कॅन्सरमुक्त समाजासाठी...

    05-Mar-2025   
Total Views |

dr. dipali bapurao godghate
 
‘मातृशक्तीचा जागर आणि कॅन्सरमुक्त राहो प्रत्येक घर’ हे ब्रीदवाक्य घेऊन सेवाकार्य करणार्‍या नवी मुंबईच्या डॉ. दिपाली बापूराव गोडघाटे यांच्या सम्यक विचारकार्यांचा मागोवा घेणारा हा लेख...
 
“डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर संघर्ष करावा लागला. मात्र, जेव्हा ते निर्णय घेण्याच्या शक्तिशाली भूमिकेत आले, तेव्हा त्यांनी केवळ शाश्वत मानवी मूल्यांच्या आधारे सर्वच समाजाच्या विकासासाठी, कल्याणासाठी निर्णय घेतले. त्यांचे हे विचार आपण कायमच लक्षात ठेवायला हवेत,” असे बापूराव गोडघाटे त्यांच्या लेकीला म्हणजे, दिपाली यांना सांगत असत. त्यामुळेच डॉ. बाबासाहेबांची समाज-देशाप्रति निष्ठा, विवेकशीलता या विचारांनीच दिपाली यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. ‘मातृशक्तीचा जागर आणि कॅन्सरमुक्त राहो प्रत्येक घर’ हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी अवघा महाराष्ट्र पिंजून काढला. त्या ‘दिपीशा फाऊंडेशन’, ‘दिपीशा कॅन्सर सेंटर’च्या आणि ‘स्मार्ट केअर सेंटर’च्या सर्वेसर्वा आहेत; तर ‘मिलिंद वाचनालया’च्या विश्वस्त आहेत. नुकतेच त्यांना ‘सेवाभारती विवेकानंद पुरस्कारा’ने सन्मानित करण्टयात आले. तसेच, ‘उलवे रत्न’, ‘स्वयंम सिद्धा पुरस्कार’, ‘डायनामिक पॉवर वुमेन’, ‘इंडियन प्राईम वुमेन आयकॉन पुरस्कार’ अशा अन्य अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत.
 
‘जिंकू किंवा मरू’ हे गीत असू दे की, ‘हम होंगे कायमाब’ हे गीत असू दे, दिपाली यांचे बाबा ही दोन्ही गीते त्यांच्या पाच लेकींना ऐकवित असत. त्या गीतांचा अर्थ सांगत असत. “आपले ध्येय निश्चित करा. मात्र, ते ध्येय मानवतेच्या कल्याणासाठीचे असावे. निराश न होता जिंकायच्या आवेशानेच ध्येयासाठी काम करा,” असे ते म्हणत. त्यामुळे दिपालीमध्ये हाती घेतलेले काम पूर्ण निष्ठेने आणि आत्मसमर्पणाने करण्याची जिद्द निर्माण झाली. बापूराव गोडघाटे आणि पुष्पा हे मूळचे वर्ध्याचे. मात्र, बापूराव रेल्वेमध्ये नोकरीला होते. त्यामुळे कामासाठी ते कुटुंबासह भुसावळच्या एका गावखेड्यात राहायचे. पुष्पाबाई या गावातल्या सगळ्या आयाबायांच्या अडीनडीला धावून जायच्या.
 
असो. लहानपणापासूनच दिपाली अभ्यासात हुशार होत्या. त्यांच्या मैत्रिणीचे बाबा डॉक्टर होते. गावातून त्यांना मिळणारा आदर, सन्मान पाहून दिपाली यांनी लहानपणापासूनच ठरवले की, आपणही डॉक्टर व्हायचे. त्यांच्या स्वप्नांना बापूराव यांनी पंख दिले. वैद्यकीय शाखेचे ‘बीएचएमएस’चे शिक्षण घेण्यासाठी दिपाली मुंबईत आल्या. इथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य डॉ. स्वाती तुळपुळे होत्या. त्यांनी दिपाली यांची अक्षरश: मुलीसारखी काळजी घेतली. प्रशिक्षणानंतर त्यांनी विविध वैद्यकीय आस्थापनांमध्ये काम केले. तसेच, ‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस’चे प्रशिक्षणही त्यांनी पूर्ण केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अनेक वैद्यकीय संस्थांसोबत काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘दुबई केअर’, ‘व्हॉलेंटीयर इन युएई’, ‘व्हॉलेंटीयर ग्लोबली’ या संस्थांसोबत काम करण्यासाठी त्या काही वर्षे परेदशातही होत्या.
 
१५ वर्षे संस्था, आस्थापनासोबत काम केल्यानंतर त्यांनी ठरवले की, आता समाजासाठी काम करता येईल, यासाठी नियोजन करायला हवे. त्यातूनच त्यांनी उलवे येथे ‘स्मार्ट केअर सेंटर’ उभे केले. त्याद्वारे गरीब, गरजूंच्या आरोग्यासाठी काम करू लागल्या. ‘कोरोना’ काळातही त्यांनी हे काम सुरू ठेवले. उलट ‘कोरोना’ काळात आरोग्य सेवेसोबतच, शक्य ती सर्वच मदत त्यांनी सेंटरच्या माध्यमातून सुरू केली. याच काळात त्यांच्या आईला कर्करोगाचे निदान झाले. आईचा उपचार करत असताना परळचे टाटा हॉस्पिटल किंवा इतरही खासगी हॉस्पिटलचा संपर्क होत होता. त्यावेळी देशभरातून आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची परिस्थिती पाहून दिपाली यांच्या मनात विचार आला की, रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना समुपदेशन, आजारासंदर्भात आणि मदतीसंदर्भात वेळीच मार्गदर्शन मिळाले, तर त्यांचा कितीतरी त्रास कमी होईल. या विचारांनी त्यांनी ‘दिपीशा फाऊंडेशन’ची निर्मिती केली. पुढे त्यांनी ‘दिपीशा केअर सेंटर’ही सुरू केले. या माध्यमातून रुग्णांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि उपचार केले जातात. रुग्णाच्या उपचाराचा खर्च सरकार प्रशासन आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून करण्यासाठी दिपाली प्रयत्नशील असतात.
 
गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण समाजात वाढले आहे. या कर्करोगासंदर्भात समाजात जागृती व्हावी, यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर शिबिरांचे आयोजन केले. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने रायगडमधील पाच हजार विद्यार्थिनींना गर्भाशयाचा कॅन्सर होऊच नये, यासाठीची लस दिली. महाराष्ट्रभर हे काम सुरू आहे. हे सगळे करताना त्यांना काही बरेवाईट अनुभवही आले. बौद्धधर्मीय असून त्यांच्या सेंटरमध्ये त्या गणेशोत्सव साजरा करतात, म्हणून त्यांना समाजातील काही लोकांनी प्रश्न विचारले. मात्र, दिपाली म्हणाल्या, “आपण सगळ्यांसाठी काम करतो. कुणाच्या श्रद्धा न दुखावता आपल्या श्रद्धा जपतो, हे आपले संविधानिक कार्य आहे.” त्यांचा विचार संबंधितांना पटतोही. तर अशा या डॉ. दिपाली गोडघाटे यांचा ‘मेडिकल असोसिएशन’चे डॉ. गिरीश चरडे यांच्याशी संपर्क झाला. रा. स्व. संघाचे नि:स्वार्थी, समाजशील आणि देशनिष्ठ विचारकार्याची त्यांना ओळख झाली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक विचारकार्याच्या प्रेरणेनुसारच रा. स्व. संघाचे कार्य सुरू आहे, असे त्यांना वाटते. डॉ. दिपाली गोडघाटे यांचे विचारकार्य समाजासाठी आदर्श आहेत.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.