आहार चौरस नव्हे षड्-रस

    04-Mar-2025
Total Views |
 
disease related and in medical nutrition diet
 
( diet for health ) मागील भागात आपण आहाराचे महत्त्व आहाराचे नियम सहा रसांची ओळख याविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या भागात आपण सहा रसांचे सविस्तर विवेचन करणार आहोत.
 
मधुर (गोड) रस
 
हा रस बहुतेकांना प्रिय असतो. जन्मापासूनच सहज साम्य असणारा हा रस फलदायी व पोषण करणारा आहे. शरीरपुष्टि होते. कांती व वर्ण सुधारतो. केसांचे आरोग्य, त्वचेचे सौंदर्य वाढते. शरीर थकलेले, शीणलेले असताना त्वरित शक्ती, उत्साह देणारा असा हा रस आहे. सर्वांगाचा दाह कमी करणारा तहान भागविणारा, मलमूत्रनिर्मिती व प्रवृत्ती सुलभ करणारा, पुरुषांमध्ये वीर्य व स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर दूध वाढविणारा असा हा रस आहे.सर्व वयातील लोकांना हितकारक आहे. मात्र, त्याच्या अतिसेवनाने शरीर स्थूल होते. भूक मंदावते. आळस येतो. शरीर जड वाटू लागते. सूज येते किंवा वाढते. दमा, खोकला, सर्दी, पडसे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब, कृमी, त्वचारोग इ. होण्याची शक्यता वाढते. कफ, दोष व मेद धातूची वृद्धि होते. मधुर रसाचे नेहमी खाण्यास योग्य पदार्थ : गहू, जुने तांदूळ, ज्वारी, दूध, कोहळा, काकडी, पडवळ, अळू, तांदुळजा, चाकवत, रताळे, खजूर, सोनकेळी, द्राक्षे, मनुका, शहाळ्याचे पाणी प्रमाणात खाण्यास हितकर : बाजरी, हरभरे, राजगिरा, तीळ, गुळ, सुरण, शिंगाडे, तांबडा भोपळा, घेवडा, अक्रोड, खारिक, बरका फणस, पेरू, जर्दाळू, सफरचंद, केळी, बेदाणे न पचल्यास अहितकारक म्हणून चांगली भूक असताना खाण्यायोग्य : पावटे, चवळी, चणा, वाटाणा, बटाटे, खरबुजा, कापा फणस, बदाम, पिस्ता, शेंगदाणे, पोहे, अंजीर, नारळ
अति पौष्टिक, परंतु अति खाण्यास व रोगी व्यक्तीस अहितकारक : दुधापासून बनविलेले श्रीखंड, बासुंदी, पेढे व अन्य मिठाई, आईस्क्रिम अशा तर्‍हेने आपले जीवन गोड, आनंदी, करावयाचे असल्यास मधुर रसाचे युक्तीने (विचारपूर्वक) सेवन करावयास हवे. अतिमधुर रस सेवन केल्याने अपाय झाल्यास तिखट रसाचे पदार्थ खावेत.
 
कटु (तिखट) रस
 
वायु व तेज महाभूत प्रधान या रसाच्या सेवनाने जिभेच्या टोकाशी आग होते. गालांचा दाह होतो. नाकाडोळ्यांतून पाणी येते. हा रस प्रमाणात घेतल्यास अन्नाला रूची आणतो. खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो. पचलेल्या अन्नाचे शरीरात चांगल्या प्रकारे शोषण करतो. सूज कमी करण्यास मदत करतो. पंचज्ञानेन्द्रियांची कार्यशक्ती वाढवतो. रक्तवाहिन्यांच्या विकारात फायदा देतो. हृदय, फुप्फुस व शरीरातील अन्य अवयवांतील कफाचा उपलेप नाहीसा करतो. परिणामी, त्याची क्रियाशीलता वाढते. शरीरातील वेदना कमी करतो. जखमा भरण्यास मदत करतो. जंतांचा-कृमींचा नाश करतो. मेद कमी करतो व त्यामुळे स्थौल्यात उपयुक्त ठरतो. याच्या अतिसेवनाने डोळ्यांसमोर अंधारी येते, चक्कर येते. अंगाची आग आग होते. शारीरिक शक्ती कमी होऊ लागते. सर्वांगाचा विशेषतः मस्तक, डोळे, हात, पाय, तोंड गुदप्रदेश इ. ठिकाणी आग होते. तहान लागते. शुक्राचा नाश होऊन नपुंसकत्व येऊ शकते.बडीशेप, तमालपत्र, कंकोळ हे तिखट पदार्थ सौम्य प्रकारात येतात. त्यापेक्षा मुळात, तांबडा कांदा, शहाजिरे, दालचिनी, ओवा, तुळस हे थोडे अधिक तिखट असतात. मोहरी, लसूण, सूंठ, र्पिपळी, ओली मिरची, आले, लवंग, शेवगा यांचा वापर विचारपूर्वक करावा. 
 
आम्ल (आंबट) रस
 
या रसाच्या सेवनाने तोंडात अधिक स्राव निर्माण होतो. दात आंबतात. भुवयांचा संकोच होतो. यात पृथ्वी व तेज महाभूताचे आधिक्य असते. या रसाच्या पदार्थांनी भूक वाढते. रूची उत्पन्न होते. हे उष्ण व स्निग्ध गुणात्मक असून, अन्नाचे पचन करण्यास मदत करतात. आंबट रसाचे पदार्थ मनाला आवडणारे व प्रसन्नता देणारे असतात. आम्ल रस अन्नाला आतड्यात पुढे ढकलतो. पोटात वात (गॅस) होऊ देत नाही. शरीरात ओलावा निर्माण करतो. तोंडात लाळ सुटण्यास मदत करतो. मलमूत्र साफ होण्यास मदत करतो. याच्या अतिसेवनाने मात्र शरीर शिथील होते, गळून गेल्यासारखे वाटते. डोळ्यांसमोर अंधारी येते, भ्रम होतो. छाती व हृदयाच्या ठिकाणी दाह व जळजळ होते. दात आंबतात. तहान वाढते. पित्ताचा प्रकोप होतो. रक्त दुषित होते. त्वचेची दुष्टी होऊन त्वचाविकार होतात.आम्ल रसाचे डाळिंब हे नेहमी खाण्यासारखे असते. कैरी, आवळा, चुका, हे पदार्थ, विचारपूर्वक खाता येण्यासारखे आहेत. कांजी, दही, टोमॅटो, आंबट ताक, चिंच, कच्ची बोरे इ. पदार्थ शक्यतो कमी खावेत.
 
लवण (खारट) रस
 
ल व पृथ्वी महाभूत प्रधान या रसाच्या सेवनाने मुखात स्राव निर्माण होतो. लवण रस अन्नात रूची उत्पन्न करतो. हा स्वतः पचायला हलका व अन्य पदार्थांच्या पचनास मदत करतो. अन्न व मलाचे अधोदिशेने सरण करतो. पोटातील गुबारा कमी करतो. वायुला गुदमार्गाने अथवा मुखावाटे ढेकर स्वरूपात बाहेर काढतो. शौचास साफ करण्याचे कार्य करतो. कफाचा नाश करतो.
याच्या अधिक सेवनाने केस अकाली पांढरे होतात, लवकर गळतात. त्वचेला सुरकुत्या पडतात. म्हातारपण लवकर येते. सर्वांगाचा दाह होतो. बेचैनी वाढते. शरीरात शिथीलता आणतो, पुरुषत्वाचा नाश करतो. नपुंसकत्व येते. त्वचेवर काळे डाग येतात. खाज येते. शरीराला सूज येऊ शकते. रक्तदाब वाढतो. हृदयविकार उत्पन्न होतात. लवण रसात्मक पदार्थात सैंधव हे नेहमी वापरण्यास योग्य आहे. पण संचल, बिडलोण, काळे मीठ, समुद्राचे मीठ यांचा उपयोग प्रमाणातच करावा.
 
तिक्त (कडू) रस
 
वायु व आकाश महाभूत प्रधान हा रस मुखशुद्धी करतो. तोंडास कोरड पाडतो व याच्या सेवनानंतर अन्य कुठल्याही रसाचे व्यवस्थित ज्ञान होऊ शकत नाही. हा रस स्वतः रुचकर किंवा चवदार नसूनही, याच्या सेवनामुळे तोंडाची अरूचि नष्ट होऊन रूची उत्पन्न होते. हा पचनास हलका असून, अन्य पदार्थांच्या पचनास मदत करणारा आहे. याच्या सेवनाने बुद्धी, स्मरणशक्ती वाढते. मानसिक विकारात उपयुक्त ठरतो. तापात व सर्वांगदाहात उपयुक्त ठरतो. मेद कमी करणारा असल्याने स्थौल्यात उपयुक्त आहे. प्रसूतीनंतर स्त्रियांना चांगले दूध येण्यासाठी उपयुक्त असतो. शरीरातील मलीन घटकांचे शोषण करतो. मल, मूत्र, घाम यांना येणारी दुर्गंधी कमी करतो. त्वचा व मांस धातूतील शैथिल्य नष्ट करून त्यांना स्थिरता आणतो. त्वचारोगात फायदेशीर आहे. अतिशय जड, पचायला कठीण पदार्थ जसे श्रीखंड, बासुंदी, मटण खाल्ल्यावर ते पचण्यासाठी या रसाच्या पदार्थांचे सेवन करावे. याच्या अतिसेवनाने शरीरातील रस रक्तापासून शुक्रापर्यंत सर्व धातू क्षीण होतात. शरीर कृश होते. शरीराचे तेज नष्ट होते. मानसिक नैराश्य येऊ शकते. शौचाला कडक होते. मलप्रवृत्तीला जोर करावा लागल्याने मूळव्याध, भगंदरसारखे विकार होतात. शरीराचा स्निग्धपणा कमी होऊन ते रूक्ष, खरखरीत होते. तोंडाला कोरड पडते.
पडवळ, गुळवेल, मेथी, कारले, कडुनिंब, कोबी, हळद, दारूहळद, नागरमोथा इ. पदार्थ कडू रसाचे आहेत. कडू रसाचे पदार्थ आहारात असणे आवश्यक आहे. गोड, आंबट, रसाचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करण्याची ताकद कडू व तुरट रसात आहे. आपण दररोज हळदीचा वापर म्हणूनच आपल्या आहरात करतो. पाडव्याच्या दिवशी कडुनिंब खाऊन आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो व वर्षभर आरोग्य चांगले राहण्याचीच प्रार्थना करतो.
 
कषाय (तुरट) रस
 
वायु व पृथ्वी महाभूत प्रधान या रसाच्या सेवनाने तोंडाला कोरड पडते. जीभ आकुंचित होते. याच्या सेवनाने मुखशुद्धी होते. त्वचाविकार कमी होतात. जखमा लवकर भरून निघतात. मेद कमी होत असल्याने स्थौल्यात त्याचा उपयोग होतो. हृदयाच्या पेशींना या रसाने विशेष बळ मिळते. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात, श्वेतस्रावात याचा उपयोग होतो. आतड्यांची मलनिष्कासनाची प्रवृत्ति कमी होते. त्यामुळे जुलाबात याचा उपयोग विशेष फायदेशीर ठरतो. याच्या अति सेवनाने तोंडास कोरड पडते. खूप तहान लागते. जीभ जड होते. तोतरेपणा वाढतो. शौचास घट्ट, कडक होते. पोटात गुबारा धरतो (गॅस होतो). शुक्र धातूचा नाश होऊन नपुंसकत्व येऊ शकते. त्वचा काळवंडते. शरीर कृश होते. वेगवेगळे वाताचे विकार याने वाढतात. तूर, उंबराची फळे, खैर, वड, गाजर, बोरे, कैरी, नारळ, जांभूळ, सुपारी, पपई, मध, कैरी इ. पदार्थ या रसाचे आहेत.
आयुर्वेद या सर्वच सहा रसांचे प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला देतो. केवळ आवड म्हणून एक किंवा दोनच रसांचे अधिक सेवन करण्याची नित्य प्रवृत्ती जनमानसांत दिसते व त्यानेच विविध विकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे या षड्रसात्मक आहाराचे प्रमाणशीर सेवन म्हणजेच खरा चौरस आहार आहे.
 
 
 
 
- डॉ. हेमंत पराडकर
सहयोगी प्राध्यापक, कायचिकित्सा विभाग, आयुर्वेद महाविद्यालय, शीव, आरोग्य भारती, कोकण प्रांताद्वारे प्रकाशित