एमएसएमई : भारताच्या विकासाचा कणा

    06-Mar-2025
Total Views |

editorial on msme sector s significant contribution
 
‘एमएसएमई’ क्षेत्र देशाच्या जीडीपीत सर्वाधिक भर घालणारे तर आहेच, त्याशिवाय कृषी क्षेत्राखालोखाल रोजगार देणारे क्षेत्र म्हणून ते उदयास आले. केंद्र सरकारनेही या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आखल्या आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत येत्या काळात जागतिक बाजारपेठेत ‘एमएसएमई’ क्षेत्र मोलाचे योगदान देताना दिसून येईल, हे निश्चित.
 
“सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ (एमएसएमई) हा भारताच्या विकासाचा कणा आहे,” असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगांना संधी निर्माण करण्याचे आवाहन परवा आपल्या भाषणात केले. केंद्र सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी तसेच, त्यांना पुरेसे भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी ठोस तरतूद केली असून, वर्गीकरण निकषांमध्येही बदल केला आहे. भारत हा जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंजिन म्हणून काम करत असून, विपरित परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्थेने आपली लवचिकता सिद्ध केली आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी विशेषत्वाने अधोरेखित केले. ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ (एमएसएमई) क्षेत्र हे भारताच्या उत्पादन आणि औद्योगिक विकासाचा कणा असल्याचे पंतप्रधान मोदी यांचे विधान महत्त्वाचे असेच आहे. या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेतील असलेले योगदान लक्षात घेता ते यथायोग्य असेच. ‘एमएसएमई’ अंतर्गत अनेक व्यवसायांचा समावेश होतो. हे उद्योग उत्पादन क्षेत्रात मोलाची भूमिका बजावत असून, जागतिक पुरवठा साखळी सुरळीत ठेवण्याचे काम ते करत आहेत. उत्पादनाव्यतिरिक्त, ‘एमएसएमई’ हे भारताच्या सेवा क्षेत्रातदेखील महत्त्वाचे योगदान देत आहेत. रोजगार देण्याबरोबरच जीडीपीमध्येही त्याचा मोठा वाटा आहे. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील आर्थिक क्रियाकलापांना चालना देण्याचे काम हे क्षेत्र करत असून, त्यामुळे सर्वसमावेशक विकासाला हातभार लागत आहे.
 
‘एमएसएमई’ म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग. हे उद्योग त्यांची गुंतवणूक आणि वार्षिक उलाढालीवर आधारित परिभाषित केले जातात. विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने त्यांची व्याख्या सुधारित केली असून, ‘एमएसएमई’मध्ये लघु-उत्पादन युनिट्सपासून सेवा प्रदात्यांपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्‍या व्यवसायांचा समावेश आहे. ‘एमएसएमई’ भारताच्या जीडीपीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतात. देशाच्या औद्योगिक उत्पादन आणि निर्यातीत त्यांचा मोठा वाटा असून, आर्थिक पाया सुनिश्चित करण्याचे काम ते करतात. ‘एमएसएमई’ हे श्रम-केंद्रित असल्याने, मोठ्या उद्योगांच्या तुलनेत ते प्रति युनिट गुंतवणुकीपेक्षा जास्त रोजगारांची निर्मिती करतात. भारतासारख्या जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या देशात, व्यापक रोजगार संधींची आवश्यकता असते. ही गरज हे क्षेत्र पूर्ण करत आहे. ग्रामीण तसेच निमशहरी भागातील कुशल तसेच अकुशल कामगारांना रोजगार देण्याचे काम ते करत आहे. ‘एमएसएमई’ हे बहुतांश वेळा नवोद्योगाला चालना देते. ग्रामीण आणि तुलनेने विकासापासून दूर राहिलेल्या प्रदेशात उद्योगवाढीचे काम यांच्या माध्यमातून होत आहे.
 
देशाच्या अर्थकारणात कळीची भूमिका बजावणार्‍या या क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. यात वेळेवर आणि आवश्यकतेनुसार कर्ज मिळणे हे मुख्य. बँका आणि वित्तीय संस्था अनेकदा यांना कर्ज देत नाहीत. जोखीम आणि तारणाचा अभाव हे त्यामागील मुख्य कारण. त्याचबरोबर, वीज, पाणी आणि वाहतूक यांसारख्या अपुर्‍या पायाभूत सुविधांचा अभाव त्यांच्या वाढीस अडथळा आणत आहे. अनेक ‘एमएसएमई’ आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यांपासून दूर आहेत. त्यामुळे त्यांची उत्पादकता आणि कार्यक्षमता मर्यादित होताना दिसून येते. आपल्या उत्पादनांचे आणि सेवांचे मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंग करण्यात ते यशस्वी होत नाहीत. त्यामुळे त्यांना मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करणे कठीण होते. त्यासाठीच केंद्र सरकारने या क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ‘एमएसएमईं’ना कर्ज देण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांना क्रेडिट हमी देण्यात येत आहे. तसेच, लहान व्यवसायांना कर्ज देण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांना आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे. नवीन ‘एमएसएमई’ स्थापन करण्यासाठी अनुदान आणि साहाय्य दिले जात असून, या क्षेत्रातील कामगारांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी कौशल्य विकास आणि प्रशिक्षण प्रदान केले जात आहे. यांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांना सरकारी योजना आणि फायदे मिळवणे सोपे होत आहे.
 
भारतातील ‘एमएसएमई’ हे क्षेत्र मोठे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र असून, देशाच्या जीडीपीमध्ये ‘एमएसएमई’चे योगदान अंदाजे ३० टक्के इतके आहे. तथापि, त्यांचा रोजगाराचा वाटा त्याहूनही मोठा आहे. एका अंदाजानुसार, ‘एमएसएमई’ देशभरात ११० दशलक्षांहून अधिक लोकांना रोजगार देते. कृषिनंतर दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत मोठे रोजगार निर्माण करणारे क्षेत्र म्हणून ते आज ओळखले जाते. ‘एमएसएमई’ हे सामान्यतः मोठ्या उद्योगांपेक्षा श्रम-केंद्रित असतात. याचा अर्थ ते प्रति युनिट गुंतवणुकीमध्ये जास्त नोकर्‍या निर्माण करतात. त्यामुळे बेरोजगारी दूर करण्यात ते मोलाची भूमिका बजावते. ‘एमएसएमई’ कुशल ते अकुशल कामगारांपर्यंत सर्वांनाच रोजगाराच्या विस्तृत संधी उपलब्ध करून देते. विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी हे क्षेत्र व्यापक स्वरूपात निर्माण करते. त्यामुळे शहरी भागाकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास तसेच, संतुलित प्रादेशिक विकासाला चालना मिळते. ‘एमएसएमई’ हे रोजगाराचे एक महत्त्वाचे स्रोत असून, त्यांची होणारी वाढ आणि विकास देशभरात अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी आवश्यक अशीच आहे.
 
‘एमएसएमई’ क्षेत्राचे भविष्य आशादायक असले, तरी त्याच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करणे आवश्यक असेच आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता अवलंब ‘एमएसएमई’साठी कळीचा ठरणार असून, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि डिजिटल मार्केटिंग टूल्स त्यांना त्यांची बाजारपेठ वाढविण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यास आणि खर्च कमी करण्यास सक्षम करणारे ठरेल. ‘एमएसएमई’ क्षेत्राला पाठिंबा देण्यावर म्हणूनच सरकार लक्ष केंद्रित करताना दिसून येते. कर्जाची सुलभ उपलब्धता, पायाभूत सुविधा विकास, कौशल्य विकास कार्यक्रम आणि सुव्यवस्थित नियामक प्रक्रियांचा यात समावेश आहे. नवोपक्रम आणि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर अधिक भर देण्यासाठी नवोपक्रमांना चालना देण्यात त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता प्रदान करण्यात नवोद्योग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत, भारत सक्रिय भूमिका बजावत असताना, या क्षेत्राला सर्वाधिक संधी आहे. तथापि, यासाठी त्यांना त्यांची स्पर्धात्मकता वाढवावी लागेल आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करावी लागेल.
 
भारतातील ‘एमएसएमई’ क्षेत्र येत्या काही वर्षांत लक्षणीय वाढीसाठी सज्ज असून, डिजिटल परिवर्तन, केंद्र सरकारचा सक्रिय पाठिंबा आणि नवोपक्रमावर लक्ष केंद्रित केल्याने त्यांच्या वाढीसाठी नवनवीन संधी निर्माण होत आहेत. यांचा पूर्णपणे लाभ घेत, ‘एमएसएमई’ क्षेत्र भारतातील आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकासाचा एक प्रमुख चालक बनण्यासाठी सज्ज झाले आहे.