मुंबई: ( rahul shewale on Rahul Gandhi Dharavi visit ) काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी धारावीत येऊन व्यावसायिकांशी संवाद साधण्याची जी नौटंकी केली, त्याचे वर्णन 'स्लम टुरिझम' याच शब्दांत करता येईल असे म्हणत शिवसेना उपनेते राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला.
तसेच, गेल्या ४ दशकांपासून गायकवाड परिवाराच्या माध्यमातून धारावीवर काँग्रेसची एकहाती सत्ता असताना तुम्हाला धारावीकरांचे दुःख , त्यांचा संघर्ष, त्यांचं दारिद्र्य दिसलं नाही का? तेव्हा तुम्हाला त्यांचा पुनर्विकास करावासा का नाही वाटला? असा प्रश्नही राहुल शेवाळे यांनी राहुल गांधींना केला आहे.
दरम्यान, राहुल गांधींच्या धारावी दौऱ्यावर भाष्य करताना शिवसेना उपनेते राहुल शेवाळे म्हणाले, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांचं हालाखीचं जीवन, त्यांचा दैनंदिन संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीत जगणारी माणसं, हृदय पिळवटून टाकणारे दारिद्र्य या साऱ्याचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी लाखो परदेशी पर्यटक धारावीला भेट देतात. हे पर्यटक काही तासांसाठी धारावीकरांचे हलाखीचे जीवन अगदी जवळून पाहतात, या संघर्षमय जीवनाचा थोडा अनुभव घेतात. मात्र, या पर्यटकांना प्रत्यक्षात धारावीकरांविषयी आत्मियता असेलच असे नाही. अगदी तशीच मनःस्थिती राहुल गांधी यांची आहे. एका आदरणीय घराण्यात जन्मलेल्या राहुल गांधी यांनी युवराजसारखे जीवन व्यतीत केले आहे. गरिबांच्या जीवनातील संघर्षाविषयी ते अनभिज्ञ आहेत. त्यामुळे एखाद्या परदेशी पर्यटकाप्रमाणे धारावीतील गरिबी, दारिद्र्य जवळून पाहण्यासाठी त्यांनी इथला दौरा केला असावा.
धारावीतील जनता त्यांचा हा डाव कदापि यशस्वी होऊ देणार नाही, याची मला एक धारावीकर म्हणून खात्री आहे. वास्तविक, राहुल गांधी यांची स्लम टुरिझमची खोड जुनी आहे. याआधीही त्यांनी धारावीत असेच दौरे करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दरवेळी स्थानिकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. प्रत्यक्षात,धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग आलेला पाहून या प्रकल्पाला सातत्याने विरोध करणाऱ्या काँग्रेसचे धाबे दणाणले आहेत. धारावीचा पुनर्विकास झाला तर स्थानिकांचा सर्वांगीण विकास होईल आणि गायकवाड घराण्याची पर्यायाने काँग्रेसची हुकूमशाही संपुष्टात येईल, हे स्पष्ट आहे. या भीतीपोटीच राहुल गांधींचा हा दौरा आयोजित करण्यात आला असावा, असे म्हणत शेवाळे यांनी राहुल गांधींचा आणि काँग्रेसचा समाचार घेतला आहे.