नवी दिल्ली : ग्रामीण भागातील महिला उद्योजकांमध्ये मिळवलेल्या पैशांची बचत करण्याचा कल दिसून आला आहे. डीबीएस बँक आणि हकदर्शक यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणातून ही माहीती उघड झाली आहे. यांमध्ये ९० टक्के महिला आपल्या एकूण मिळकतीच्या काही टक्के रक्कम ही बचतीच्या रुपाने साठवत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांतील ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांचा या सर्वेक्षणात समावेश केला गेला होता. यामध्ये ४११ महिला उद्योजिकांचा समावेश केला गेला होता, ज्यात ४०२ स्वयंसहायता बचत गटांचा समावेश होता. त्याच्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे.
या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार सर्वेक्षणात सहभागी एकूण महिलांमधील ३३ टक्के महिला उद्योजिका या मिळकतीच्या २० ते ५० टक्के रक्कम बचत करु शकतात. ५७ टक्के महिला या २० टक्क्यांपेक्षा कमी आणि फक्त ५ टक्के महिला या ५० टक्क्यांपेक्षा जास्त बचत करु शकतात. या सर्वेक्षणाचा मूळ उद्देश हा ग्रामीण महिलांच्या आर्थिक गरजा आणि त्यांच्या बचतीच्या सवयी, तसेच त्यांच्या मिळकतीचे व्यवस्थापन करत त्यांची व्यावसायिकतेकडे वाटचाल त्या कशा पध्दतीने करतात या सर्व गोष्टी अभ्यासणे हा होता. यातून ही माहिती समोर आली आहे.
या सर्व बचतीपैकी ५६ टक्के महिला या बँक ठेवींचा पर्याय निवडतात. ३९ टक्के महिला या स्वयंसहायता गटांच्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात, तर १८ टक्के महिला या इतर कुठेही पैसे न गुंतवता फक्त घरातच पैसे ठेवतात. यामध्ये समोर आलेली एक अतिशय उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ६४ टक्के महिला आपल्या मिळकतीतील किंवा नफ्यातील बराचसा वाटा हा आपल्या उद्योगातच गुंतवतात जेणेकरुन व्यवसाय वृध्दीसाठी त्याचा उपयोग होईल यातून या महिला आपल्या उद्योगांकडे किती गांभीर्याने बघत आहेत आणि त्यातून त्या व्यावसायिकता किती जोपासत आहेत हे दिसून येते. बाकीची माहिती बघितली तर फक्त ११ टक्के महिला या बँकेच्या आरडी, मुदत ठेव यांसारख्या योजनांचा लाभ घेतात. फक्त ५ टक्के महिला या सोन्यात गुंतवणुक करतात.
एकूणच या सर्वेक्षणातून ग्रामीण भागातील महिला आपल्या पारंपारिक गोष्टींतून बाहेर पडत उद्योजकता स्वीकारत आहेत आणि त्यातून स्वत:चा विकास घडवून आणत आहेत ही महत्वाची माहिती समोर आली आहे. यातून ग्रामीण भारत सशक्त होत आहे हेच दिसते.