सौंदर्यदृष्टीचा डोळसपणा

    04-Mar-2025
Total Views |

aesthetic vision eye
 

 ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ या पंक्तींप्रमाणे सौंदर्याची व्याख्याही प्रत्येकाची खरचं का हो सेम टू सेम असते? वरकरणी विचार केला, तर सौंदर्याच्या आकृतीबंध निकषांची पूर्तता होत असेल, तर ती सुंदरता, अन्यथा कुरुपता. पण, सौंदर्याची व्याख्या आणि व्याप्ती एवढी उथळ निश्चितच नाही. मग सौंदर्य म्हणजे नेमके काय? जे उघड्या डोळ्यांना दिसते तेच सौंदर्य की दृष्टिआडच्या सृष्टीतही दडलेले असते ते सौंदर्य? खरंच सौंदर्य हे पाहणार्‍याच्या नजरेत असतं का? अशा या ‘सौंदर्य’ संकल्पनेचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विविध पदर उलगडणारा हा लेख...
 
जगात सर्वांत सुंदर लोक तेच असतात, ज्यांचे हृदय दयाळू असते. कारण, खरी सुंदरता ही मनाच्या अंतरंगातून झळकते. शारीरिक सौष्ठव प्रथमदर्शनी आकर्षित करतेही, पण दीर्घकालीन संबंध दृढ करणारे सौंदर्य हे अंतर्गत असते. इतिहासात तत्त्वज्ञांनी सौंदर्याच्या विविध संकल्पना मांडल्या आहेत. या तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोनांमधून सौंदर्याच्या स्वरूपाविषयी वेगवेगळ्या संकल्पना दिसून येतात आणि ते कोण कसे समजावून घेते, यावर वेगवेगळे दृष्टिकोनही दिसून येतात. सौंदर्य त्वचेपुरतेच मर्यादित असते, या म्हणीप्रमाणे, शारीरिक सौंदर्य डोळ्यांना सुखावते, पण खर्‍या अर्थाने सुंदर व्यक्ती ही तिच्या स्वभावामुळे आणि मूल्यांमुळे ओळखली जाते. दयाळूपणा, सहानुभूती आणि प्रेम, या गुणांमुळे एखादी व्यक्ती खरोखरच मोहक वाटते. हेलन केलर जन्मतः अंध आणि बधीर असूनही, त्यांनी आपल्या जीवनात असाधारण यश मिळवले. त्या लोकांना प्रेरणा देत राहिल्या. त्या म्हणतात, जगातील सर्वोत्तम आणि सर्वांत सुंदर गोष्टी डोळ्यांनी पाहता येत नाहीत, हातांनी स्पर्श करता येत नाहीत, त्या फक्त हृदयाने जाणता येतात, हे उद्धरण अंतर्गत सौंदर्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकते. जे शारीरिक पंचेंद्रियांद्वारे अनुभवता येत नाही, पण हृदयाने जाणता येते, हे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आणि इतरांशी केलेल्या वागणुकीचे प्रतिबिंब असते. ज्यांच्याकडे अंतर्गत सौंदर्य असते, ते आपल्या प्रेमाने, उदारतेने आणि सकारात्मकतेने नैसर्गिकरित्या लोकांना आकर्षित करतात.
 
तर सौंदर्य म्हणजे नेमके काय? आपण त्याची व्याख्या कशी करू? सौंदर्याचा अर्थ आपण समजतो तितका साधा, सामान्य नाही आणि तो अनेकविध दृष्टिकोनांवर आधारित आहे. सौंदर्य फक्त शारीरिक आकर्षणापुरते मर्यादित नसून, कला, निसर्ग आणि सौंदर्यदृष्ट्या आनंद देणार्‍या अनेक अनुभवांमध्येही प्रकट होते.सौंदर्य ही अशी गुणविशेषांची संकल्पना आहे, जी आनंद देते आणि सकारात्मक भावनाही जागृत करते. हे एकाच वेळी व्यक्तिनिष्ठ (वैयक्तिक पसंती) तसेच वस्तुनिष्ठ (सौंदर्यदृष्ट्या आकर्षक वाटण्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित) असते. सौंदर्याच्या या व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ परिभाषेच्या परस्परसंवादावर तत्त्वज्ञांच्या चर्चा आजही सुरू आहेत.
 
वरील विचार सौंदर्याच्या मानवी आकलनातील एक महत्त्वाचे सत्य उलगडतात. ‘अतिपरिचयादवज्ञा’ या उक्तीप्रमाणे, परिचयामुळे जवळपास असूनही सौंदर्याबद्दल अनेकदा आपल्यात उदासीनता निर्माण होते. जेव्हा आपण रोजच सौंदर्याने वेढले जातो, मग ते निसर्गात असो किंवा नातेसंबंधांत, तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती ठेवतो किंवा त्याची आपल्याला जाणीव राहात नाही. आपल्या आजूबाजूला फुलणारी रंगीबेरंगी फुले, गगनभेदी वृक्ष, पक्ष्यांचे मधुर गुंजारव, आकाशातील ढगांचे बदलते नमुने, मावळतीचा सूर्य या सर्व गोष्टींचे आपण महत्त्व विसरत जातो. अगदी आपल्या प्रिय व्यक्तीही, ज्यांची उपस्थिती कधीकाळी आनंद देणारी वाटायची, त्या आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्यामुळे त्यांचे मूल्य आपण ओळखत नाही.
 
परंतु, खर्‍या सौंदर्यात आत्म्याला जागृत करण्याची ताकद असते आणि ते प्रेरणादायी असते. जेव्हा आपण थांबून आपल्या सभोवतालचे सौंदर्य मनापासून अनुभवतो, तेव्हा ते आपल्याला अंतःकरणातून हलवते आणि भावनांना उचंबळून टाकते. सौंदर्य, जेव्हा त्याच्या सर्वोच्च रूपात प्रकट होते, तेव्हा ते संवेदनशील मनाला अश्रूंनी भारावून टाकते. हे एखाद्या मंत्रमुग्ध करणार्‍या निसर्ग दृश्यासमोर उभे राहून वाटणारे विस्मय असेल, लहान मुलाच्या चेहर्‍यावरचे निरागस स्मित असेल, आत्म्याला स्पर्श करणार्‍या संगीताच्या स्वरांमधून जाणवणारी धून असेल किंवा एखाद्या नि:स्वार्थी कृतीमधील निर्मळ सौंदर्य असेल. म्हणूनच, सौंदर्य खर्‍या अर्थाने अनुभवण्यासाठी, आपण सतत जागरूक राहिले पाहिजे.दररोज नव्या नूतन दृष्टिकोनातून जगाकडे पाहिले पाहिजे. साध्या गोष्टींमधील आणि कृतींमधील देखणेपण जाणवले पाहिजे आणि आपल्या जीवनाला अर्थपूर्ण बनवणार्‍या लोकांचे व क्षणांचे योग्य मूल्यमापन करता आले पाहिजे.
 
अंतर्गत सौंदर्य कसे विकसित करावे?
 
सौंदर्य केवळ पाहण्याचे किंवा बौद्धिक स्तरावर समजून घ्यायचे नसते. ते अंतरंगात खोलवर अनुभवण्याचे, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर जगण्याचे साधन असते. शुद्ध सौंदर्य आपल्या अंतःकरणाला स्पर्श करते, काहीतरी खोलवर जागृत करते आणि आपल्या मनावर व हृदयावर कायमचा ठसा उमटवते. कलाकृती, संगीत किंवा एखादी परोपकारी उत्कट कृती केवळ डोळ्यांनी पाहून किंवा बुद्धीने समजून घेतल्याने पुरेसे होत नाही. जोपर्यंत ते आपल्या भावनांना स्पर्श करत नाही, अंतर्मुख करत नाही किंवा प्रेरित करत नाही, तोपर्यंत त्याचे खरे सौंदर्य आपल्या मनाच्या कोशात पोहोचत नाही.
 
उदाहरणार्थ, एखादे चित्र त्याच्या रंगसंगती आणि रचनात्मकतेसाठी कौतुकास्पद वाटू शकते. पण, त्यामधील भावना जाणल्याशिवाय त्याचे खरे सौंदर्य उमजत नाही. दुःखाने भरलेला एक गंभीर पोर्ट्रेट, उन्हात न्हालेली सुंदर हिरवीगार मैदाने किंवा कॅनव्हासवर उमटलेला मानवी भावनांचा गहिरा अनुभव, हे खरे सौंदर्य मनाने अनुभवले पाहिजे. त्याचप्रमाणे, संगीत हे केवळ स्वरांचा संग्रह नाही, तर ते आपल्याला काय वाटते, यावर आधारित असते. ते आत्मा शांत करणारे, डोळ्यांत अश्रू आणणारे किंवा जुन्या आठवणींमध्ये रमवणारे असते.
 
सौंदर्य परिवर्तनशील असते. ते आपल्या दृष्टिकोनाला आकार देते, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देते आणि कृतीसाठी प्रेरित करते. जेव्हा आपण सौंदर्याला आपल्या मनात आणि हृदयात स्थान देतो, तेव्हा ते आपल्याला जग समजून घेण्यास मदत करते, आपल्या नातेसंबंधांना दृढ बनवते आणि जीवनाबद्दल अधिक गहिरा कृतज्ञतेचा भाव निर्माण करते. म्हणूनच, सौंदर्य केवळ बाह्य रूपाने अनुभवायचे नसून, मनापासून जाणावयाचे असते. सौंदर्य सर्वत्र आहे. तुमच्या स्वतःच्या अनोख्या सौंदर्याचा स्वीकार करा.
 
 
 - डॉ. शुभांगी पारकर