पुण्यातील ‘बर्गर किंग’ वादाचा सर्वोच्च न्यायालयात लागला निकाल
पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला मिळाला दिलासा
07-Mar-2025
Total Views |
नवी दिल्ली : पुण्यातील हॉटेल व्यावसायिक आणि जगप्रसिध्द अमेरिकास्थित कंपनी बर्गर किंग यांच्यातील वादाचा शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला. या निकालानुसार मुंबई उच्च न्यायालयाचा पुढचा आदेश येईपर्यंत या हॉटेल व्यावसायिकाला बर्गर किंग हे नाव वापरता येणार आहे. त्यामुळे अमेरिकास्थित जगप्रसिध्द नाममुद्रा असलेली बर्गर किंग ही संस्था आणि या हॉटेल व्यावसायिक यांच्यातील २०१४ पासून सुरु असलेल्या वादावर आता पडदा पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालय या वादात आता पुढचा निकाल देणार असल्याने आता मुंबई उच्च न्यायालयाच्या पुढील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमका वाद काय होता ?
पुण्यातील एक हॉटेल व्यावसायिक हे २००८ पासून बर्गर किंग या नावाने हॉटेल चालवत होते. २०१४ साली जगप्रसिध्द नाममुद्रा असणाऱ्या बर्गर किंगने भारतात प्रवेश केला. त्याचवर्षी त्यांनी पुणेस्थित या हॉटेलवर खटला दाखल करत या नामसाधर्म्याने आमच्या नाममुद्रेची प्रतिमा मलिन होते असा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. त्यानुसार झालेल्या सुनावणीनुसार पुणे सत्र न्यायालयाने पुण्यातील व्यावसायिकाचा १९९० पासूनचा इतिहास लक्षात घेत हॉटेल व्यावसायिकाच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर त्याला बर्गर किंगने उच्च न्यायालयात आव्हान दिले.
त्यावेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार पुणेस्थित व्यावसायिकाने आपल्या व्यावसायाचे नाव हे १९७९ पासून नोंदणीकृत केले असल्याने आणि बर्गर किंग या आंतरराष्ट्रीय नाममुद्रेचा भारतातील प्रवेश हा खूप नंतरचा आहे, सबब त्या व्यावसायिकाला हे नाव वापरण्यापासून रोखता येणार नाही. तरीही आंतरराष्ट्रीय नाममुद्रा आणि एका शहरापुरता मर्यादित व्यवसाय याचा प्रश्न उपस्थित झाला. सबब उच्च न्यायालयाने हा याबाबतचा निर्णय राखून ठेवला. तरीही बर्गर किंगने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. आता सर्वोच्च न्यायालयाने पुणेस्थित व्यावसायिकाच्या बाजूने निकाल दिला.
या निकालामुळे पुणेस्थित हॉटेल व्यावसायिकास दिलासा मिळाला आहे. परंतु उच्च न्यायालय आता काय निकाल देणार त्यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.