औरंगी अबूला अद्दल घडवाच!

    05-Mar-2025
Total Views |
 
editorial on mla abu azmis remark on aurangzeb
 
 
प्रत्यक्ष जन्मदात्याला तुरुंगात टाकणार्‍या आणि ज्येष्ठ बंधूंची हत्या करणार्‍या औरंगजेबाने आपल्या पोटच्या पोरांचीही गय केली नाही. आपल्या बहुतेक पुत्रांना एकतर आजन्म तुरुंगवासात टाकले किंवा त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी आयुष्यभर रानोमाळ भटकविले. अशा औरंगजेबाने हिंदू आणि शिखांच्या महापुरुषांची हत्या केली. हिंदूंचा धार्मिक छळ केला, यात नवल ते काय! पण, ज्या जिहाद्याने महाराष्ट्राच्या छत्रपतींची हाल हाल करून हत्या केली, अशाबद्दल चुकूनसुद्धा चांगले शब्द काढण्याची कोणाची हिंमत या महाराष्ट्रातच होते, हा हिंदवी अस्मितेचा अपमानच मानला पाहिजे.
 
समाजवादी पक्षाचा आमदार अबू असीम आझमीने ‘छावा’ चित्रपट पाहिला की नाही, हे ठाऊक नाही. पण, त्याने तो पाहिला नसण्याचीच शक्यता अधिक. याचे कारण, त्याने जर हा चित्रपट पाहिला असता, तर दोन दिवसांपूर्वी मुघल शासक औरंगजेब याच्याबद्दल जे गौरवोद्गार काढले, तसे काढण्याची हिंमत झाली नसती. हे विधानही आम्ही त्याच्या सदसद्विवेकबुद्धीवर विसंबून करीत आहोत. कारण, ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला असेल, ते औरंगजेबाबद्दल अगदी स्वप्नातही गौरवोद्गार काढू शकणार नाहीत. पण, लोकप्रतिनिधीचे कवच घातलेल्या अबू आझमीने विधिमंडळाच्या प्रागंणातच खुलेपणाने औरंगजेबाची प्रशंसा केलेली पाहावी लागावी, हा समस्त मराठी जनतेसाठी काळा दिवस ठरला पाहिजे.
 
औरंगजेबच नव्हे, तर सर्वच मुघल शासकांची स्तुती करणे, हा मतांसाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणार्‍या भारतातील सेक्युलर नेत्यांचा परिपाठच. काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, एआयएमआयएम वगैरे पक्षांच्या नेत्यांकडून मुघल शासकांचे नेहमीच उघड उघड उदात्तीकरण केले जाते. त्यामागे निव्वळ निवडणुकीचे राजकारण असते. राज्यातील मुस्लीम मतदारांकडूनही या पक्षांच्या नेत्यांना एकगठ्ठा मतदान केले जाते. त्यामुळेच आता महाराष्ट्रात खुलेआम औरंगजेबाला ‘उत्कृष्ट प्रशासक’ आणि ‘उदार राजा’ वगैरे म्हणण्याची हिंमत काही लोकप्रतिनिधींच्या ठायी आली आहे, असे दिसते. सपाचा आमदार अबू आझमी हा पूर्वीपासूनच एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असून, आता तर त्याने उघडपणे औरंगजेबाची प्रशंसा केलेली पाहण्याचे दुर्दैव महाराष्ट्रातील जनतेवर ओढवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे आझमीवर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे.
 
अबू आझमीने ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाच्या व्यक्तिचित्रणावर आक्षेप घेताना त्याची स्तुती केली होती. त्यावरून ताजा वाद उद्भवला. “औरंगजेब हा क्रूरकर्मा शासक नव्हता, उलट तो एक उत्कृष्ट प्रशासक होता,” असे सांगत अबू आझमी म्हणतो की, “त्याच्या पदरी हिंदू सरदारही होते. त्याने भारताच्या सरहद्दी काबूलपासून बंगालपर्यंत नेल्या होत्या. तो क्रूरकर्मा नव्हता, तर आपल्या राज्याच्या विस्तारासाठीच त्याचे मराठ्यांशी युद्ध झाले,” अशी मुक्ताफळे अबू आझमीने उधळली आहेत. अशाप्रकारे इतिहासाचा विपर्यास कसा करावा, हे या सेक्युलर नेत्यांकडूनच शिकावे.
 
औरंगजेब हा हिटलरपेक्षाही मोठा क्रूरकर्मा होता. त्याने निव्वळ बादशाही मिळविण्यासाठी आपल्या जन्मदात्याला आयुष्याच्या अखेरच्या दिवसांत तुरुंगात डांबले आणि झुरत ठेवले. आपल्या तीन सख्ख्या भावांच्या हत्या केल्या. इतकेच नव्हे, तर आपल्या सत्तेला आव्हान देणार्‍या पोटच्या पोरांनाही एकतर आजन्म तुरुंगात टाकले किंवा त्यांना आपल्या जिवाच्या भीतीने भारतभर वणवण फिरण्यास भाग पाडले. ज्याने तख्ताच्या लोभापायी रक्ताच्या नात्याची किंमत ठेवली नाही, त्याच्याकडून इतरांवर अन्याय झाला, तर त्यात नवल नाही. औरंगजेबाने आदिलशहा आणि कुतुबशहा या मुस्लीम शासकांनाही त्यांच्या गादीवरून खाली खेचले आणि त्यांना आजन्म तुरुंगवासात टाकले. अशा व्यक्तीने हिंदू आणि शिखांवर धर्मप्रेमापोटी अनन्वित अत्याचार केल्यास नवल ते काय! औरंगजेबाने शिखांच्या सर्वोच्च गुरुंची केवळ हत्याच केली नाही, तर त्यांचे अनन्वित हाल करून त्यांना ठार मारले. हिंदूंच्या आराध्य दैवतांची हजारो मंदिरे उद्ध्वस्त केली आणि त्यांच्या जागी मशिदी उभ्या केल्या. हिंदूंना त्यांच्याच भूमीत जगण्यासाठी ‘जिझिया कर’ भरावा लागत होता. त्याने धर्मांधतेतून हजारो हिंदूंची हत्या केली. अशी ही व्यक्ती कोणाला महान वाटत असेल, तर त्याच्या सडक्या मानसिकतेवर उपचारांची नितांत आवश्यकता आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंग्याच्या सत्तेच्या नाकावर टिच्चून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या मुलानेही प्रतिकूल परिस्थितीत औरंगजेबाला राज्यात वणवण फिरविले. फंदफितुरीमुळे ते हाती सापडताच, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचीही तसेच हाल करून हत्या केली. पण, हे अत्याचार सहन करूनही संभाजीराजांनी अखेरपर्यंत आपला धर्म सोडला नाही, म्हणूनच संभाजीराजे ‘धर्मवीर’ ठरतात, औरंगजेब नव्हे!
 
एकीकडे प्रेषितांबद्दल वस्तुनिष्ठ वक्तव्य केले, तरी अशा व्यक्तींच्या जिवाला भारतात धोका निर्माण होतो. सलमान रश्दी यांच्यासारख्या लेखकावर तब्बल ३३ वर्षांनंतरही एक माथेफिरू जिहादी हल्ला करतो. पण, मराठी जनताच काय, समस्त राष्ट्रवादी विचारांच्या भारतीयांमध्ये परम आदराचे स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत मात्र कोणीही अनादराची वक्तव्ये करू शकतो, हे हिंदूंचा आत्मसन्मान लोप पावल्याचे लक्षण म्हणावे का? राज्यातील मुस्लीम जनता औरंगजेबाला आपला नायक मानत नसेल, तर त्यांच्या संघटनांनी अबू आझमीचा निषेध केला पाहिजे. पण, तसे घडताना दिसत नाही.
 
अबू आझमीने मुळात ही वक्तव्ये करायला नको होती. ते औरंगजेबाला महान मानीत असतील, तर त्यांना तसे वैयक्तिक मत बनविण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी हे वैयक्तिक मत जाहीरपणे व्यक्त करणे, हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमानच! आपल्या वक्तव्यांमुळे वादंगच माजेल, हे त्यांना चांगले ठाऊक होते. तरीही ते करण्याची हिंमत ते करू शकले. एका अर्थी त्यांनी ही विधाने केली ते बरेच झाले. कारण, त्यामुळे त्यांची जिहादी मानसिकता उघड झाली. आता औरंग्याबद्दल केलेली विधाने मागे घेतल्याची घोषणा त्यांनी केली असली, तरी त्यामुळे काहीएक फरक पडत नाही. कारण, त्यांचा हेतू साध्य झाला आहे. मात्र, अशी व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य असावी, ही या राज्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल. राज्यात हिंदुत्त्ववादी विचारांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे अबू आझमीवर कडक कारवाई होऊन, अशाप्रकारे पुन्हा औरंग्याच्या उद्दातीकरणाचा उच्छृंखलपणा पुन्हा कुणीही करणार नाही, अशी जन्माची अद्दल घडवावी हीच अपेक्षा...