मुंबई : " महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण तयार झाले असून, येणाऱ्या काळात या लोककेंद्रीत सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे " असे प्रतिपादन सांस्कृतिक समितीच्या अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. दि. ३ मार्च रोजी मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. यावेळी पद्मश्री गिरीष प्रभुणे, संगीतकार कौशल इनामदार, अनिता यलमटे, आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे, सुनील दादोजी भंडगे,अभिनेते अभिराम भडकमकर, शितूदादा म्हसे, राजेश प्रभु साळगावकर, जगन्नाथ कृष्णा दिलीप, डॉ. दिलीप प्र. बलसेकर, पुराभिलेख संचालनालय संचालक सुजितकुमार उगले, साहीत्य अकादमी सहसंचालक सचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण सचिव संतोष खामकर, सदर बैठकीला उपस्थित होते.
दैनिक मुंबई तरूण भारतशी संवाद साधताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की " राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण तयार असून, या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागनिहाय वर्गीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण विभाग, पुरातत्तव विभाग, अशा विविध विभागांना समाविष्ट करून घेत धोरणांची लोकाभिमुख अंमलबजावणी केली जाणार आहे. या बद्दलची रूपरेखा समितीच्या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आली." मागील सरकारच्या कार्यकाळात धोरण निर्मितीस योगदान दिलेले सदस्य आणि नव्या अंमलबजावणी समितीच्या सदस्यांनी या बैठकीमध्ये आपला सहभाग नोंदवला. सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीवर भाष्य करताना संगीतकार कौशल इनामदार म्हणाले " येणाऱ्या काळात रसिककेंद्रीत सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी आपल्याला बघायाला मिळणार आहे. सदर सांस्कृतिक धोरणाच्या निर्मितीमध्ये आम्ही जमीनीवरील मूळ समस्यांचा आढावा घेतला आहे. त्याच बरोबर सर्वात महत्वाची बाब म्हणजे सदर सांस्कृतिक धोरण दूरदृष्टीने आखण्यात आले असून यामध्ये २५ ते ३० वर्षांचा विचार करण्यात आला आहे."