प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत ठाण्यात ६४६२ घरकुलांना मंजुरी
कातकरी कुटुंबांनाही मिळणार पक्के घरकुल
05-Mar-2025
Total Views |
ठाणे: ( Narendra Modi ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजाती गौरवदिनानिमित्त ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ सुरू केले आहे. या अभियान अंतर्गत आदिम जमातीतील पात्र कुटुंबांसाठी देशात ४.९० लाख लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, शहापूर व कल्याण तालुक्यातील वर्ष २०२४-२५ अंतर्गत या अभियानात आदिम जमातीतील १३ हजार, ३२ कुटुंबांचे सर्वेक्षण करून ६ हजार, ४६२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. तर, कातकरी कुटुंबांना घरकुल देण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत मिशन मोडवर कामकाज करण्यात येत आहे.
प्रथमतः अंबरनाथ, भिंवडी, मुरबाड तालुक्यातील केवळ ३५ ग्रामपंचायतींचा ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान’ अंतर्गत समावेश करण्यात आला होता. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडील पाठपुराव्याने व जिल्ह्यातील आदिवासी संघटनांकडून वेळोवेळी केलेल्या मागणीनुसार, यांच्या विशेष प्रयत्नांनी केंद्र शासनाकडील सर्वेक्षणाचे लिंक पुन्हा सुरू करून देण्यात आली आहे.
कातकरी कुटुंब या लाभापासून वंचित राहू नये, याअनुषंगाने सद्यस्थितीत ठाणे ग्रामीण भागामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षणाचे काम वेगाने सुरू आहे. अखेर १३ हजार, ३२ कुटुंबांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. १२ हजार, २३७ लाभार्थी पात्र झाले. यातील ९ हजार, ६८७ लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. तर ६ हजार, ४६२ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. कोणतेही कुटुंब सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात येत असून जिल्ह्यात युद्ध पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे.