रांची : झारखंडच्या माजी आमदार आणि भाजप नेत्या सीता सोरेन (Sita Soren) यांच्यावर गुरूवारी ६ मार्च रोजी हल्ला करण्यात आला. हा हल्ला त्यांच्याच स्वीय सहाय्यकाने केला असल्याचे सांगण्यात येत आहे. सरायधेला या पोलीस ठाणे परिसरामध्ये हा हल्ला झाला आहे. काही वादानंतर वैयक्तिक सहाय्यक देवाशिष मनोरंजन घोष यांनी सीता सोरेनवर पिस्तूल रोखल्याचे सांगितले आहे.
या घटनेची माहिती हाती लागताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शुक्रवारी न्यायालयात हजर झाल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. संबंधित प्रकरणावर पोलीस उपअधीक्षक नौशाद आलाम यांनी सांगितले की, माजी आमदार आणि त्यांच्या सहाय्यक यांमध्ये अर्थिक बाबींवरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आरोपीने संताप व्यक्त केला आणि त्याने पिस्तूल काढत सीता सोरेनकडे रोखले होते.
घटनेच्या वेळी सीता सोरेन एका हॉटेलमध्ये थांबल्या होत्या आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएम आणि पोलीस तैनात होते. मात्र, या हल्ल्यामध्ये त्याला कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीदरम्यान निधीच्या हिशोबावरून हा वाद सुरू झाला. हा वाद इतका पेटला की, त्यांचे वैयक्तिक सहाय्यकाने सोरेन यांच्याकडे पिस्तूल रोखली आहे. ही बाब आश्चर्यचकीत होण्यासारखीच आहे.