई ठकार स्मृती सन्मान’, ‘ज्ञानेश्वरी वाचन मंदिर’ व ‘मातृगौरव न्यास पुरस्कृत मातृगौरव सन्मान’ प्राप्त झाला आहे. यात आज आणखी एका पुरस्काराची भर पडत आहे. एखाद्या तपस्येप्रमाणे सुरू असलेले शिल्पा सबनीस यांचे कार्य हे ‘तपस्विनी’ होऊनच त्या पूर्णत्वास नेत आहेत. आजकाल मराठी क्षेत्रात अशा कार्यात सहसा कोणीही पुढाकार घेताना दिसत नाही. तथापि, शिल्पा सबनीस यांनी आगामी पिढ्यांसाठी हा आदर्श वस्तुपाठ रचला आहे. काम जोखमीचे, जिकरीचे आणि किचकट असले, तरी अतिशय वेगळे समाधान देणारे आहे. आपल्या साहित्य विश्वातील अनेक रम्य कथांना, शब्दांना, अक्षरांना आणि संदर्भांना वलयांकित तसेच, सौंदर्यप्रदान करणारे तर आहेच; मात्र भाषेचे अस्तित्व अधिक भारदस्त करणारे आहे. एकीकडे अभिजात मराठी भाषेसाठी कोणी काहीच करीत नाही, अशी नकारात्मक रडारड करणार्यांना शिल्पा सबनीस यांनी आपल्या कामातून चोख उत्तर दिले आहेच. या प्राचीन मराठी भाषेला त्यातील गोडवा आणि शब्दभांडारासाठी खूप काही अमीट असे कार्य करता येऊ शकते, हा विश्वास शिल्पा सबनीस यांचे कार्य देऊन जातो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशा या तपस्विनीस दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
अतुल तांदळीकर