अनिल परबांकडून स्वतःची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना

    06-Mar-2025
Total Views |
 
Anil Parab
 
मुंबई : सपा आमदार अबू आझमीने औरंग्याची भलामण केल्यानंतर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या 'उबाठा' गटाच्या आ. अनिल परब यांनी स्वतःची तुलना धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांशी केली आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून, त्यांचा निषेध करण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे.
 
विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलत असताना आ. अनिल परब यांनी, 'छावा'प्रमाणे मीही अत्याचार भोगले, पण 'पक्ष' बदलला नाही, असे विधान केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील सहकाऱ्यांना घेऊन छावा चित्रपट पाहिला. पण राज्यपालांच्या अभिभाषणात छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख आढळला नाही. तुम्ही छावा बघता, तर मला पण बघा..., धर्म बदलण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाला. माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी छळ झाला. मी सगळे भोगले, पण पक्ष बदलला नाही. बाकी सर्वांना जरा हूल दिली की, लगेच गेले पक्ष सोडून”, असे ते म्हणाले.
 
अनिल परब यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिव आणि शंभूप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, राज्यभरातून परबांचा निषेध केला जात आहे. भाजपच्या वतीने शुक्रवार, दि. ७ मार्च रोजी अनिल परब यांचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.