मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान क्रूर शासक औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळली होती. त्यामुळे देशभरातून अबू आझमींविरोधात तीव्र संताप व्यक्त होतो आहे. अशातच आता औरंगजेबाचं थडगं हटवण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप खसादार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी सातारा येथे माध्यमांशी बोलताना औरंगजेबाजी कबर जेसीबीने उखडून टाकण्याची मागणी केली आहे.
उदयनराजे म्हणाले, औरंगजेबाची कबर ठेवून उपयोग काय? तो देश लुटायलाच आला होता. चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण का करायचं? जे लोकं औरंग्याच्या कबरीवर दर्शनाला जातात, त्यांचे वंशज आहेत का ते? तसं असेल तर घरी घेऊन जा की मग त्याला. नाहीतर जिथून औरंगजेब आला होता, तिकडेच औरंग्याचे गोडवे गाणाऱ्यांनी जावं. इथं थांबायची गरज नाही. या प्रकरणात हिंदू-मुस्लीम विषयच नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यातही मुस्लीम होतेच. त्यामुळे औरंगजेबाची कबर ठेवून काही फायदा नाही. त्याची कबर जेसीबीने उखडून टाका. जेसीबीचा एक फावडा मारला तरी कबर तुटेल." औरंगजेबाच्या कबरीवरून गेले अनेक काळ वाद सुरु होता, आता अबू आझमींनी केलेल्या विधानानंतर या मागणीला आणखी जोर धरू लागला आहे.
अबू आझमींविरोधात शिख संघटना आक्रमक; भर चौकात जाळली प्रतिमा
औरंगजेबावर स्तुतीसुमने उधळणाऱ्या अबू आझमींविरोधात शीख वेल्फेअर सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कानपूरच्या गुरु गोविंद सिंग चौकात अबू आझमी यांच्या प्रतिमेचे दहन केल्याचे एका व्हिडिओद्वारे समोर आले आहे. गुरु तेग बहादूर यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाजे वर्णन अबू आझमींनी महान शासक म्हणून केल्याने शीख बांधवांनी त्यांच्याविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. गुरु तेग बहादूर यांचे बलिदान आजही धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.
अर्थसंकल्पिय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित आमदार
राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. यादरम्यानच अबू आझमींना असे विधान केले होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अबू आझमींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अबू आझमी यांनी माफी मागावी अशीदेखील मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रकरणी आता अबू आझमी यांचं निलंबन करण्यात आलं असून अधिवेशन संपेपर्यंत ते निलंबित आमदार असणार आहेत.