संतोष देशमुख हत्या प्रकरणावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील 'या' कलाकारांची तीव्र प्रतिक्रिया,"म्हणाले, महाराष्ट्र असा नव्हता..."
04-Mar-2025
Total Views |
मुंबई : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. त्यांच्या हत्येच्या भीषण प्रतिमा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सामान्य नागरिकांपासून राजकीय नेते आणि कलाकारदेखील तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय शोचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी फेसबुकवर लिहिले,
"न्यूज चॅनल वरील संतोष देशमुखांवरील अत्याचाराचे फोटो पाहून अस्वस्थ व्हायला होतं. विकृतीची परिसीमा आहे ही… महाराष्ट्र असा नव्हता..दुःखद.."
तर अभिनेता पृथ्वीक प्रतापने आपल्या पोस्टमध्ये लिहिले,
"मन सुन्न करणारे, मन हेलावून टाकणारे संतापजनक फोटो… संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा!"
हत्या प्रकरणाचा तपास आणि आरोपींविरुद्ध कारवाई:
राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले असून, सुमारे १८० साक्षीदारांच्या मदतीने केलेल्या तपासात आरोपी वाल्मिक कराडला प्रमुख सूत्रधार म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. आवादा या पवन ऊर्जा प्रकल्पातील ३०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप कराड आणि त्याच्या साथीदारांवर ठेवण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेज, ध्वनी नमूने आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे हा गुन्हा सिद्ध करण्यासाठी न्यायवैधक प्रयोगशाळेकडून तपास करण्यात आला आहे. या हत्येने राज्यभर संतापाची लाट उसळली असून, आता प्रेक्षकांसह सर्व स्तरांवरून संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.