महिलांचे आर्थिक स्वावलंबन हाच विकसित भारताचा पाया – अमृता फडणवीस

दिव्याज फाऊंडेशन, मुंबई महापालिका आणि एनएसई यांच्यात महिला सक्षमीकरणासाठी सामंजस्य करार

    06-Mar-2025
Total Views |
 
amruta
 
मुंबई : महिलांचे आर्थिक स्वावलंबन हाच विकसित भारताचा पाया आहे असे प्रतिपादन करत सामाजिक कार्यकर्त्या आणि दिव्याज फाऊंडेशनच्या संस्थापिका अमृता फडणवीस यांनी केले आहे. महिला बचतगटांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुंबई महापालिका, एनएसई आणि दिव्याज फाऊंडेशन यांच्यात बीकेसी येथे सामंजस्य करार संपन्न झाला. यात महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी या सोहळ्या प्रसंगी एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार चौहान, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अभिनेत्री शर्वरी वाघ हे उपस्थित होते. या सामंजस्य कराराप्रसंगी एनएसईची प्रतिकात्मक घंटा वाजवली गेली.
 
आताचा काळ हा महिलांनी आधुनिकतेचा स्वीकार करण्याचा आहे. महिलांनी फक्त पैसे कमावणे एवढेच महत्वाचं नाहीये तर तो पैसा कसा आणि कुठे गुंतवला तर तो भविष्यात आपल्याला उपयोगी ठरु शकेल याचा विचार केला पाहिजे तरच महिला आर्थिकदृष्ट्या फक्त सक्षमच नाहीत तर स्वावलंबीसुध्दा होतील. असे अमृता यांनी आपल्या प्रतिपादनात म्हटले.
 
पूर्वीच्या काळी महिला पै – पै गोळ करत संसाराला हातभार लावत असत. आता त्यातून बाहेर पडत आधुनिक काळातील गोष्टींचा स्वीकार करणे गरजेचे आहे. आज महिलांकडे सर्व शक्ती आहेत त्यांचा उपयोग केला तरच आपल्याला विकसित भारताचे ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण करता येईल. असे सांगत अमृता फडणवीस यांनी स्त्री शक्तीचे महत्व विशद केले.
 
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात आर्थिक साक्षरता महत्वाची - भूषण गगराणी
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणात आर्थिक साक्षरता खूप महत्वाची आहे. कारण पैसे कसे कमवायचे हे शिकणे सोपे आहे, परंतु आर्थिक साक्षरतेशिवाय आर्थिक सक्षमीकरण शक्यच नाही. आज महिलांसाठी उपक्रम राबवणारे अनेक मिळतील पण महिला सक्षमीकरण या खरोखरच गरजेच्या विषयावर अशा प्रकारे कार्यशाळांच्या माध्यमातून काम करायचे ठरवल्याबद्दल अमृता फडणवीस यांचे आभार असे सांगत मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
 
महिलांना अर्थसाक्षर करणे हा आमचा प्रधान कार्यक्रम – आशिषकुमार चौहान
जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर होणारा हा सामंजस्य करार एक महत्वाचे ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. स्त्रिया या भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या गुंतवणुकदार आहेत. एनएसई म्हणून या अशा कार्यक्रमांत सहभागी होणे आमच्यासाठी कायमच महत्वाची गोष्ट राहिली आहे. त्यातही महिलांची आर्थिक साक्षरता हा आमचा प्रधान कार्यक्रम असणार आहे. यापुढेही एनएसई अशा प्रकारचे उपक्रम करत राहील अशी ग्वाही मी याप्रसंगी देतो असे प्रतिपादन एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांनी केले.
 
या कार्यक्रमप्रसंगी चांगली कामगिरी करुन दाखवणाऱ्या महिला बचतगटांचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या उपक्रमामध्ये महिलांना गुंतवणुकीच्या विविध पर्यायांबद्दलही मार्गदर्शन, प्रशिक्षण दिले जाणार आहे.