बेघर होऊन बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देणार! एकनाथ शिंदे

    07-Mar-2025
Total Views |

Eknath Shinde on Mumbaikar house  
 
मुंबई: ( Eknath Shinde on Mumbaikar house ) रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्या मुंबईकरांना मुंबईबाहेर घर शोधावे लागत आहे. असे रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
 
मुंबईतील खार (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पाबाबत सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी सूचनेच्या चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला. या सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “सामान्य रहिवाशाला केंद्रबिंदू मानून गृहनिर्माण प्रकल्पाबाबत शासन निर्णय घेत आहे. गोळीबार, खार (पूर्व) भागात रखडलेला गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. ‘शिवालिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या विकासकाने डिसेंबर २०२९ पर्यंत योजनेतील उर्वरित ५ हजार, २८१ सदनिकांचे काम पूर्ण करण्याचा स्तंभालेख (बार चार्ट) दिला आहे. त्यानुसार विकासाचे काम पुढील पाच वर्षांत पूर्ण करून घेण्यात येईल.
 
या ‘बार चार्ट’नुसार काम पूर्ण न झाल्यास संबंधित विकासकावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ‘झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा’तील अभय योजना, रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पातील भाड्याबाबत आणि ‘बार चार्ट’प्रमाणे काम करण्यासाठी संयुक्त बैठक घेण्यात येईल. खार (पूर्व)मधील झोपडपट्टीधारकांवर दाखल पोलीस गुन्हे कमी करण्याबाबत पडताळणी करून कारवाई करण्यात येईल,” असेही शिंदे यांनी सांगितले.
 
या सूचनेच्या उत्तरात मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पा’मध्ये पात्र अधिकृत झोपडपट्टीधारकांच्या गृहनिर्माण प्रकल्पात पार्किंगची तरतूद करण्यात आलेली आहे. विकासकाने पुनर्वसन योजनेतील झोपडपट्टीधारकांना फेब्रुवारी २०२४ पर्यंतचे एकूण २०.५० कोटी रुपयांचे भाडे दिलेले आहे. तसेच विकासकाने १ हजार, २२६ झोपडपट्टीधारकांच्या भाड्यापोटी एकूण १८.८१ कोटी रुपयांची रक्कम प्राधिकरणाकडे जमा केली आहे. न्यायालयासमोर ‘बार चार्ट’प्रमाणे प्रकल्प पूर्ण करण्याचे सांगितले आहे. हा प्रकल्प मुदतीत पूर्ण करून देण्याची विकासकाची जबाबदारी आहे. यामध्ये दिरंगाई झाल्यास निश्चित कारवाई करण्यात येईल,” असे देसाई म्हणाले.