मुंबई : दक्षिण भारतीय संगीतसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आणि गीतकार कल्पना राघवेंद्र बेशुद्ध अवस्थेत आढळली असून, त्यांना तातडीने हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा कल्पनाचे घर दोन दिवसांपासून बंद असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, कल्पना बेशुद्धावस्थेत आढळल्या. तातडीने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्या व्हेंटिलेटरवर असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
नेमकं काय घडलं?
कल्पनाने आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही. केपीएचबी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी त्यांचा पती प्रसाद घरी नव्हता. त्याच्या जबानीनंतर काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कल्पना राघवेंद्र कोण आहेत?
कल्पना राघवेंद्र या दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या पार्श्वगायिका आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी गायनाची सुरुवात केली. २०१३ पर्यंत त्यांनी तब्बल १,५०० हून अधिक गाणी गायली आहेत. तसेच ३,००० पेक्षा जास्त स्टेज शो करून रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांनी इलैयाराजा आणि ए. आर. रहमान यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबतही काम केले आहे.
कल्पनाने केवळ गायनच नाही, तर अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावले आहे. त्या कमल हसन यांच्या ‘पुन्नगाई मन्नन’ चित्रपटात झळकल्या होत्या. तसेच, ‘बिग बॉस तेलुगू – सीझन १’ मध्ये स्पर्धक म्हणून देखील सहभागी झाल्या होत्या. सध्या कल्पना राघवेंद्र यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल का, याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.