अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा वाढदिवस ठरला खास 'ज्याचा त्याचा विठ्ठल’च्या पहिल्या प्रयोगाला जबरदस्त प्रतिसाद!
04-Mar-2025
Total Views |
मुंबई : मराठी मालिकांविषयी बोलायचं झालं, तर आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या मालिकेतील अरुंधती ही भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने घराघरात आपली ओळख निर्माण केली. तब्बल पाच वर्षे प्रेक्षकांना खिळवून ठेवलेल्या या मालिकेने काही महिन्यांपूर्वी निरोप घेतला. मात्र, मधुराणी अजूनही चाहत्यांच्या संपर्कात आहे आणि तिच्या नवीन उपक्रमांमुळे चर्चेत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भावूक करणाऱ्या मधुराणीने रंगभूमीवर एक नवीन प्रयोग सादर केला आहे. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने ती प्रेक्षकांसमोर वेगळ्या अंदाजात आली आहे. विशेष म्हणजे, या नाटकाचा पहिला प्रयोग तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच सादर झाला आणि तो अक्षरशः हाऊसफुल्ल गेला.
या प्रयोगाला मिळालेल्या प्रेमामुळे भारावलेल्या मधुराणीच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. प्रयोगानंतर अनेक प्रेक्षकांनी तिला मिठी मारली, तिचं कौतुक केलं आणि भरभरून शुभेच्छा दिल्या. हा भावनिक क्षण तिने सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.
मधुराणीने व्यक्त केल्या भावना
शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मधुराणीने लिहिलं आहे, "हाऊसफुल्ल वाढदिवस… कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ हा पहिल्याच प्रयोगात इतका प्रभावी ठरेल, याची कल्पनाच नव्हती. ही त्या विठ्ठलाची कृपा आणि प्रेक्षकांचं अपार प्रेम आहे."
तिने पुढे लिहिलं, "कलाकाराला यापेक्षा आणखी काय हवं असतं? आपलं काम लोकांच्या हृदयाला भिडावं, त्यांना विचार करायला लावावं, आनंद द्यावा… हा वाढदिवस कायम लक्षात राहील!"
मधुराणीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षावही झाला आहे. तिचा ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ हा प्रयोग पुढील काही दिवस विविध ठिकाणी सादर केला जाणार असल्याने, प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.