राज्यातील होर्डिंग्जचे दरवर्षी ऑडिट होणार

- मंत्री उदय सामंत यांचे विधानसभेत आश्वासन

    07-Mar-2025
Total Views |

The hoardings in the state will be audited every year Uday Samant
 
मुंबई: ( Uday Samant on hoardings audit ) राज्यातील होर्डिंग्जचे आता दरवर्षी ऑडिट केले जाणार आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी याबाबत विधानसभेत ग्वाही दिली.
 
मुंबईसह राज्यभरात अनधिकृत होर्डिंग्ज वाढलेले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. नागभिड तालुक्यात मोठे होर्डिंग असून ते कोसळले, तर मोठा अपघात होईल. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील होर्डिंग्ज ऑडिट होणार का आणि एखादी घटना घडल्यास मंत्री जबाबदार असतील का, असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी विधानसभेत उपस्थित केला.
 
त्यावर उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, राज्यात एकूण ९ हजार २६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले. १८८ ठिकाणी ऑडिट झाले नाही. राज्यात १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहे, याप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. असे एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहे. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूणच अनधिकृत होर्डिंग्जबाबत दरवर्षी राज्यात ऑडिट केले जाणार, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. यावर्षीचे होर्डींग्जचे ऑडिट अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर सुरू केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.