म्युच्युअल फंड गुंतवणुकीत अव्वल पाच शहरांत मुंबईचा नंबर पहिला
महाराष्ट्रातील पुण्याचाही पहिल्या पाचात समावेश
05-Mar-2025
Total Views |
मुंबई : भारतीय सर्वसामान्यांच्या दृष्टीने म्युच्युअल फंड्स हे गुंतवणुकीचे महत्वाचे साधन बनले आहेत. दरवर्षी या म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. याच म्युच्युअल फंड्सच्या दृष्टीने एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार देशातील सर्वात जास्त म्युच्युअल फंड गुंतवणुकदार हे देशातील फक्त पाच शहरांतून येतात. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, कोलकाता, पुणे अशी या पाच शहरांची नावे आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांचा यात समावेश होतोय ही महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे.
अॅबॅकस या अॅसेट मॅनेजमेंट कंपनीकडून हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार देशातील एकूण म्युच्युअल फंड्स गुंतवणुकदारांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक गुंतवणुकदार हे फक्त याच पाच शहरांतून येतात. यात विशेष म्हणजे देशातील एकूण म्युच्युअल फंड अॅसेट्सपैकी एकट्या मुंबईचा वाटा हा २७.२९ टक्के आहे आणि मुंबईकरांची म्युच्युअल फंडातील एकूम गुंतवणुक ही १८.९२ लाख कोटी इतकी आहे. यामुळे मुंबईकरांचा वाटा या क्षेत्रातही सर्वात जास्त आहे.
मुंबईनंतर क्रमांक लागतो दिल्लीचा. दिल्लीकरांचा वाटा हा एकूण म्युच्युअल फंड्स गुंतवणुकदारांमध्ये १२.२५ टक्के इतका असून त्यांचा गुंतवणुकीतील वाटा हा ८.५ लाख कोटी इतका आहे. महाराष्ट्रातील दुसरे शहर पुण्याचा देशात चौथा क्रमांक लागतो. देशातील एकूण म्युच्युअल फंड्स गुंतवणुकदारांमध्ये ३.९ टक्के असून त्याचा एकूण गुंतवणुकीतील वाटा हा २.७ लाख कोटी इतका आहे. याशिवाय बंगळुरु आणि कोलकाता या दोन शहरांचा अनुक्रमे तिसरा आणि पाचवा क्रमांक लागतो.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया या देशातील म्युच्युअल फंड्स गुंतवणुकदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार नोव्हेंबर २०२४ पर्यंत देशातील म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीने ६८ लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. २०२३-२४ या एकाच वर्षात म्युच्युअल फंड्समधील गुंतवणुक ही तब्बल १८ लाख कोटींनी वाढली आहे. आजकाल म्युच्युअल फंड्स हा गुंतवणुक प्रकार अफाट लोकप्रिय होतो आहे. शेअर बाजारापेक्षा तुलनेने सुरक्षित आणि बँकांपेक्षा जास्त परतावा देणारा गुंतवणुक प्रकार म्हणून समोर येत आहे.