युट्यूबमध्ये होणार मोठा बदल, आता नवा लूक आणि सबस्क्रिप्शन-आधारित सेवा!

04 Mar 2025 18:27:34
 
 
 
 
 
 
 
मुंबई : लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी युट्यूब हा मनोरंजनाचा अविभाज्य भाग बनला आहे. चित्रपटांचे ट्रेलर, गाणी, मालिकांचे भाग, तसेच इन्फ्लुएन्सर्सचे व्ह्लॉग्स सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध आहे. मात्र, लवकरच युट्यूबमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार असून, याचा थेट परिणाम युजर्सच्या अनुभवावर होणार आहे.

युट्यूब होणार अधिक प्रीमियम?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, युट्यूब आता सबस्क्रिप्शन-आधारित कंटेंटवर अधिक भर देणार आहे. नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉन प्राइम प्रमाणेच, युट्यूबवरही एक विशेष व्हिडिओ स्ट्रीमिंग सेक्शन तयार केला जाणार आहे, जिथे युजर्सना काही कंटेंट बघण्यासाठी पैसे मोजावे लागतील. ‘द इन्फॉर्मेशन’च्या अहवालानुसार, युट्यूब जाहिरातींवर अवलंबून राहण्याऐवजी नवीन महसूल स्रोत शोधत आहे. त्यामुळे, युट्यूबच्या संपूर्ण प्लॅटफॉर्मचा लेआउट आणि डिझाइन बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


नव्या युट्यूब अ‍ॅपमध्ये काय बदल असतील?
रिपोर्ट्सनुसार, युट्यूब अ‍ॅपचा संपूर्ण लूक नव्याने डिझाइन केला जाणार आहे. आता हा अ‍ॅप नेटफ्लिक्स किंवा जिओसिनेमासारखा दिसू शकतो. नव्या लेआउटमध्ये वेगवेगळ्या शो आणि सिरीजसाठी खास सेक्शन असेल, जिथे निर्माते त्यांचे एपिसोड आणि सीझन हायलाइट करू शकतील. प्रेक्षकांनी नवीन कंटेंट सहज शोधावा, यासाठी युट्यूब होमपेजवर ताज्या मालिकांची माहिती थेट दिसणार आहे. पुढील काही महिन्यांत हा नवा बदल अंमलात येण्याची शक्यता आहे.

जाहिरातींच्या पद्धतीतही बदल!
युट्यूबने जाहिराती दाखवण्याच्या पद्धतीतही सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ मेपासून, युट्यूबवरील जाहिराती ठराविक नैसर्गिक ब्रेकपॉइंट्सवरच दिसतील. सध्या, कुठल्याही ठिकाणी अचानक जाहिरात येते, मात्र नवीन प्रणालीमुळे जाहिरात एखाद्या संवादाच्या मध्यभागी किंवा सीन दरम्यान थांबणार नाही. यामुळे प्रेक्षकांचा अनुभव अधिक सुरळीत होईल.
युट्यूब आपल्या प्लॅटफॉर्मला अधिक प्रीमियम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. भविष्यात, हे अ‍ॅप प्राइम व्हिडिओ किंवा डिस्ने प्लससारखे अधिक व्यावसायिक स्वरूप घेईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे, युजर्सना अधिक आकर्षक कंटेंट अनुभवायला मिळेल, मात्र काही प्रीमियम सुविधा वापरण्यासाठी आता अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.



Powered By Sangraha 9.0