नवी मुंबई विमानतळ अन् वाढवण बंदरामुळे उद्योगांना चालना : राज्यपाल

    06-Mar-2025
Total Views |

Maharashtra Governor
 
मुंबई : ( Maharashtra Governor on Navi Mumbai Airport and Vadhan Port ) वाढवण बंदर आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे राज्याची अर्थव्यवस्था उंचीवर जाणार आहे. त्यातून ‘सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगां’ना चालना मिळेल. औद्योगिक विकासात लघु आणि मध्यम उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे,” असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी बुधवार, दि. ५ मार्च रोजी केले.
 
‘विकसित भारतासाठी लघु, मध्यम उद्योग क्षेत्राचा शाश्वत विकास’ या विषयावरील शिखर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ‘महाराष्ट्र इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशन’ आणि ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ यांनी या परिषदेचे आयोजन केले. यावेळी, ‘एसएमई चेंबर’चे संस्थापक तथा अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘एएचआय मीडिया लॅबोरेटरिज’चे अध्यक्ष डॉ. जी. एम. वारके, यांच्यासह इतर अधिकारी, उद्योजक आणि महिला उद्योजक उपस्थित होत्या.
 
याप्रसंगी राज्यपालांच्या हस्ते राज्यातील विविध लघु आणि मध्यम उद्योगांना २३वे ‘इंडिया एसएमई उत्कृष्टता पुरस्कार’ आणि १४वे ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. तसेच, राज्यपालांच्या हस्ते ‘राष्ट्रीय लघु व माध्यम उद्योग उत्पादकता अभियान’, एसएमई टीव्ही आणि एसएमई लीगल सेलचे उद्घाटन करण्यात आले.
 
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, “भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यात लघु व मध्यम उद्योगांचे योगदान महत्त्वाचे आहे. मोठे उद्योग, लघु उद्योग तसेच, सूक्ष्म उद्योग परस्परांना पूरक असल्यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग वाढले, तर त्यांची मोठ्या उद्योगांनादेखील मदत होणार आहे.”