मुंबई: ( Ashok Uike on Thacker community ) “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील प्रत्येकाला जातवैधता प्रमाणपत्र मिळेल,” असे आश्वासन आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी बुधवार,दि. ५ मार्च रोजी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांना दिले.
आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या लोहगड या निवासस्थानी याबाबत बैठक झाली. यावेळी मंत्री नितेश राणे, आ. चित्रा वाघ, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच, ठाकर समाजाचे प्रतिनिधी, ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे, सिंधुदुर्ग जिल्हा ठाकर समाज जिल्हाध्यक्ष शशांक आटक, कार्याध्यक्ष साबाजी मस्के आदी उपस्थित होते.
मंत्री अशोक उईके म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजबांधवाना जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (टीआयटी) तसेच, संबंधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांसोबत बैठक घेऊन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेऊ. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विभागाने कार्यवाही करावी.
कोणत्याही शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, याची काळजी द्यावी. त्यासाठी आदिवासी विभागाने तातडीने बैठक बोलवावी आणि तज्ज्ञ समितीकडून सूचना घेऊन अपेक्षित बदलांबाबत कार्यवाही करावी,” अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी मंत्री अशोक उईके यांच्यासमोर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणेचे उपायुक्त दिनकर पावरा यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचण्यात आला.