अबू आझमींविरोधात शिख संघटना आक्रमक; भर चौकात जाळली प्रतिमा
07 Mar 2025 17:17:24
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Sikh Community Protest against Abu Azmi) औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्याविरोधात शीख वेल्फेअर सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कानपूरच्या गुरु गोविंद सिंग चौकात अबू आझमी यांच्या पुतळ्याचे दहन केल्याचे एका व्हिडिओद्वार पाहायला मिळाले. गुरु तेग बहादूर यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचे वर्णन अबू आझमींनी महान शासक म्हणून केल्याने शीख बांधवांनी त्यांच्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला.
शीख वेल्फेअर सोसायटीचे प्रदेशाध्यक्ष सरदार गुरविंदर सिंग छाबरा म्हणाले की, अबू आझमी यांनी औरंगजेबाला महान लेखले आहे. औरंगजेबाने गुरु तेग बहादूर यांना जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला. यावर गुरु तेग बहादूर यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यांचे बलिदान आजही धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. समाजवादी पक्षाच्या नेत्याने औरंगजेबाला महान म्हणणे यावरून पक्षाची विचारसरणी दिसून येते. शीख समाजाचा याला विरोध आहे.
काय म्हणाले होते अबू आझमी?
औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळत अबू आझमी म्हणाले की, औरंगजेबाबद्दल चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवली... मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही... उलट औरंजेबाच्या काळात भारतवर्षाची सीमा अफगाणिस्तान पर्यंत होती. त्यावेळी आपला जीडीपी २४ टक्के होता. तेव्हाच भारताला सोने की चिडीया म्हटले जात होते... त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई धर्माची नसून ती राजकीय होती....
अर्थसंकल्पिय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित आमदार
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. यादरम्यानच अबू आझमींना असे विधान केले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अबू आझमी यांनी माफी मागावी अशीदेखील मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं असून अधिवेशन संपेपर्यंत ते निलंबित आमदार असणार आहेत.