मुंबईमध्ये रंगणार ग्लोबल कोकण महोत्सव २०२५

संस्कृती संवर्धानाबरोबरच युवाशक्तीला बळ देणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन

    06-Mar-2025
Total Views |

global konkan festival

मुंबई : कोकणचा विकास म्हणजे केवळ मोठमोठे प्रकल्प नाहीत, तर आपली संस्कृती, आपली माणसं आणि आपला निसर्ग जपत पुढे जाण्याचा प्रवास आहे. हाच विचार पुढे नेण्यासाठी कोकण भूमी प्रतिष्ठान घेऊन येत आहे, ग्लोबल कोकण महोत्सव २०२५, दिनांक ६ मार्च ते ९ मार्च दरम्यान नेस्को ग्राउंड, गोरेगाव (मुंबई) येथे हा भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उद्योग मंत्री उदय सामंत भूषवणार असून, या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी रोजगार हमी योजना मंत्री भारत गोगावले असणार आहेत. या महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, वनमंत्री गणेश नाईक आणि महाराष्ट्राचे खाण मंत्री शंभुराज देसाई असणार आहेत.

यंदा ग्लोबल कोकणच्या दशकपूर्तीनंतरचे हे ११वे वर्ष, आणि या निमित्ताने कोकणवासीयांसाठी माहितीपूर्ण सत्रं, उद्योजकांसाठी मार्गदर्शन, आणि नव्या संधींची दारें उघडणार आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना, गुंतवणुकीच्या संधी, कोकणात स्टार्टअप्ससाठी नवे प्लॅटफॉर्म, कृषी आणि पर्यटन उद्योगातील नव्या कल्पना, शासकीय सवलती आणि सहकार्य याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष्य श्री संजय यादवराव यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार 'यावर्षी ग्लोबल कोकण महोत्सवातील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ‘कोकण बिझनेस कॉन्क्लेव्ह’. या चार दिवसांमध्ये एक भव्य मार्गदर्शन सेमिनार सुरू करण्यात येणार आहे. या कक्षात शेती, पर्यटन, मासेमारी, प्रक्रिया उद्योग, स्टार्टअप्स आणि शासकीय योजनांवरील तज्ज्ञ मंडळी प्रत्यक्ष येऊन कोकणवासीयांना वैयक्तिक मार्गदर्शन करतील. याशिवाय, छोटे-छोटे वर्कशॉप्स आयोजित करण्यात येणार आहेत, जे कोकणातील तरुणांना आणि उद्योजकांना नव्या संधी शोधण्यास मदत करतील.

दूरदृष्टीचा ग्लोबल महोत्सव!
ग्लोबल कोकण महोत्सव केवळ चार दिवसांपुरता मर्यादीत नसून, पुढची २५ वर्षे हे मिशन सुरू राहणार आहे. समृद्ध महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोकण विकासाचे विविध क्लब यासंदर्भात प्रत्यक्ष काम करत आहेत. गावागावात हजारो प्रकल्प उभे राहून लाखो तरुणांना कोकणातच रोजगार उपलब्ध होणे हा या अभियानाचा संकल्प आहे.

दररोज संध्याकाळी ५ ते १० वाजेपर्यंत कोकणच्या रंगारंग लोकसंस्कृतीचा सोहळा रंगणार आहे! कोकणातील सर्वोत्तम दशावतार नाट्यप्रयोग, परदेशात झळकणारे पहिले नमन सादरीकरण, आदिवासी परंपरेचा अभिमान – तारपा नृत्य, पालखी नृत्य, जाखडी नृत्य, गौरी नाच, कोकणी कवी संमेलन – शब्दांमधून कोकणाचा आवाज! ‘लाभले आम्हास भाग्य’ – कौशल इनामदार यांचा लोकप्रिय कार्यक्रम पार पडेल. तसेच ८ मार्चला मराठी हिप-हॉपचे भन्नाट सादरीकरण होणार आहे.कोकणचा अस्सल चवदार स्वाद घेण्यासाठी विशेष फूड फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे. यात मालवणी, आगरी, संगमेश्वरी, वाडवळ, सीकेपी, ब्राह्मणी अशा विविध खाद्यसंस्कृतींचे खास पदार्थ चाखायला मिळणार आहेत.

मुंबईत कमवायचं आणि कोकणात गुंतवायचं – हीच खरी स्मार्ट आयडिया!
मुंबईत नोकरी-उद्योग करताना पर्यटन, शेती, बागायती, मासे प्रक्रिया, गृहनिर्माण आणि स्थानिक उत्पादन आधारित उद्योग कोकणात उभे करणं शक्य आहे. कोकणच्या विकासाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यावी, कारण तुम्ही तुमची दिशा बदला, मगच कोकणाची दशा बदलेल!

आपलं कोकण म्हणजे केवळ गाव नाही, तर आपली ओळख आहे. ही संस्कृती, ही माती आपलीच आहे, मग ती सोडून जाणं योग्य का? कोकणात जमीन विकण्यापेक्षा ती विकसित करावी, बंद घरे सुरू करावीत, रिकाम्या शाळा पुन्हा गजबजून द्याव्यात, आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करावी.याच उद्दिष्टाने शिवस्वराज्य लोक चळवळ आणि ग्लोबल कोकण अखंड कार्यरत आहेत. कोकणच्या मातीशी आपली नाळ जुळलेली प्रत्येकाने या महोत्सवात सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावं!