एप्रिल ते डिसेंबरपर्यंत २ कोटी, ११ लाखांचा दंड वसूल
06-Mar-2025
Total Views |
ठाणे: ( hawker in Thane ) अनधिकृत फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करूनही ठाण्यात फेरीवाले उदंड झाले आहेत. दुसरीकडे महापालिका हद्दीत या फेरीवाल्यांकडून तात्पुरता ताबा पावती वसुलीदेखील केली जात आहे. त्यानुसार एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत ठाणे महापालिकेने विविध प्रभाग समिती हद्दीत तब्बल २ कोटी, ११ लाख, ५० हजार, ८५१ रुपयांची वसुली केली आहे.
ठाणे महापालिका प्रशासनाच्यावतीने सध्या शहरात १२५ फेरीवाला क्षेत्र घोषित केले आहे. प्रभाग समिती निहाय दहा ते १२ फेरीवाला क्षेत्र असणार आहेत. २०१९ साली ठाणे महापालिकेने केलेल्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ सहा हजार फेरीवाले होते. यातील दोन हजार फेरीवाल्यांनी आपापले पुरावे प्रशासनाकडे जमा केले होते. दरम्यान, फेरीवाला धोरण अंतिम करताना फेरीवाल्यांची संख्या १ हजार, ३६५ एवढी निश्चित केली होती. सध्या तर फेरीवाल्यांची कमिटी अस्तित्वात नाही.
कामगार आयुक्तांच्या निर्देशानुसार नव्याने कमिटी तयार होणार असून त्यात २० जणांचा समावेश असणार आहे. त्यानुसार, लवकरच नव्या फेरीवाला समितीची निवडणूक घेतली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे फेरीवाला धोरण अद्याप राबविले जात नसल्याने रस्त्यांवर फेरीवाल्यांची संख्या वाढतच आहे. त्यातही अशा फेरीवाल्यांकडून महापालिका तात्पुरत्या स्वरूपात २० रुपये याप्रमाणे ताबा पावती वसूल केली जात आहे.
पालिका तात्पुरती ताबा पावती घेत असतानाही आमच्यावर कारवाई कशासाठी? असा सवाल फेरीवाल्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यातूनच पालिका कर्मचारी आणि फेरीवाल्यांमध्ये वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या तात्पुरता ताबा पावतीच्या माध्यमातून पालिकेने एप्रिल ते डिसेंबर २०२४ सालअखेरपर्यंत तब्बल २ कोटी, ११ लाख, ५० हजार, ८५१ रुपयांची वसुली केल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.