चोरीचा मामला...प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव ला तस्करीच्या प्रकरणी हातात सोन्याच्या बेड्या!

    05-Mar-2025
Total Views |



kannada actress ranya rao arrested in gold smuggling case! shocking action at bengaluru airport




मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव हिला सोन्याच्या तस्करीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी रात्री कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तिच्याकडून तब्बल १४.८ किलो सोनं जप्त केलं. गेल्या काही दिवसांपासून तिच्या संशयास्पद हालचालींवर सुरक्षा यंत्रणांनी लक्ष ठेवलं होतं. १५ दिवसांत चार वेळा दुबईला प्रवास केल्याने तिच्यावर संशय बळावला होता. सोमवारी रात्री ती भारतात परतत असताना, अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. या तपासात तिच्या कपड्यांच्या आतील बाजूस चतुराईने लपवून ठेवलेलं सोनं आढळून आलं.
डीजीपीची सावत्र मुलगी असल्याचा केला दावा
तपासादरम्यान, रान्या रावने आपल्या सावत्र वडिलांच्या पदाचा गैरवापर करून सुटण्याचा प्रयत्न केला. ती कर्नाटक पोलिस गृहनिर्माण महामंडळाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) के. रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी असल्याचा दावा करत, तिने स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता, तिच्यावर कारवाई केली.
सोन्याची तस्करी टोळीचा भाग? पोलिसांचा सखोल तपास सुरू
रान्या राव ही या तस्करी प्रकरणात एकटी कार्यरत होती की, दुबई-भारत दरम्यान चालणाऱ्या मोठ्या तस्करी टोळीचा भाग होती, याचा तपास सध्या सुरू आहे. तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या नोंदी, आर्थिक व्यवहार आणि संपर्क असलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे.
चित्रपटसृष्टीतून मोठा धक्का
२०१४ मध्ये 'माणिक्य' या सुपरहिट चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या रान्या रावने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अटकेने कन्नड चित्रपटसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पीटीआयच्या वृत्तानुसार, अटकेनंतर रान्या रावला तातडीने न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.