मुंबई: ( tanaji malusare Samadhi area fund ) नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराच्या सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून त्यासाठी निधीही पूर्णतः मंजूर झालेला नाही. शासनाने यात लक्ष घालून काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपा गटनेते प्रविण दरेकर यांनी केली.
शंभूराजे देसाई अर्थराज्यमंत्री असताना उंबरठला नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या बाजूचे सुशोभीकरण करण्यासाठी ५ कोटींचा निधी दिला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव उंबरठ आहे. त्याठिकाणचा निधी पूर्णतः मंजूर नाही. त्याचे काम ज्यापद्धतीने वेगाने व्हायला पाहिजे ते होत नाही. या कामीही शासनाने लक्ष घालून कालबद्ध वेळेत काम पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी दरेकर यांनी केली.
मंत्री शंभूराज देसाई उत्तर देताना सांगितले की, मी वित्त विभागाचा राज्यमंत्री असताना अर्थसंकल्पाला उत्तर देताना सभागृहात ही घोषणा केली होती. तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ही बाब निदर्शनासही आणून दिली होती. परंतु काही कारणामुळे हे काम प्रलंबित राहिले असून तो विभाग आता माझ्याकडे आहे. मी दरेकरांना आश्वस्त करतो की, २०२४-२५ या आर्थिक वर्षात १० कोटी रुपयांचा निधी नरवीर तानाजी मालुसरे समाधी परिसराच्या सुशोभीकरणासाठी मंजूर केला जाईल.