अखंड कार्ययोगी..

    07-Mar-2025
Total Views |
 
अखंड कार्ययोगी..
 
 
रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, कुशल संघटक, पक्षाची जबाबदारी सांभाळणारा नेता व कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आणि भाजप आमदार असा अतुल भातखळकर यांचा प्रदीर्घ प्रवास. असा प्रवास करीत जनसेवेचे व्रत अखंड सुरू ठेवणार्‍या अतुल भातखळकर यांच्या जीवनप्रवासाचा त्यांच्या जन्मदिनी घेतलेला मागोवा...
 
अतुल दत्तात्रय भातखळकर आज 60 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी तसेच विविध माध्यमांवर आपल्या विवेचनातून एक वेगळा ठसा उमटवणार्‍या स्वयंसेवकाचा आज वाढदिवस. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून संस्कारित झालेल्या अतुल भातखळकर यांनी संघाचा स्वयंसेवक, संघाचे प्रचारक, ‘रामभाऊ माळगी प्रबोधिनी’, भारतीय जनता पक्ष प्रदेश कार्यालयाचे प्रदेशमंत्री, प्रवक्ता, मुंबई सरचिटणीस आणि पुढे कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार म्हणून दोन वेळा जबाबदारी समर्थपणे संभाळली. पुढे तिसर्‍यांदा निवडून आल्यानंतर आपला वेगळा ठसा ते आजही उमटवत आहेत. अतुल भातखळकर शालेय जीवनातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. महाविद्यालयीन काळात गोरेगाव पूर्व विभागात संघाची जबाबदारी स्वीकारली. एकीकडे संघकार्याच्या माध्यमातून समाजसेवा करीत असताना, दुसरीकडे त्यांनी शिक्षणही सुरू ठेवले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच त्यांनी पत्रकारितेचे शिक्षणही पूर्ण केले आणि त्यानंतर संघाचे पूर्णवेळ प्रचारक होण्याचा निर्णय घेतला.
 
सुरुवातीच्या काळात भिवंडी व त्यानंतर सिंधुदुर्ग येथे संघाचा पूर्णवेळ प्रचारक म्हणून अतुल भातखळकर यांनी काम केले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांना भिवंडी व सिंधुदुर्ग येथे काम करावे लागले. याच काळात सामान्य व्यक्तीच्या जीवनातील घडामोडी व समाजजीवनाशी जोडण्याचा त्यांना वेगळाच अनुभव मिळाला. याचा उपयोग त्यांना पुढील राजकारणामध्ये झाला. संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून असलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर, काही काळ ‘रामभाऊ माळगी प्रबोधिनी’ येथे मुख्य कार्यालयाचे काम सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. याच काळात ते प्रमोद महाजनांच्या संपर्कात आले. पुढे भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयमंत्री म्हणून त्यांना पक्षाने जबाबदारी दिली. या काळात त्यांची नेतृत्व क्षमता पक्षाच्या वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर, पुढील काळात त्यांना भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेशमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रात, काँग्रेस विरोधात गोपीनाथ मुंडे यांची तोफ धडाडत होती. या काळात माध्यमांशी संपर्क व भारतीय जनता पक्षाचा माध्यमांमध्ये एक वेगळा चेहरा उभा करण्याचे काम अतुल भातखळकरांनी केले.
 
पुढे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पत्रकारांची वर्दळ वाढली. त्या काळात भाजपकडे एक अस्पृश्य पक्ष म्हणून पाहिले जात असे. परंतु, अतुल भातकळकर यांनी हे बदलण्यात मोठी भूमिका बजावली. रामजन्मभूमी आंदोलन व त्यानंतर राजीव गांधींची हत्या व पुढील राजकारणात प्रमोद महाजन व गोपिनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला तळागाळात पोहोचवले. त्या काळात पत्रकारांशी आलेल्या संपर्काचा फायदा, भारतीय जनता पक्षाला नक्कीच झाला. पुढे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते म्हणून, अतुल भातकळकर यांच्याकडे जबाबदारी आली व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी स्वीकारली. या काळात भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये विस्तारण्याच्या भूमिकेत होता. केंद्रात व राज्यात सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची पाळेमुळे खोलवर रुजवण्यासाठी प्रचंड संघर्ष सुरू होता. याच काळात एक पिढी दुसर्‍या पिढीला पुढे करण्याचाही प्रयत्न करीत होती व त्यामध्ये अतुल भातखळकरांसारखे नवे नेतृत्व मुंबईत स्थिरस्थावर होत होते.
 
2009 साली पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर, अतुल भातखळकर यांनी अविरतपणे पक्षाचे काम सुरू ठेवले व जिद्दीने, चिकाटीने कांदिवली पूर्व मतदारसंघ बांधला. याचाच परिणाम 2014 साली झालेल्या निवडणुकीत दिसून आला. युती तुटल्यानंतरही, अतुल भातखळकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. आपला मतदारसंघ सांभाळत असताना, महाराष्ट्र विधानसभेत अतुल भातकळकरांनी विविध विषयांवर अभ्यासपूर्ण भाषणे केली. 2014 ते 2019 या काळात, सभागृहात अतुल भातखळकर प्रकर्षाने समोर आले. 2019 ते 2022 या काळात महाआघाडीचे सरकार असताना, अतुल भातखळकरांनी विविध माध्यमांतून सरकारवर अत्यंत बोचरी टीका केली. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ढिसाळ कारभारावर सातत्याने ताशेरे उडवून, अतुल भातखळकर यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सरकारवर चारी बाजूंनी त्यांनी मोठा हल्ला चढवला. त्या काळात कोरोनाग्रस्तांच्या समस्या, त्या सोडवण्यात सरकारला आलेले अपयश, जितेंद्र आव्हाड यांचे प्रकरण आदी विषय अतुल भातखळकर यांनी लावून धरले. ट्विटरच्या माध्यमातून भातकळकर यांनी या मविआ सरकारला सळो की पळो करून सोडले होते.
 
आपल्या मतदारसंघात अतुल भातखळकर हे जनतेला कायम उपलब्ध असलेले आमदार आहेत. कुठलाही गाजावाजा न करता, अगदी शांतपणे जनतेच्या समस्या ऐकणे व तिथेच सोडवणे, या कार्यशैलीमुळे जनसामान्य वर्गात ते अत्यंत लोकप्रिय आहेत. 2024 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिसर्‍या वेळेस आमदारपदी निवडून येताना त्यांनी या मतदारसंघात विक्रमी मतदान घेतले. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ हा बहुतांश झोपडपट्टीने व्यापलेला मतदारसंघ आहे. हनुमान नगर, बोईसर, मालाड पूर्वेतील झोपडपट्टी परिसरात अतुल भातखळकर यांनी प्रचंड काम केले आहे. अतुल भातखळकरांनी आपल्या मतदारसंघातल्या समस्या सोडवल्याच, पण जनतेचा प्रतिनिधी म्हणून वेळोवेळी संपूर्ण मुंबई शहराचेच प्रश्न सभागृहात मांडले.
 
एक यशस्वी जनप्रतिनिधी म्हणून आज अतुल भातखळकर यांची ओळख आहे. आज त्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण होत असताना, अनेकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत. जनप्रतिनिधी म्हणून काम करताना, सर्वसामान्य जनतेला त्याच्या आयुष्यात आनंद उपलब्ध होईल, त्याच्या समस्या अगदी सहजपणे सुटतील, यासाठी तळमळणारा जनप्रतिनिधी म्हणून काम करताना, आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधींचे कसे सोने करता येईल, यासाठी प्रयत्न करणाराजनप्रतिनिधी म्हणून अतुल भातकळकर यांच्याकडे पाहता येते. आमदारनिधीचा योग्य वापर, सभागृहात संसदीय पद्धतीचा योग्य वापर, आवश्यक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करणे व चर्चेदरम्यान विरोधकांवर हल्ला चढवणे, या सर्वच बाबीत अतुल भातखळकर यशस्वी ठरले. स्वयंसेवक, कुशल संघटक, पक्षाची जबाबदारी सांभाळणारा नेता व लोकप्रिय जनप्रतिनिधी असा अतुल भातखळकरांचा प्रदीर्घ प्रवास आहे. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!