राज्यात औषध खरेदीमध्ये मोठा घोटाळा

अस्तित्वात नसलेल्या कंपनीकडून खरेदी; अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये बनावट औषधे

    06-Mar-2025
Total Views |
 
medicine scam
 
मुंबई: ( medicine scam in the maharashtra state ) अस्तित्वात नसलेल्या बोगस आस्थापनांकडून वर्ष २०२२ ते २३ मध्ये लाखो रुपयांची बनावट औषधे खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये औषधांचा मूळ घटकच अस्तित्वात नसल्याची गंभीर बाब लक्षात आल्यावर राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांतील बनावट औषधांचा साठा सील करण्यात आल्याची माहिती बुधवार, दि. ५ मार्च रोजी चर्चेत आली.
 
उत्तराखंड येथील ज्या मे. मिरीस्टल फॉमुलेशन, आस्थापनेकडून या औषधांची खरेदी करण्यात आली, ती आस्थापनाच अस्तित्वात नसल्याचे उघड झाले. उबाठा गटाचे आ. सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ही चर्चा झाली. बनावट औषधे खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारकडे कुणी आणला आणि खरेदी करण्याचा आदेश कुणी दिला, यामध्ये दोषी असलेले मंत्री आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रभू यांनी केली. तर, या प्रकरणातील दोषी अधिकार्‍यांना कारागृहात टाकून त्यांना नियमित दहा बनावट गोळ्या खायला द्याव्यात, अशी मागणी भाजपचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात केली.
 
दोन वर्षांनंतरही औषधांची पडताळणी नाही
 
वर्ष २०२२-२३ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय (आंबेजोगाई, बीड), नांदेड, वर्धा, ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालये, कळमेश्वर ग्रामीण रुग्णालय (नागपूर), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (नागपूर), आय.जी.एम. रुग्णालय (भिवंडी), ठाणे येथील जिल्हा परिषद रुग्णालय या आठ शासकीय रुग्णालयांना पाठवलेली औषधे आणि गोळ्या बनावट असल्याचे आढळून आले. त्यावर अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, “वर्ष २०२२ - २३ मध्ये राज्यातील तब्बल ७ हजार, ५०० नमुने पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहेत; मात्र त्याचे अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. गंभीर म्हणजे दोन वर्षांनंतरही औषधांची पडताळणी होऊ शकलेली नाही.
 
पडताळणीसाठी मनुष्यबळाची कमतरता : मंत्री नरहरी झिरवाळ
 
“या औषधांची खरेदी स्थानिक पातळीवर रुग्णालयांद्वारे करण्यात आली. स्थानिक अधिकार्‍यांच्या पातळीवर या औषधांच्या खरेदीचा निर्णय झाला. हा विषय आरोग्य विभाग आणि अन्न प्रशासन विभाग यांच्याशी संबंधित असल्यामुळे दोन्ही विभागांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. अन्न-औषध प्रशासन विभागात मनुष्यबळ आणि औषधांची पडताळणी करण्यासाठी प्रयोगशाळाही अल्प आहेत,” अशी हतबळता अन्न आणि औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली.
 
अधिवेशन संपण्यापूर्वी दोषींवर कारवाई करू
 
मी मंत्री झाल्यावर विविध राज्यांतून खरेदी करण्यात आलेल्या औषधांची पडताळणी करण्यात आली. बनावट औषधे खरेदीचा आदेश देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभाग, आरोग्य विभाग आणि महानगरपालिका आदी ज्या ठिकाणी बोगस औषधांची खरेदी करण्याचा आदेश देण्यावर कारवाई केली जाईल. अधिवेशन होण्यापूर्वी ही कारवाई केली जाईल.
 
- प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री